सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(पुरस्कार प्राप्त लेख)

नमस्ते प्राण प्राणते नमो अस्त्व

पानते/ पराची नाय ते नमः,

प्रतीचीनाय ते नमः, सर्वस्मैत इदं नमः//

” हे प्राणा, जीवनाच कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. अपानाचे कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. पुढे जाणाऱ्या आणि मागे सरणाऱ्या प्राणास नमस्कार असो. सर्व कार्य करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. “

रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला निघाले. जाता जाता दवाखाने पाहिले. जवळजवळ 30-35 दवाखाने बरीच गर्दी असलेले दिसले. मनात विचार आला, खरंच इतके आजार का बरं वाढले असतील? इतके भौतिक प्रगती होऊनही आरोग्य नीट राखता येत नाही असं दिसतं. त्यासाठी जीवन पद्धती बदलायला हवी ; ही गोष्ट पाश्चा त्यांनाही कळल्याने ते लोक आता भारतीय अध्यात्म, आणि योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत.

मानवाच्या कल्याणासाठी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल अनुभवातून, (इ. स. पूर्व 200 वर्षे) ऋषी पतंजलीनी शास्त्रीय दृष्ट्या अष्टांग योगाची रचना सांगितली आहे. उपनिषदे हे तत्त्वज्ञान (theory). आणि पतंजली योग ही साधना. (Practical) आहे. त्यांनी ‘योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध’ अशी व्याख्या केली आहे. “तस्मिन्सती श्वास प्रश्‍वासयो: गतिविच्छेदः” म्हणजे प्राणायामात श्वासाची गती तुटणे. “त्यांनी सांगितलेले ज्ञान हे एक आचरण शास्त्र आहे. त्यांनी सांगितलेली अष्टांगे यापैकी बाह्यंगे— यम (सत्य, अहिंसा, अस्तेय,  ब्रह्मचर्य अपरिग्रह) नियम— (शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान). आसन— –शरीराची सुख स्थिती. प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा दिशा देणे. अंतरंगेप्रत्याहार –इंद्रियांची बाहेरची धाव बंद करणे. धारणा —- एखाद्या गोष्टींवर मन स्थिर करणे. ध्यान— धारणेशी एकता- नता. आणि शेवटी समाधी स्थिती. प्राणायाम हा प्रकार अंतरंग आणि बहिरंग यांना जोडणारा सेतू आहे असे म्हणायला हरकत नाही. सुदृढ शरीर, मन आणि आत्मा पवित्र करायचा असेल तर ते कार्य प्राणायामाद्वारे होऊ शकते. जवळ जवळ 80 टक्के व्याधी प्राणायामाच्या अर्ध्या तासाच्या नियमित सरावाने लवकर दूर होतात. तसेच ध्यान आणि समाधी ही ही सहज प्राप्त होते. ही एक पूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे.

संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माण ज्या पंचतत्वांच्या योगाने झाले, त्याच्या मुळात एक तत्व जे सर्वत्र आहे ते म्हणजे ‘प्राणतत्व’. पंचप्राणांपैकी प्राणायाम कोष, चेतन करून, विश्वव्यापी प्राणातून प्राणतत्व आकर्षित केले जाऊ शकते. त्यामुळे योगशास्त्रात प्राणायामाचे खूप महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम (प्राणाला दिशा देणं किंवा प्राणाचे नियंत्रण) म्हणजे केवळ श्वास घेणं आणि सोडणं इतकच नाही तर त्या प्राण किंवा परमशक्ती बरोबर (vital force) जोडून राहण याचा अभ्यास हाच प्राणायाम. स्थूलरुपाने

 श्वासोश्वासाची एक पद्धत आहे. श्वास आत घेणं (अभ्यंतर )म्हणजे तो पूरक. आत मध्ये रोखून धरण म्हणजे कुंभक. आणि बाहेर सोडणे म्हणजे रेचक. शरीरातील सर्व हालचालींचा वायू हा कारक असल्याने, पेशींच्या केंद्रकातील हालचाल चालू असते. त्या वायुचे नियमन म्हणजे चौथा सूक्ष्मतर प्राणायाम. विज्ञानानुसार छातीतील दोन्ही फुफ्फुसे श्वासाला शरीरात भरण्याची यंत्रे आहेत. नेहमीच्या श्वासात फुफ्फुसाचा एक चतुर्थांश भाग कार्य करतो. त्यामध्ये सात कोटी 30 लाख स्पंजासारखी कोष्टक किंवा वायुकोष असतात. पैकी दोन कोटी छिद्रातूनच प्राणवायूचा संचार होतो. प्रत्येक पेशी प्राणवायू घेते आणि CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) बाहेर टाकते. यालाच आजच्या विज्ञानात (celular tissue respiration )म्हणतात. पेशींची ही देवाणघेवाण रक्तामार्फत होत असते. विज्ञानाने बाह्य (external) आणि आंतर ((internal) असे म्हटले आहे. पण पतंजलींनी ‘स्तंभ ‘ हा तिसरा प्रकार सांगितला आहे. हवा रक्तात पुढे पेशीपर्यंत जाऊन, देवाणघेवाण होऊन, रक्ताचा दुसरा स्तंभच त्याला विज्ञान (column of blood) म्हणते. शरीरातील उत्सर्जक पदार्थ, (toxins) ही कान, नाक, डोळे, त्वचा, मलमूत्राद्वारे बाहेर पडतात. पण श्वास हा निरंतर चालत असल्याने टॉकसिन्स बाहेर पडण्याचे काम हे सतत चालू असते. श्वास घेताना जर दीर्घ श्वास घेतला, आणि रोखून धरला तर फुफ्फुसाचे कार्य 90 ते 95 टक्के पर्यंत होऊ शकते. आपोआपच श्वसन पेशींच्या माध्यमातून रक्तात येणारा प्राणवायू जास्त प्रमाणावर येतो. पुढे तो इंद्रियांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बरेच आजार दूर होतात. आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, आजारांचे मूळ कारण, प्राणवायूची अल्प उपलब्धता हे आहे. प्राणाचा मनाशी संबंध असल्याने मनावर संयम ठेवल्याने मनही शक्तिमान होते. इतर इंद्रिये प्राणाच्या स्वाधीन होतात. योगासनांनी स्थूल शरीराच्या विकृती दूर होतात. तर प्राणायामाने सूक्ष्म शरीरावर (फुफ्फुसे, हृदय, मेंदू वगैरे) तसेच स्थूल शरीरावरही प्रभाव पडतो. त्यामुळे प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. षट्र् चक्रांचा अर्वाचीन उपचार विज्ञानाशी तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, लोहचुंबक व त्याचे कार्यक्षेत्र (magnet) आणि (magnetic field )यांचा जो अन्योन्य संबंध आहे, तसाच काहीसा प्रकार (nerve plexuses ) षट्चक्रांचा आहे. मानवी शरीरात ७२ हजार पेक्षाही जास्त नाड्या आहेत. पैकी इडा (डावी चंद्रनाडी), पिंगला (उजवी सूर्य नाडी) या सक्रिय राहतात. इडेचा उगम डाव्या नासिका छिद्रातून होऊन प्रवाहित होणारा प्राणवायू लहान मेंदू (cerebellum )व ( medulla oblongata) मध्ये प्रवेश करत सुषुम्नेच्या (तिसरी नाडी )डाव्या बाजूस थांबते. याच्याच उलट पिंगला नाडीचे कार्य होते. नासिकेच्या वरील भागात दोन्ही छिद्र एकत्र येतात. तिथेच दोन्ही नाड्यांचे उगमस्थान असल्याने तेथेच शरीराचा प्रमुख जीवनीय बिंदू (vital spot) तयार होतो. येथेच इडा (parasympathetic) आणि पिंगला (sympathetic) एकत्र येऊन एक चक्र (plexus) तयार होते. तेच आज्ञाचक्र. (तिसरा डोळा). याच प्रमाणे शरीरात आणखीही चक्रे आहेत. त्याच्या स्थानाप्रमाणे त्याच्या आजूबाजूच्या इंद्रियांवर प्राणायामाद्वारे ध्यान करून संतुलित ठेवता येते. १) मूलाधार चक्र (pelvic plexus) शिवणी स्थान व reproductory संस्थेवर कार्य करते. २) स्वाधिष्ठान चक्र (hypogastric plexus) लिंगस्थान व excretory वर कार्य करते. ३) मणिपूर चक्र (solar plexus) नाभी स्थान. digestive संस्थेवर कार्य करते. ४)अनाहत चक्र (cardiac plexus) हृदय स्थान, circulatory संस्थेवर कार्य करते. ५) विशुद्ध चक्र (carotid plexus) स्थान कंठ. respiratory संस्थेवर कार्य. ६) आज्ञा चक्र (medullary plexus) स्थान भ्रूमध्य, nervous संस्थेवर कार्य) याला गंगा, यमुना, सरस्वती असा त्रिवेणी संगम म्हणतात. सर्व चक्रे मेरुदंडाच्या मुळापासून वरच्या भागापर्यंत असतात. प्राणायाम आणि ध्यानाने ती विकसित करून त्या त्या ठिकाणच्या व्याधी कमी होऊ शकतात.

 योगासन आणि प्राणायामाच्या द्वारा शरीरातून बाहेर पडणाऱ्या शक्तीला बांधून ठेवणे म्हणजे बंध होय. प्राणायामात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. १) श्वास भरून, हनुवटी कंठाला स्पर्श करून रोखून धरणे तो जालंधर बंध. २) पोट मोकळे सोडून छाती वरच्या बाजूला उपटली की तो उड्डियान बंध. ३) गुद आत ओढून घेतला की, तो मूलाधार बंध. तीनही बंध एकदाच केले (महाबंध) की, तिन्हीचेही फायदे एकत्र मिळतात.

देश, काल आणि संख्येचा परिणामही प्राणायामावर घडतो. थंड प्रदेशात हालचाली कमी होत असल्याने प्राणशक्ती जास्त लागत नाही. याउलट उष्णता असताना हालचाली जास्त, त्यामुळे प्राणशक्तीही जास्त लागते. त्याच प्रमाणे दिवस रात्रीचाही परिणाम होतो. प्रत्येक प्राण्याचे आयुष्य त्याच्या श्वासक्रीयेवर, संख्येवर अवलंबून असते. धावपळ करताना श्वास जास्त घ्यावे लागतात. उदाः- ससा मिनिटला 38 वेळा व आयुष्य आठ वर्षे साधारण, घोडा सोळा वेळा आणि आयुष्य 35 वर्षे, कासव, सर्प पाच आणि आठ वेळा त्यांचे आयुष्यही भरपूर असते. मनुष्य बारा ते तेरा वेळा आणि आयुष्य 90 ते 100 असे धरले आहे. असा श्वासाचा खजिना जितक्या काळजीपूर्वक आपण खर्च करू तितके दीर्घायुषी होऊ. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत

१) अनुलोम विलोम— मेंदू तंत्रातील द्रवामध्ये (cerebrospinal fluid)संदेश वहनाचे कार्य करणार्या अणूच्या तंत्रात (neuropeptide) शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित होत असतात इतकेच नाही तर मेंदूत होणाऱ्या भावनात्मक क्रियानाही नियंत्रित करते.

जेव्हा द्रवाचा संचार उच्च पातळी गाठतो तेव्हा मेंदूचा डावा व उजवा भाग समान क्रियाशील होतो. हे अनुलोम विलोम प्राणायामाने होते. आणखी एक गोष्ट, मेंदूच्या माध्यमातून होणाऱ्या श्वसनक्रियेत, सूर्यकिरणापासूनच्या ऊर्जा, आणि प्राणवायूचा संचार शरीरात होऊ शकतो. मेंदू सुद्धा श्वसन आणि स्पंदनाची क्रिया करतो, असा आयुर्वेदात आणि अनेक देशांच्या दर्शनात उल्लेख आहे.

२)कपालभाती—- अंतः श्वसन आणि प्रयत्नपूर्वक उश्वास यामुळे रक्तदाब वाढवून हृदयात रक्त बळपूर्वक परत आल्याने तेथील अवरोध दूर होतो. किंवा अवरोध कधीच होत नाही. आधुनिक शास्त्रात ई. ई. सी. पी द्वारे पायाच्या खालच्या भागात मिनिटाला 60 वेळा (extrnal stroke)देऊन एन्जिओ प्लास्टीच्या रुपाने त्याच्या गतीला हृदयाच्या गतीशी समान केल्याने अवरोध दूर होतो. तसेच एस. एल. ई. सारख्या असाध्य आजारावर व पोट व छातीतील सर्व अवयवांना या प्राणायामाने फायदा मिळतो.

भस्त्रिका—- साधारण श्वसनचक्रात 500 एम एल वायूचा उपयोग करतो. दीर्घ श्वास घेऊन बलपुर्वक बाहेर टाकला तर 46500 एम एल ही असू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

सूर्यभेदी, चंद्रभेदी प्राणायाम— हे प्राणायाम क्रमशः उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात कमी करावा. करताना जालंधर व मूलबंधाबरोबर करावेत. सित्कारी, शीतली, मूर्छा, प्रणव, उद्गिथ, उज्जयी, भ्रामरी असे अनेक प्राणायाम आहेत. सर्वांचेच पद्धत आणि फायदे येथे सांगणे अवघड आहे. पण एकूणच प्राणायामाने सर्वच अवयव ऊर्जावान व शरीर निरोगी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नाही तर प्राणायाम करणारी व्यक्ती प्रेम, करूणा, धैर्य, शक्ती, पवित्रता अशा गुणांनी युक्त होते. वाढत्या हिंसा, चोऱ्या, भ्रष्टाचार, अत्याचार या सर्व अवगुणांवर उपाय म्हणजे प्राणायाम. आजच्या युगात याची नितांत गरज आहे.

प्राणायामाचे जितके फायदे आहेत तितकेच ते नियमानुसार केले नाहीतर ते त्रासदायकही होते.

प्राणायामाचे नियम—- प्राणायाम करताना पद्मासन किंवा वज्रासनात बसावे. ज्यायोगे पाठीचा कणा ताठ राहतो. शक्य नसेल तर खुर्चीवर बसून करावा. आसन स्वच्छ असावे शक्य असेल तर पाणी व तुपाचा दिवा जवळ असावा. ज्यायोगे प्रदूषण होणार नाही. श्वास नाकानेच घ्यावा. पंचेंद्रियांवर तणाव न ठेवता मन प्रसन्न ठेवावे.

(हॅलो एन एम टी) आहार सात्विक व शाकाहारी असावा. प्राणायाम सावकाशपणे व सावधानतेने करावा. प्रथम तीन वेळा ओंकार म्हणावा. प्राणायाम तज्ञ व्यक्तीकडूनच शिकावा. वाचून करू नये. प्राणायामैन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत/ आयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः// ( हटयोग प्रदीपिका) प्राणायामाच्या बाबत वेद, उपनिषदे, पतंजली, मनू, दयानंद या सर्वांचेच एकमत आहे. खरंच प्राणायामाला एक किमयागार असं म्हणायला हरकत नाही.

मी स्वतः रोज दीड तास योग साधना करते. आज वयाच्या 77व्या वर्षीही शरीराने मन सुदृढ, निरोगी आणि आनंदी असल्याचा अनुभव मी घेत आहे. असाच सर्वांनी अनुभव घेऊन आपले आयुष्य निरामय व आनंदात घालवावे घालवावे.

“सर्वेपि सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः/ सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख माप्नुयात// अशी सर्व जीवांसाठी प्रार्थना करुया. नमस्कार.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments