विविधा
☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆
‘प्रज्ञा ‘हा शब्द आपल्या ऐकण्यात, बोलण्यात, वाचण्यात नेहमी येतो. पण त्याच्या अर्थाविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. भारतीय मानसशास्त्रात ‘प्रज्ञा’ही संकल्पना अतिशय सुंदर रित्या स्पष्ट केलेली आहे. प्राचीन काळात ऋषिमुनींनी निर्माण केलेले साहित्य ही आपली अशी संपत्ती आहे की त्यामुळे आज भारताचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा भारतीय मानसशास्त्रातील एक संकल्पना’प्रज्ञा’. याविषयीचे विचार येथे व्यक्त केले आहेत.
संस्कृत मध्ये ‘प्रज्ञा’असा मूळ शब्द वापरतात. याला पूरक असे ‘प्राज्ञ’व ‘प्राज्ञा’ असेही शब्द आहेत. व्यक्तीचे शुद्ध आणि उच्च विचार युक्त शहाणपण, बुद्धिमत्ता आणि आकलन म्हणजे ‘प्रज्ञा ‘. ही शहाणपणाची अशी पातळी आहे की तर्काने आणि निष्कर्षाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा उच्च आहे. प्रज्ञ= प्र +ज्ञ . प्र म्हणजे परिपूर्ण आणि ज्ञ म्हणजे माहीत असणे किंवा संकल्पनेचा अत्यंतिक जवळून अभ्यास करणे. प्रज्ञा या संकल्पनेविषयी वेद , उपनिषद व योगशास्त्रात संदर्भ सापडतात.
ऐतरेय उपनिषदात प्रज्ञेविषयी खालील श्लोक सापडतो.
तत्प्रज्ञानेत्रम प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञानं ब्रम्ह (iii. i. 3).
जे अस्तित्वात आहे ते म्हणजे शारीरिक व आध्यात्मिक ज्ञान. या ज्ञानाचे मूळ प्रज्ञा आहे म्हणजे स्वजाणीव किंवा सुषुप्ती. कौशितकी उपनिषदामध्ये इंद्राने मृत्यूचे वर्णन करताना प्राण आणि प्रज्ञा शरीरात एकत्र राहतात व मृत्यूचे वेळी एकत्रित निघून जातात असे म्हटले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत. पंचेंद्रियांची कार्येही प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाहीत. तसेच प्रज्ञेशिवाय विचार यशस्वी होऊ शकत नाही.
वेदांत सार मध्ये प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,
अस्य प्राज्ञात्वम स्पष्टोपाधि तया नती प्रकाशत्वात॥४४॥.
आत्मा हा निर्गुण असतो. ईश्वर मात्र सर्व गुणांनी युक्त असतो व चराचरावर राज्य करत असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या अज्ञानाचा एक भाग म्हणजे सदोष बुद्धिमत्ता. सुषुप्ति अवस्थेतील आत्मा जेव्हा आनंदमय विज्ञानघन असतो तेव्हा त्याची बुद्धिमत्ता ही प्रज्ञा असते.
मांडुक्योपनिषदात प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,
आनंदभुक चेतोमुखःप्राज्ञः॥
प्रज्ञा म्हणजे जागृती अवस्थेत साधन लाभलेल्या(असलेल्या)आशीर्वादाचा आनंद घेणारा उपभोक्ता.
उपनिषद रहस्य या पुस्तकात प्रज्ञाचे इत्यंभूत वर्णन केले आहे. प्रज्ञा ही जगाचे चक्षु असून जगाचा आधारही आहे. प्रज्ञा प्रत्यक्ष ब्रम्ह आहे. सर्व स्थावर जंगम, वस्तू, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी व आकाशात उडणारे सर्व पक्षी, सर्व पंचमहाभूते व देवता हे सर्व प्रज्ञेतच अंतर्भूत होतात व प्रज्ञेमुळे जिवंत राहतात असे उपनिषद्काराचे मत आहे.
पतंजली योगसूत्रामध्ये प्रज्ञेचा उल्लेख खालील श्लोकात केलेला आढळतो.
ॠतंभरा तत्र प्रज्ञा ॥
निर्विचार समाधी विषयी स्पष्टीकरण करताना असे म्हटले आहे की, ज्ञान हे जेव्हा निष्कर्षाच्या आणि ग्रंथांच्या पलीकडे जाते तेव्हा ते फक्त सत्यानेच भरलेले असते. मन हे शुद्ध असते अशावेळी असलेल्या स्थितीत प्रज्ञा जागृत असते.
संस्कृतीकोष मध्ये व काही वेबसाईटवर( संदर्भामध्ये दिलेल्या आहेत) प्रज्ञा या संकल्पनेविषयी लिहिताना असे म्हटले आहे की , प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञानाचे किंवा जगण्याचे इंद्रिय स्वरूप. प्रज्ञा हे प्राचीन संस्कृत नाम असून त्याचा सखोल अर्थ शहाणपण हाच आहे . प्रज्ञा हे देवी सरस्वतीचे नाम आहे . सरस्वती ही कलेची व वादविवादाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे आकलन, ज्ञान व संकल्पनेशी अत्यंत जवळीक असणे असेम्हटले आहे तर महाभारतानुसार, प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे अध्ययन, संकल्पनेचा शोध असे म्हटले आहे . शतपथ ब्राह्मण व सांख्यायन श्रोत-सूत्र यांच्या नुसार शहाणपण, ज्ञान, बुद्धी, तर्क , आराखडा मांडणे, साधन वापर या गुणधर्मांसाठी प्रज्ञा हा शब्द वापरला आहे.
बुद्ध संप्रदायानुसार प्रज्ञा किंवा पन्ना( पाली )म्हणजे शहाणपण . याचा अर्थ वास्तवातील सत्याबद्दल असलेली मर्मदृष्टी . प्र म्हणजे जागृती, ज्ञान किंवा आकलन आणि ज्ञ म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची उच्च, व्यापक, जन्मजात बहरलेली अवस्था होय.
प्रज्ञेचे एकूण तीन प्रकार आहेत.
- श्रुतमय प्रज्ञा
- चिंतनमय प्रज्ञा
- भावनामय प्रज्ञा
श्रुतमय प्रज्ञा म्हणजे असे ज्ञान की जे फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे. हे ऐकिवज्ञान अनुभूतीच्या स्तरावर उतरलेलं असेलच असे नाही . श्रुतमय ज्ञान प्रेरणा घेण्यासाठी गरजेचं असतं. ज्ञान ऐकल्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यात चिंतनाची आवश्यकता असते. या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात आणि चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते. अनुभूतीनंतर जे ज्ञान होते त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात. भावनामय प्रज्ञा सर्वात महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती श्रुतमय प्रज्ञेचा साक्षात्कार करेलही व चिंतन ही करेल पण त्याचा अनुभव घेईलच असे नाही म्हणून प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभवाच्या बळावर जे जे काही उतरते त्याला ‘प्रज्ञा ‘असे म्हणतात.
या संकल्पनेचा एवढा विचार करणे ही सध्याच्या काळातील प्राथमिक गरज आहे. मुलांना कसे वाढवावे याविषयी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना किती सखोल मार्गदर्शन करावे याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते. प्रत्येक मुलातील ‘प्रज्ञा’जागृत झाल्याशिवाय त्याचा विकास परिपूर्ण होणार नाही व मुले आयुष्यात समाधानी होणार नाहीत म्हणून भारतीय मानसशास्त्रातील संकल्पना सर्वांनी अभ्यासल्या पाहिजेत.
संदर्भ
- भारतीय संस्कृती कोश -पंडित महादेव शास्त्री जोशी
- उपनिषद रहस्य -गुरुदेव रानडे
- प्रवचन सारांश -विपश्यना शिबिर
- द प्रिन्सिपल उपनिषद- स्वामी निखिलानंद
- http://www. pitrau. com”Meaning of Pradnya”
- www. bachpan. com”Meanimg of Pradnya”
- Sanskrit Dictionary(revised 2008)-Lexicon (http://www. sanskritlexicon. unikoein. de)
- The Golden Book of Upanishads-Kulshreshtha Mahendra
© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈