सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ प्राजक्ताची फुले ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते
मी प्राजक्ताला पहाते
ही टपटपणारी फुले जणू
आहेत अबोल अश्रुधारा …
हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी तुझ्या भेटीला पण …पण पितांबर लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदणं झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈