श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ पाच पैशांचे पाणी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
१९१० मध्ये शेगांवी श्री गजानन महाराज समाधिस्त झाले आणि तिथे आता काही उरले नाही असे लोकांना वाटू लागले..आणि ते स्वाभाविक होते !
पण देह लौकिक अर्थाने विलुप्त झाला तरी चैतन्य मागे राहतेच. आणि याचा पडताळा पुढे येऊ लागला आणि अगदी आजही तो येतच असतो.
साधारणतः १९३० मधील ही घटना आहे. शेगाव पासून तशा बऱ्याच दूर वर राहणारा एक पोलिस कर्मचारी कचेरीच्या कामासाठी शेगावकडे येण्यास निघाला. त्यावेळी एकतर वाहनाची सोय नव्हती. आणि या माणसाकडे गाडी भाड्याला पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे स्वारी पैदलच निघाली होती. उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात विदर्भ. सूर्य डोईवर आलेला आणि घसा कोरडा पडत चाललेला होता. रस्त्याने एक दोन ठिकाणी पाणी मिळू शकेल असे या पोलिस कर्मचाऱ्यास वाटले होते. पण कुठे पाणी काही नजरेस पडेना. वस्ती अतिशय विरळ त्यामुळे वाट वाकडी करून कुणाच्या घरी,मळ्यात जावे म्हटले तरी ते शक्य दिसेना. अजून बराच वेळ लागणार होता. पायी जायचे म्हणून मुख्य सडकेपेक्षा रानातून थोडे अधून मधून चालले होते. आता तहान खूपच जोर धरू लागली !
त्यांना वाटेवर त्यांच्यापुढे एक वयस्कर गृहस्थ चालताना दिसले. पोलिसाने त्यांना मागून हाक दिली..” बावाजी, पियाले पाणी भेटेन का कुठे? “
त्या गृहस्थाने मागे वळून पाहिले. “ तुला इथे कुठे पाणी दिसते तरी का? पण मी तुला देऊ शकतो पाणी तहान भागवण्याइतपत…पण तुझ्याकडे मला देण्यासाठी काही आहे?”
“ काही नाही,बावजी! “
“ अरे,बघ..असेल काही तरी .. “
पोलिसाने खिसा चाचपला…पाच पैशाचं नाणं हाती लागलं. ते त्यांनी त्या गृहस्थाच्या हाती ठेवलं. गृहस्थ हसले! त्यांनी ते नाणं तळहातांवर मध्ये ठेवलं आणि जोरजोरात दोन्ही हातांच्या तळव्यांत घासायला आरंभ केला….काही क्षणात तळहातातून पाण्याची धार पडू लागली !
हा चमत्कार होता याचं तहानेने भान हरपलेल्या त्या माणसाने दोन ओंजळी भरून पाणी घशाखाली उतरवले…डोळे मिटून! तहान निवू लागली होती!
डोळे उघडले तर समोर, आगे मागे कुणी दिसेना. हात मात्र ओलेच होते. खिशात पाच पैसे नव्हते…मात्र त्या पाच पैशांच्या पाण्याने देहाची तहान भागली तर होतीच पण मन ही ओलेचिंब झाले होते!
पोलिस समाधी मंदिरात पोहोचले..दर्शन घेतले! मुर्तीमधील गजानन माऊली जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात मुद्रा शांत ठेवून बसली होती!
काहीच वेळापूर्वी घशाखाली गेलेलं पाणी..त्यातील काही थेंब आता या पोलिसाच्या नेत्रांतून खाली ओघळून आले! गजानन महाराज कुठेही गेलेले नव्हते..याची त्यांना खात्री पटली होती !
गण गण गणात बोते…हे भजन म्हणतच ते पोलिस गृहस्थ आपल्या कचेरीकडे निघून गेले! पाच पैशांत यापेक्षा आणखी काय ठेवा मिळू शकतो गरीबाला? मनाने अतिश्रीमंत होऊन ते कृतकृत्य झाले होते!
– – – नुकत्याच झालेल्या शेगाव भेटीत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या तोंडून त्यांच्या आजोबांना आलेला अनुभव समजला आणि तो जसाच्या तसा वर्णन केला आहे! सामान्य माणसांनी देव पाहिला नाही..पण देवापर्यंत पोहोचवू शकणारे परोपकारी संत मात्र पाहिले…याबाबत महाराष्ट्र सुदैवी आहे !जय गजानन !) –
– – – भाविकांसाठी लिहिले आहे. प्रश्न भावनेचा आणि उत्तर भक्तीचे असते ! दर्शनासाठी आलेल्या एका शिक्षिकेला प्रसाद देताना कुणा एका सेवकाने तुमची बढती निश्चित आहे,असे सांगितल्याचा भास झाला ! बढती होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही त्यांना मुख्याध्यापिका पदी बढती मिळाली..
– – – ही वस्तुस्थिती आहे ! या गोष्टींवर अविश्वास दाखवण्याचे काहीही कारण दिसत नाही. अर्थात विवेक तर आहेच प्रत्येकाजवळ!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈