?  विविधा ?

☆ पुणेरी मिसळ – गुंड्याभाऊंचा कोरोना! ☆ श्री अभय जोशी ☆

प्रिय गुंड्याभाऊ,

स. न. वि.वि.

तुला कोविडबाधा झाल्याचे समजले. मीही दोन दिवस तापलो होतो. पण ते लसीकरणामुळे. तुला सांगणारच होतो. तेवढ्यात तुझ्या बाधेचे वृत्त समजले. घालमेल सुरू झाली. अखेर परवा चि. मोरूने व्हिडीओकॉल लावून दिला. पण तुला खोकल्याची उबळ येत होती. बोलणे शक्य नव्हते. अखेर आज हे पत्र तुला पाठवतोय. त्या दिवशी मोबाईलवर चेहराच दिसला तुझा फक्त. खाली किती वाळला आहेस, याचा अंदाज आला नाही. असो. स्कोअर फारच कमी आहे तुझा, ही आनंदाची बाब. (शाळा-कॉलेजात कधी तुझा स्कोअर वाढला नव्हता, ही चिंतेची बाब होती)  बहुतेक कोरोनाला तुझी बाधा झाली असावी, असो. तू नक्की खडखडीत बरा होणारेस. ज्या वयात ‘मदनबाधा’ व्हायला हवी होती, तेव्हा काही झालं नाही. आता भलत्या वयात ‘कोविडबाधा’ मात्र होतेय. (हास जरा मेल्या. खोकू नकोस). डॉक्टर सांगतील ती सारी औषधे घे. पथ्ये पाळ. ‘मी दणकट आहे, काही होणार नाही,’ या भ्रमांत राहू नकोस. या कोरोनाने भल्या भल्यांना ग्रासलेंय. कोविडबाधेत माझा आधी नंबर लागेल, असं वाटलं होतं. पण तू लावलास. असो. लवकर बरा हो. अशक्तपणा घालवण्यासाठी अति पौष्टिक आहाराचा फार मारा करू नकोस. सुक्यामेव्याचा तोबरा भरणे, वरणभाताच्या ढिगाऱ्याचा फडशा पाडणे, भाकऱ्यांची चळत संपवणे… असले अघोरी प्रकार करू नकोस. मिताहार कर, पण पौष्टिक कर. नाही तर अति आहारानेंही कोविड स्कोअर वाढतो म्हणे. शिवाय गृह विलगीकरणात आहेस. चौदा दिवसांनी त्या खोलीच्या बाहेर यायचेंय. नाही तर लठ्ठपणा वाढल्याने दारातच अडकशील. (हसू नकोस, खोकला येतोय तुला.) ऑक्सिमीटरचा चिमटा जवळ ठेव. नियमित तपास. फक्त त्या चिमट्यात बोटं घालण्याचा नाद लावून घेऊ नकोस. बॅटरी संपेल. मग ते मीटर काहीच दाखवणार नाही. तुला वाटेल ऑक्सिजन संपला की काय? घबराट उडेल. त्यानेंही ऑक्सिजन खालावतो. अशा वेळी पालथा झोप. (ढेरीमुळे ते किती शक्य होईल, शंकाच वाटते. सीसॉ होईल शरीराचा) तरीही झोप तसाच. त्याने ऑक्सिजन वाढतो म्हणतात. असो. बरा झाल्यावर उंडारू नकोस लगेच. भलता अशक्तपणा असतो. आमच्या शेजारचे चिंतोपंत असेच चौदाव्या दिवशी उंडारायला लगेच बाहेर पडले. तर रस्त्यात पँटच घसरली. ते सावरताना त्यांनाही चक्कर आली. आधी चक्कर आली की पँट घसरली, नेमकें आधी काय घडले, ते समजले नाही. पण जे काही झालें ते अशक्तपणामुळेच. असो. तू मात्र हे लक्षात ठेव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढच्या वेळी घरी प्रत्यक्ष भेटू.

– तुझा चिमण.

≡≡≡≡≡≡≡≡≡

प्रिय  चिमण,

स. न. वि.वि.

तुझं पत्र मिळालं. बरं वाटलं. या कोरोना विलगीकरणाच्या वैराण वाळवंटात तुझं पत्र मरुद्यान वाटलें. चिमण, तू काढलेले चिमटेही याही अवस्थेत हसवून गेलें. मला सोडून तू एकटेच लसीकरण केलेंस. त्यामुळेच तापलास लेका. ‘लस नव्हे तर तुला नर्स लक्षात राहिली,’ असें काऊ वहिनी फोनवरून सांगत होती. चावट कुठला. असो. हे विलगीकरण अगदी नकोसें झालेंय बघ. परवा ताप-खोकल्याचं निमित्त झालं नि आप्तेष्टांनी धोशाच लावला. कोरोना चाचणी करून घ्या म्हणून. शेवटी केली एकदाची चाचणी. ती सकारात्मक असल्याचा माझ्यासाठी नकारात्मक अहवाल मिळाला. अन् तोंडचें पाणी पळालें, त्यापाठोपाठ चवही गेली. नंतर वासही येणेंही बंद झालें. आप्तेष्टांनी खोलीत बंद करून टाकलेंय. नाश्ता-दोन वेळच्या जेवणाचं ताट दारातून आत सरकवतात. एखादा कैदी किंवा श्वापद झाल्यासारखा भास मला होतोय. खोलीत नुसता येरझाऱ्या घालत असतो. काळजी करू नकोस. येरझाऱ्या घालण्याने ऑक्सिजन काही कमी होत नाही माझा. उलट ऑक्सिमीटर आधी ९५ असेल तर येरझाऱ्यांनी ऑक्सिजन स्तर ९७ दाखवतो. ऑक्सिमीटरच्या चिमट्यात मी कायम बोट घालून बसतो, हा तुझा गैरसमज आहे. देव करो तुला कोरोना कधीही न होवो. नाही तर तू पाचही बोटांत ऑक्सिमीटर घालून त्या वेगवेगळ्या आकडेवारीची सरासरी काढत बसशील. पाचही बोटांत ऑक्सिमीटरचे चिमटे, काखेत एक अऩ् तोंडात एक थर्मामीटर ठेवून कानटोपी घालून बसलेला चिमण माझ्या डोळ्यांसमोर येतोय. (हास मेल्या. मी खोकतो.) अरे या उन्हाळ्यात वाफारे घेणे, गरम पाणी पिणे, गुळण्या करणे म्हणजे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा आहे रे. परवा खिडकीतून फळवाल्याला हातवारे करून फळे पाठवण्यास सांगत होतो. तर दाढीतील माझा अवतार ‘खिलौना’ चित्रपटातील खिडकीतील वेड्या संजीवकुमारप्रमाणे भासत होता, असें शेजारी सांगत होते. रस्त्यावरची दोन-तीन माणसे मला पाहून सैरावैरा धावत सुटली. असो. सध्या प्राणायाम सुरू आहे. जलनेतीचा प्रयोग फसला. नाका-तोंडात पाणी गेलं. माझ्या खोलीतच खोलवर बुडाल्याचा भास झाला. माझा सोटा घेऊन कोरोनाला झोडपावेसे वाटतेय. असो झेपेल तेवढें व्यायाम करतोय. लवकरच बरा होऊन उकडीचे मोदक चापायला येईनच तुझ्याकडे.

– तुझा गुंड्या.

 

– श्री अभय नरहर जोशी

[email protected]

(लेखक ‘लोकमत’च्या पुणेआवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments