?  विविधा ?

पुरणपोळी…अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !

पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.

डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !

गूळ म्हणजे यमन!

यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!

इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा

(अन्यथा बट्ट्याबोळ!).

हां, आता ज्यांना जमत व गमतं

(‘प्रभू आजि गमला’ या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.

जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. ‘गनिसा’ ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.

नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं …. ख्या ख्या

आता महत्वाचा ‘टप्पा’ ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान – हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.

आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!

तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.

मग .. ‘जो भजे हरिको सदा’, ‘चिन्मया सकल ह्रदया”, “माई सावरे रंग राची” अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा. आणि मग “हेचि दान देगा देवा” अश्या थाटात ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणावं.

भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा …… आयुष्य सार्थकी लागाव !!!

होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या मनःपूर्वक  शुभेच्छा

।। ॐ नमःशिवाय ।।

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments