श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
स्त्रीने असिस्टंट म्हणून काम करणं हे सर्वमान्य आणि सर्वसामान्य आहे. पण ती जेव्हा बॉस म्हणून खुर्चीवर बसते तेव्हा तिला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. तिची ‘बढती ‘ही व्यक्तिशः मानाची,जबाबदारीची,प्रतिष्ठेची असली तरी बरेच वेळा कुटुंबातल्या इतरांसाठी गैरसोयीची होते. तिच्या रुटीनच्या नोकरीने घराचा जो जम
बसलेला असतो, तो विस्कटतो.प्रमोशनची सुरुवात बहुधा बदलीने होते.
तिथे संघर्ष सुरु होतो. पहिल्याने हा संघर्ष तिच्या मनात होतो.बढतीमुळे दैनंदिनीत बदल,नवीन कामाचा अभ्यास, जबाबदारी, संसार संभाळताना हे जमेल?कशाला सुखाचा जीव दुःखात घाला!अशी द्विधा मनस्थिती होते. अशा वेळी तिला कोणी आधार दिला, प्रोत्साहन दिलं तर ती वरिष्ठ म्हणून उत्तम काम करू शकते
सरिता आकाशवाणीत ड्यूटीऑफिसर होती. तिला प्रमोशन मिळालं. पण बदली होणार होती. तिची दोन्ही मुलं शाळेत जाणारी , बऱ्याच अडचणी होणार होत्या.पण सरिताची नवविवाहित जाऊ –ती मदतीला धावली. ती सरिताला म्हणाली,” वहिनी, तुम्ही प्रमोशन घ्या. मी मुलांच अभ्यास घेण्यापासून सर्व करीन, सासुबाईना समजावून सांगेन. मधून मधून या. मुलांना भेटा, इकडची काळजी करू नका.”
सरिताने अशी दोन वर्ष काढली. मग मुलांना तिकडे न्हेलं. आता तिचा नवरा मधून मधून तिच्या गावी येतो. सासूबाई पण चेंज म्हणून येतात. अशी साथ घरातल्यानी दिली तर सरिता प्रमोशनच्या पुढच्या पायऱ्याही चढेल.
स्वाती एक माध्यमिक शिक्षिका. तिच्या पदव्या, लवकर नोकरीला लागल्यामुळे सिनिऑरिटी, त्यामुळे मुख्याध्यापकाची जागा तिला इतर सहकारी मैत्रीणींच्या आधी मिळाली. शैला स्वातीची जिवलग मैत्रीण.तिला वाटलं चला, आता आपल्याला थोडी मोकळिक मिळेल.कामाच्या बाबतीत ती निष्काळजीच होती. सहामाही जवळ आली तरी तिच्या विषयाचा पोर्शंन पूर्ण नाही. दहावीच्या मुलांनी तक्रार केली. स्वातीने शैलाला ऑफिस मध्ये बोलावल, विचारलं.
“गेल्या महिन्यात आजारी होते तुला माहितच आहे की.”
“पण जादा तास घेऊन अभ्यासक्रम तू पुरा करायला हवा होतास.”
“आता मी असं करते.शिकवलय तेव्हढ्यावरच पेपर काढते. म्हणजे मुलं चिडायची नाहीत.”
“अग, दहावीचा पेपर बोर्डाच्या फॉरमँटप्रमाणे काढायला हवा. मुलांना सराव नको का व्हायला?तू पोर्शंन पुरा कर.”
शैलाने ऐकलं नाही. पालकांनी तक्रारी केल्याच.स्वातीची दोन्हीकडून पंचाईत. मग ती कडकपणे वागू लागली. काही मैत्रिणीनी समजून घेतलं काही तुटल्या.स्वातीने स्टाफ मिटिंगमध्ये सगळं क्लिअर केलं.कारण तिला आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायची होती.ती म्हणाली, “मी भेदभाव करणार नाही. पुरुष शिक्षकांनी लक्षात घ्यावं, स्टाफमधल्या शिक्षिका तुमच्या इतक्याच कर्तव्यतत्पर आहेत पण काही वेळा त्यांना सवलती द्याव्या लागतात. कारण त्या माता आहेत. तुमच्या घरच्या स्त्रियांकडे बघा. स्त्री म्हणून सवलत नाही, पण सहानुभूती दाखवायला हवी ना! गैरसमज नको. त्यावेळी तरी पुरुष शिक्षकांनी माना डोलावल्या
आपली मैत्रीण बॉसच्या खुर्चीवर बसली तर तिच्या सहकारी स्त्रियांनी तिला समजून घ्यायला हव.तिला ‘येस बॉस ‘म्हणताना आनंद , अभिमान वाटायला हवा. पण प्रत्यक्षात असं होतं का? की स्त्री स्त्रीची शत्रू ठरते? तिच्या प्रमोशनवर अशी अनेक प्रश्न चिन्हं आहेत.
© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
बदल व्हायलाच हवा.