☆ विविधा ☆ प्रेम ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
प्रेम हा अडीच अक्षरी शब्द. किती आपला, हवा हवासा वाटणारा.
ही एक अशी गोष्ट आहे जी केव्हाही, कुठेही आणि कोणाबरोबरही होऊ शकते. हा थांबा जरा, आता प्रेम म्हणलं की तिथे मुलगा आणि मुलगीच असली पाहिजेच अस काही नाही बरका. म्हणजे थोडक्यात प्रियकर आणि प्रेयसीच असली पाहिजे अस नाही.
माणूस जन्माला आल्यावर त्याच्यावर जर कोणी निस्वारथी पणे प्रेम करत असेल तर ती आई. या इवल्याश्या जीवाला ती प्रेम करायला शिकवते. वात्सल्याने भरलेली ही माता आपल्या पिलाला जिवापाड जपते, प्रेम करते. रडणार्या तान्ह्या मुलालाही जवळ घेतले, गोंजारले की ते शांत बसते मायेचा स्पर्श त्यालाही कळतो. आईचे प्रेम म्हणजे काय नुसते लाड करणे, गोंजारणे का ? अजिबात नाही.
त्याला चुकल्यावर कधी धपाटा घालून, कधी समजावून, कधी कठोर शिक्षा करणे म्हणजे ही प्रेमच की. आपला मुलगा चुकू नये म्हणून जेव्हा आई त्याला शिक्षा करत असते तेव्हा ती जणू स्वतः ला शिक्षा करत असते.
पुढे मुलं शाळेत जाऊ लागतात, आणि त्यांचे शाळेशी एक अतुट नाते निर्माण होते. शाळा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. शाळा जणू त्यांचे विश्व होऊन जाते. तिथे अनेकांशी प्रेमाचे नाते जुळते, आपल्या वर्ग शिक्षिका, शिपाई मामा, मित्र मैत्रिणी सारे आपले वाटू लागतात.
शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते तरी विश्वासाच्या सुरेख धाग्यात गुंफले जाते. शिक्षक प्रेमाने, आपुलकीने, आत्मियतेने विद्यार्थ्यांना घडवतात. एक सुजाण नागरिक बनवतात.
जसे जसे मोठ्या इयत्तेत जाऊ तसे आपला असा एक वेगळा ग्रुप तयार व्हायला लागतो. आणि त्यांच्यात एक खास नाते तयार होते. मैत्रीचे नाते स्वच्छ सळसळणारी नदी म्हणजे मैत्रीचे नाते.
महाविद्यालयात गेल्यावर आपल्याला एखादी व्यक्ति विशेष आवडायला लागते. आणि त्याला एक विशेष जागा निर्माण होते हृदयात. आपल्याला मन आता फुलपाखरा प्रमाणे भासु लागते. आपण आपले उरतच नाही. ह्या प्रेमाच्या
महासागरात माणूस मात्र अखंड बुडून जातो.
खूप सुंदर नातं असत हे. खूप क्वचित जणांनाच हे मिळत ही गोष्ट वेगळी.
माझ्या वर कोणीतरी प्रेम करत ही भावनाच सुखावून जाते, बळ देऊन जाते. मग ती व्यक्ती कोणी असो आई, बाबा, मित्र, मैत्रीणी, सहचारिणी एखादी जिवलग सखी कोणीही. माझं कोणी आहे ह्याची जाणीव होते त्याने. आपलेही अस्तित्व आहे ह्याची जाणीव करून देते प्रेम. आपण ही कोणाला हवे आहोत ही भावनाच किती सुंदर असते.
सुंदर, निखळ, स्वच्छ मनाचा झरा म्हणजे प्रेम.
जिथे हक्कानी आपण काहीही बोलू शकतो, सांगू शकतो म्हणजे प्रेम.
काही वेळेला कोणतेच नात्याचे लेबल नसते लावलेले, तरीही एक आपुलकी वाटत असते एकमेकांबद्दल तेही प्रेमच की, मग तिथे ते प्रियकर असतीलच असे नाही, तरीही हे दोन जीव मनानी बांधले गेले असतात, शरीराने नाही, ना त्यांना त्याची गरज असते.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करते, आपण कोणाला तरी हवे आहोत ही जाणीव जगण्याला बळ देऊन जाते.
निशब्द मायेची ऊब म्हणजे प्रेम,
विचारांवर आणि मनावर अधिराज्य करते ते प्रेम.
ज्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो ते प्रेम. रणरणत्या उन्हांत मिळालेली सावली म्हणजे प्रेम.
सहज मनाच्या कोपऱ्यातून ?
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈