डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ पाहिल्याने प्रदर्शन… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. ‘बालपण’ जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.

विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. ‘बाहुली’ हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात  बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.           

दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.

१९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.

भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. ‘भातुकली’ या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब  पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही.  काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.

ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. ‘भातुकली म्हणजे करंदीकरच’ हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं ‘भातुकली’ प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे ‘भातुकली’ हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना “आमच्यावेळी हे असं होतं” हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.

करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे,  तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं  कपाट, चुली व शेगड्यांचे,  भांड्याचे  अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या,  वेड्भांडे,  शकुंतला भांडे,  रुबवटा,  ठेचणी या घरातून  हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट,  गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक  खेळही आहेत. तसेच  देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची. 

१९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर  १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं  बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.

अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते. 

लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व.  या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.    

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments