श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
☆ पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !”
हे एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मान्यवराच्या तोंडातलं वाक्य, कोणी दिग्गज कलाकार किंवा नेता आपल्या सर्वांना कायमचा सोडून गेल्यावर त्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहतांना हमखास ऐकायला मिळत. पण या वाक्याचं खरेपण किती पोकळ आहे हे आपल्या सर्वांच्या मनांत असलं, तरी उघडपणे ते कोणी बोलून दाखवत नाही. कारण शिष्टाचार !
अशा कोणा एकाच्या जाण्यामुळे आपल्या सर्वांच्याच जीवनात खरंच अशी, कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होते का हो ? आपण मला विचाराल तर पोकळी वगैरे काही नाही, पण थोडे दिवस त्या व्यक्तीच्या आठवणीने दुःख होतं, व्याकुळ व्हायला होतं वगैरे, वगैरे ! गेलेली व्यक्ती आपल्या किती जवळची होती यावर त्या दुःखाची इंटेंसिटी अवलंबून असते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.
मंडळी, राम-कृष्णासारखे अवतार या भूतलावरून गेले तरी जग रहाटी थांबल्याचे किंवा एखादी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या सारख्या मर्त्या मानवामुळे आपण गेल्यावर पोकळी वगैरे निर्माण व्हायचा प्रश्नच कसा निर्माण होईल ? एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर तो किंवा ती, आपल्या कितीही जवळचा किंवा जवळची असली तरी हे त्रिवार सत्य आपण नाकारू शकतो का ? अगदी आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा, कोणी उरलेल्या सगळ्या आयुष्यात दुःख करत हातावर हात ठेवून बसलाय असं माझ्या तरी पाहण्यात नाही. शेवटी प्रत्येकाला स्वतः जिवंत राहण्यासाठी स्वतःच हातपाय हलवणे गरजेचे नाही का ? यावर हे “तुमचं पोकळ मत पटलं नाही बुवा !” असं कोणीही म्हणू शकेल, त्याला माझा ईलाज नाही. पण या बाबतीत भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या “जन पळ भर म्हणतील….. ” या अजरामर ओळी आपण आठवून पहा, असं मी त्या लोकांना नक्कीच सांगेन ! असो !
मंडळी, अनेक शोक सभांच्या दुःखद प्रसंगी, त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना ज्याच्या त्याच्या तोंडी तेच तेच वाक्य ऐकून मला तर कधी कधी हसू येत, अर्थात मनातल्या मनांत ! कारण असा एखादा दिग्गज कलाकार गेला, तरी भविष्यात कुठल्यातरी नवीन कलाकाराची अदाकारी किंवा त्याच गाणं किंवा वादन ऐकून आपल्याला गेलेल्या कलाकाराची आठवण येते असं आपण अनेकदा म्हणतो! गेलेल्या नेत्याच्या बाबतीत आजच्या “या” तरुण नेत्यामधे “त्या अमुक तमुक नेत्याचे” गुण दिसतात, असं म्हटलं जात.
आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी ज्यांची काहीच भरीव कामगिरी नाही, पण ज्यांना सामान्यपणे आपली माय मराठी भाषा बोलता अथवा लिहिता येते, कळते, तो किंवा ती सुद्धा माझ्या आधीच्या वाक्याशी सहमत होतील, याची मला खात्री आहे !
“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !” हे लेखाच्या सुरवातीच वाक्य आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी आणि कोण गेल्यावर त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना उच्चारलं असेल, या बद्दल मला खरंच माहिती नाही, पण मला ते जाणून घ्यायची पोकळ नाही पण भरीव इच्छा नक्कीच आहे ! या बाबत श्रद्धांजली वाहण्याच्या विषयात तज्ञ असलेली मंडळी, मला पोकळ आश्वासन न देता काहीतरी ठोस माहिती पुराव्यासकट देतील अशी मला आशा आहे.
बरं वर्षान वर्ष कोणत्याही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हेच वाक्य अजून आपली जागा राखून आहे, याच सुद्धा मला कधी कधी नवल वाटतं ! आपली मराठी भाषा इतकी समृद्ध असतांना या वाक्याला अजून तोडीस तोड वाक्य मिळू नये, हे मराठी भाषेच दुर्दैव म्हणायचं का ? का या गंभीर विषयात “आपण कशाला नाक खुपसा” असा सूज्ञ विचार मराठी भाषेच्या विचारवंतांनी किंवा श्रद्धांजली वाहण्यात एक्स्पर्ट असलेल्या लोकांनी केला आहे ? पूर्वापार चालत आलेल्या जशा अनेक परंपरा आपल्याकडे आपण डोळे मिटून पाळत आहोत, तशाच पद्धतीने हे घासून गुळगुळीत आणि पोकळ झालेलं वाक्य, अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली वाहणाऱ्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येत असावं, असं मला स्वतःला कधी कधी मग वाटून जात.
एखादा माणूस आपला मुद्दा दुसऱ्याला समजावतांना त्याच्या बोलण्यातून, देह बोलीतून तो खरंच मनापासून पोट तिडकीने बोलतोय का वरवरच बोलतोय, हे सामान्यपणे लोकांना कळतं. पण या लेखाच जे ब्रीद वाक्य आहे ते कोणी कधीही, कितीही वेळा बोलला तरी त्यातील पोकळपणा लगेच मला तरी दिसून येतो. अर्थात तो इतरांना सुद्धा दिसत, कळत असेल, पण वर म्हटल्याप्रमाणे तो उघडपणे म्हणून दाखवायचं किंवा बोलायचं हे शिष्टाचाराच्या आड येत असल्यामुळे तसं कोणी बोलून दाखवत नाही, हे ही तितकंच खरं !
शेवटी, इतक्या वर्षांनी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर, आता तरी मराठी भाषेच्या अभ्यासकांनी या “पोकळ” भासणाऱ्या वाक्याला बदलून, त्या ऐवजी अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला काहीतरी नवीन असं भरीव वाक्य तयार करावं, शोधावं असं मला मनापासून वाटतं ! त्यामुळे होईल काय, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला, या श्रद्धांजलीच्या नवीन वाक्याने थोडं तरी आत्मिक समाधान मिळेल, अशी आशा करायला काय हरकत आहे ?
ताजा कलम – आपण अटेंड केलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, एखाद्या वक्त्याने “पोकळी” या शब्दाशिवाय कोणाला श्रद्धांजली वाहिली असेल, तर कृपया मला ते वाक्य जरूर कळवा !
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈