श्री उमेश सूर्यवंशी
परिचय
उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.
राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.
विविधा
☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆
शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .
पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .
पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.
© श्री उमेश सूर्यवंशी
मो 9922784065
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈