सौ राधिका भांडारकर
विविधा
☆ प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) ☆ सौ राधिका भांडारकर ☆
१३ जुन हा प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने…
वास्तविक आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ही काही शब्दांत किंवा काही वाक्यात करणे अत्यंत अवघड आहे. अनेक विविधांगी क्षेत्रांमध्ये त्यांचा अफाट वावर होता. ते मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार ,संपादक ,पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकारणी आणि वक्ते होते. कुठलेही क्षेत्र त्यांच्यापासून सुटले नाही. आणि प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं स्थान हे नामांकित होतं.
काव्य लेखनापासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. १३ ऑगस्ट१८९८ साली पुरंदर तालुक्यात ,कोडीत खुर्द या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला.
बीए ,बीटी,टीडी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या चळवळीचे ते प्रमुख नेते होते . असं म्हणतात की त्यांच्या नेतृत्वामुळेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण यशस्वी झाला.
महाराष्ट्राचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. अध्यापन हे त्यांचं पहिलं मासिक. त्यानंतर रत्नाकर ,मनोरमा, नवे अध्यापन ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जय हिंद, मराठा अशी दैनिके ही त्यांनी सुरू केली. आणि या माध्यमातून त्यांच्या जबरदस्त लेखणीचे फटकारे लोकांनी अनुभवले.
कधी पत्रकार कधी शिक्षक कधी राजकारणी तर कधी एक साहित्यिक म्हणून त्यांनी आपली परखड आणि सुदृढ मते समाजापुढे मांडली.
साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा अशी त्यांची एकाहून एक अनेक नाटके रंगभूमीवर गाजली. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगतीला सहज चिमटे काढले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्य संग्रह अतिशय लोकप्रिय ठरला.
आचार्य अत्रे व कवी गिरीश या दोघांनी मिळून संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठी क्रमिक पुस्तके पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमात होती. यानंतर निघालेल्या पुस्तकांची या अरुण वाचनमालेशी तुलना होऊच शकत नाही, हे शिक्षण वर्तुळातील लोकांचे आणि पालकांचेही मत आहे.
श्यामची आई या सानेगुरुजी लिखित कादंबरीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. आणि त्यास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून पहिलं सुवर्णकमळ मिळालं.
अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघंकधीही विस्मरणात जाउ न शकणारे, महाराष्ट्रातील अफाट विनोदवीर. ज्यांनी खरोखरच लोकांना सहजपणे खळखळून हसवलं.
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ खूप मोठे होते. एकदा एका ग्रामीण भागात दौरा करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना म्हटले,
” तुम्ही सरकारला विधानसभेत कोंडीत पकडता पण त्यांच्या
एवढ्या मोठ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे काय पुरणार?
तेव्हा अत्रे त्याला म्हणाले,
” तुझं शेत आहे ना?”
” हो साहेब”
” कोंबड्या पाळतोस ना?”
” व्हय तर!”
” किती कोंबड्या आहेत?”
त्याने छाती फुगवून म्हटले ,
” चांगल्या शंभरेक हायत की..”
” आणि कोंबडे किती?”
” कोंबडा फकस्त एकच हाय.”
“मग एकटा पडतो का तिथे?”
जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला. अत्र्यांच्या या हजरजबाबीपणा मुळे अनेकांना त्यांनी जागीच गप्प केले होते.
अत्र्यांच्या साहित्यावर सावरकरांचा प्रभाव होता. त्यांची आणि सावरकर यांची पहिली भेट रत्नागिरी येथे झाली होती. त्याविषयी ते म्हणाले होते,
” सावरकरांचा सतेज गौरवर्ण, आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर अविस्मरणीय प्रभाव झाला. माझा अंतरात्मा तृप्त झाल्यासारखा वाटला.”
सावरकर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर १४ लेख लिहिले होते. आणि ते अत्यंत प्रभावी आणि वाचनीय ठरले. सावरकराना प्रथम स्वातंत्र्यवीर म्हणणारे आचार्य अत्रेच होते.
” जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही. आणि तृप्ती कधी होत नाही.” असे आचार्य अत्रे म्हणत. इतकी त्यांची जीवनावर निष्ठा होती.
बाबासाहेब आंबेडकर आणि अत्रे यांची विशेष मैत्री होती. आणि त्या दोघांनी एकमेकांच्या मतांचा नेहमी आदर राखला.
अशा या बहुगुणी. समृद्ध व्यक्ती विषयी बोलताना,राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, राईटर अंड फायटर ऑफ महाराष्ट्र! असा त्यांचा उल्लेख केला होता.
साहित्यिक वर्तुळात ते केशवकुमार म्हणून प्रसिद्ध होते. आजीचे घड्याळ ही आजही आठवणीत असलेली त्यांची कविता केशवकुमार या नावाने प्रसिद्ध झाली होती. आचार्य अत्रे हे खरोखरच एक अद्भुत रसायन होते! त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती. तशी त्यांच्या कटू जिव्हारी लागणाऱ्या वाक्बाणांनी दुखावली गेलेली माणसं ही खूप होती..
कर्हेचे पाणी ..हे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगणारे पाच खंडात असलेले २४९३ पानी आत्मनिवेदन. .”महाराष्ट्राच्या उद्धारासाठी नि संरक्षणासाठी तत्कारणि देह पडो ही असे स्पृहा….” असे म्हणून त्यांनी या पुस्तकाचा पाचवा खंड प्रकाशित केला. शेवटच्या परिच्छेदात ते म्हणतात, “हर्षाच्या आणि संतोषाच्या या मधुर धुंदीत, महाराष्ट्र मातेच्या चरणावर मस्तक ठेवून, अर्धोन्मिलीत नेत्रांनी काही काळ मला आता निश्चल पडू द्या…”
यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. तो दिवस होता १३ जून १९६९.
असं हे अत्रे तत्रे सर्वत्रे व्यक्तिमत्व अनंतात लोप पावले.
पण आजही ते लोकांच्या मनामनात अमर आहे.
त्यांच्या स्मृतीस अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली🙏
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈