सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

भावनेत अडकलेला नात्यांचा गुंता सुसंवादानं सोडवणं सोपं जातं त्यासाठी सुसंवादाची सुगंधित कुपी नात्यांवर सांडली पाहिजे. नाही तर नातं धुसर आणि पुसट होत जातं अगदी वृद्धापकाळातल्या नजरे सारखं…..

आई वडील आणि मुलगा सून यांच्या नातेसंबंधावरचा विषय तसा चावून चोथा झालेला, पण पुन्हा पुन्हा उफाळून येतो आणि नव्याने विचार करायला लावतो याचं कारण दररोज घडणाऱ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना अन् मनाला चटका लावून जाणारे प्रसंग !….नाईलाजावर इलाज नाही असं म्हणून हताश झालेली आईवडिलांची मनं विचारांच्या गर्तेत बुडन जातात……

‘आमच्या प्रेमाच्या ओलाव्याने ही बीजे अंकुरली बहरली ना? त्यांना पंखही आम्हीच दिलेत ना ?त्यात बळही आम्हीच भरले ना ? तशात अपेक्षांचं ओझं कधीही त्यांच्यावर लादलं नाही. अर्थात आई वडील म्हणून या नात्यामधून माफक अपेक्षा केली तर आमचं काय चुकलं? रक्ताची नाती मतलबी का झाली? ती इतकी संवेदनाशून्य का झाली? आम्ही कुठे कमी पडलो? आणखी काय करायला हवं होतं आम्ही? आपल्याच पोटचीच पोरं…..तीही इतकी भावनाशून्य?’ विचारांचं मोहोळ उठत, पण विचारांचा गुंता सुटत नाही.

पंख फुटलेली लेकरं उडून जातात. त्यांच्या प्रगतीत आई-वडिलांचं सुख असत.थोडे दिवस एकांत मिळतो. याच एकांताच एकटेपणात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

मुलांसोबत राहणाऱ्या आई-वडिलांच्या जीवनातील एकटेपणाचा हाच अर्थ आहे. भावना आणि व्यवहारात फरक जाणवू लागतो आपलंच सगळं परकं वाटू लागतं

आणि…….

अचानक आठवते ती कावेरी ! नाट्यसम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ मधली कावेरी आणि तिने त्याकाळी म्हटलेलं एक शाश्वत वाक्य ‘जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये’

चूक नसतानाही, केवळ वाद टाळावा म्हणून सतत माघार घेऊन संयम राखणारं एका वृद्ध जोडप्याची करूणरस प्रधान अशी शोकांतिका म्हणजे ‘नटसम्राट’! ते एक क्षोभनाट्य आहे.

काळ लोटला आहे. या शोकांतिकेतली पात्रं बदलली आहेत,परंतु या नाटकातील विषयाचं गांभीर्य अधिक गडद होत चाललं आहे.

इथून पुढच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व वाढेल का? की ते एक स्मरणरंजन राहील? एकत्र कुटुंब पद्धतीची दुर्दशाच आपण नटसम्राटमध्ये पाहतो म्हणून याबद्दल आपण साशंक होत चाललो आहोत.

‘बी प्रॅक्टिकल’ चा गोषवारा सध्या फार आहे. या व्यवहारी जगात संवेदना भावना यांची किंमत कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत ‘परावलंबी वृद्धत्व’ हा एक यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पर्यायाने वृद्धाश्रम हा व्यवसाय झाला आहे.

‘नटसम्राट’ मधलं हे जोडपं, कलावंत मन असलेलं जोडपं आहे. त्याच्यासारखंच आयुष्य व्यतीत करणारी समाजातली असंख्य वृद्ध जोडपी असंच मूक भाष्य करत आहेत. विदेशी संस्कृतीचा आणि तिच्या संस्कारांचा प्रसार आपल्या इथेही होतोय. ती वाळवी इकडे जोमात पसरते आहे.तिला आवर घालणं हे संवेदनशील मनाचं काम आहे.

गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही कलाकृती आणि त्यात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीने पेरलेली स्वगतेही अनन्यसाधारण!…

आपल्या समाजात आपण अप्पासाहेब बेलवलकरां सारखी दुर्दैवी परिस्थिती ओढवलेल्या व्यक्तीला ‘त्याचा नटसम्राट झाला’ असे बोलीभाषेत म्हणून ‘नटसम्राट’ हे विशेषण देतो.ह्यातच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या नाटकाचं श्रेष्ठत्व आहे.

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments