सुश्री संगीता कुलकर्णी
विविधा
☆ आषाढ महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस… अर्थात महाकवी कालिदास दिन..
आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाकवी कुलगुरू कालिदास दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो…
रणरणत्या उन्हानंतर वेध लागतात ते पावसाच्या सरींचे…या पावसाच्या सरी तन आणि मन चिंब भिजवून टाकतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की आकाशात हळूहळू मेघांची गर्दी होऊ लागते आणि मग आठवण येते ती महाकवी कुलगुरू कालिदासाची…!
कालिदासाच्या ‘ मेघदूत ’ या काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा अतिशय प्रसिद्ध असा श्लोक. आषाढ म्हटले की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यातून गडगडाट करीत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्य कृती..!
आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. आपल्या मेघदूत या महाकाव्याच्या प्रारंभी पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांत सुंदर वर्णन कालिदासांनी केले आहे… ” मेघदूत’ हे एक सर्वांगसुंदर प्रेमकाव्य आहे. हे कोणत्याही पुराणकथेवर आधारित नाही. यात कालिदासाचा स्वतंत्र निर्मितीक्षम प्रज्ञाविलास, आणि तरीही मानवी अंतःकरणातील एका सुकोमल वास्तव भावनेचाच आविष्कार करणारे कालिदासरचित “मेघदूत’ हे एक मनोज्ञ काव्य आहे..! निसर्गावर प्रेम करणारा निसर्ग प्रेमी कवी..! निसर्गाबद्दल असणारं अतोनात प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं. प्रत्येक निसर्गप्रेमींना त्यात चिंब चिंब भिजवून टाकतो..!
ग्रीष्मातील उष्मा सरला.. ढग दाटून आले की आपसूकच वातावरणातील होणारा तो बदल..सृष्टीला चढणारे नावीन्याचे रंग, सृजनाने खुललेले ते निसर्गाचे रुपडे आणि त्याला चिंब भिजवून टाकणारा आषाढ लागला की जणू हे संपूर्ण जग नव्याने जन्म घेतल्यासारखे भासू लागते…!
उपमा या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत…!
कवी कालिदासांचे संस्कृत कवींमधील उच्च स्थान दर्शविणारे एक सुंदर सुभाषित……
पुरा कवीनां गणना प्रसंगे ll
कनिष्ठीकाधिष्ठति कालिदास:
अद्यापि तदतुल्य कवेर्भावादी
अनामिका सार्थवती बभूव ll
…. याचा अर्थ असा आहे की– पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेतल्या कवींची गणना करताना त्यांना मोजताना आपल्या हाताच्या करंगळीवर पहिलं नाव कवी कालिदास यांचे आले पण त्यानंतरच्या हाताच्या बोटावर कोणाचेही नाव आले नाही कारण महाकवी कालिदासांच्या इतका उच्च प्रतीचा संस्कृत कवी कोणी नव्हताच. त्यामुळे करंगळीच्या आधीच्या बोटावर कोणाचेच नाव न आल्यामुळे त्या बोटाला अनामिका असे म्हणतात..!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈