श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

🫀 प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे  ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

(Valentine’s DaY Special…)

नैसर्गिक निवड प्रक्रियेचा भाग असलेले ‘प्रेम’ हे मनुष्याचे सर्वाधिक निरोगी वर्तन आहे. विज्ञान म्हणते की, आपल्या भाव-भावना हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या अन्य अवयवांवर थेट परिणाम करतात. असं काय असतं ह्या प्रेमात जे आपल्या आरोग्य-अनारोग्याचा अविभाज्य भाग आहे ? प्रत्येकाचे शरीर वय स्वभाव विचार परिस्थिती यानुसार ‘प्रेम’ वेगवेगळे असले तरी “तुमचं आमचं सेम असतं” असं का म्हणतात ??

रासायनिकदृष्ट्या मेंदूचा मनाशी संबंध असला तरी, प्रत्यक्षात मन हृदयाच्याच अधिक जवळ असते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे झाले तर आपण हृदयाचे चित्र काढतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर थेट परिणाम करतात. प्रेमामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाच्या Stress Hormone ची पातळी कमी होते. यामुळे हृदयगती कमी होऊन रक्त प्रवाह सुधारतो. अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. तणाव दूर होऊन स्नायूंना आराम मिळतो.

प्रेमात Oxytocin चा स्तर वाढतो, जे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. जसं जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुल एकमेकाशी जोडले जाते, अगदी तसेच नात्यात सुद्धा ऑक्सीटोसिन महत्वाची भूमिका निभावते. शांततेची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप अधिक चांगली लागते. मनात आनंदाची भावना Dopamine मुळे निर्माण होते. यामुळे ऊर्जा, एकाग्रता वाढते आणि एकाकीपणाची भावना कमी होते. प्रेमात हे अगदी सहज घडते.

आता प्रश्न असा की, हे सर्व घडते ते कोणत्या प्रेमामुळे ? तारुण्यातील प्रेम की अन्य कोणते प्रेम ??

तसं प्रेम हा आजवरचा सर्वाधिक संदिग्ध शब्द आहे. शब्दात व्यक्त करणे अशक्य असले तरी त्यात सौंदर्य, समाधान, समज, निस्वार्थीपणा, परिपक्वता, काळजी, सामर्थ्य, सकारात्मकता यांचा समावेश आहे.

इतरांवरील प्रेमाची सुरुवात स्वतःवरील प्रेमाने होते. जे लोक स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, त्यांना इतरांवर प्रेम करणे कठीण जाते. प्रेम कसे करावे ? हे शिकणे तिथून सुरू होते. प्रेम करणे म्हणजे पुढच्या व्यक्तीचा जसा आहे तसा, त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकार करणे.

असे केल्याने काय होते ? जगातील सर्वात अमूल्य गोष्ट आपल्याला लाभते, ते म्हणजे आंतरिक समाधान ! ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडतो. जे मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचेल त्या मार्गाने अथक प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला प्रेम केल्याने सहज मिळते.

सध्याच्या बहुतांश जीवनशैलीजन्य आजारांची (उदा- वंध्यत्व, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश इ. ) अनेकजण अनेक कारणे सांगत असले तरी, ‘प्रेमाचा अभाव’ हेही एक प्रमुख कारण त्यांच्या मुळाशी आहे. प्रेम हे तंत्रज्ञान वा औषध नसल्याने डॉक्टर ते लिहून देऊ शकत नाही, आणि ते विकतही मिळत नाही. अन्यथा या आजारांसाठी आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरजच पडली नसती.

आज ‘व्हॅलेटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुधारण्याची आपल्याला सुसंधी आहे. मनात राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. प्रेमाच्या मार्गाने असे हृदय आपण विकसित करू शकलो तर जन्माचे कल्याण होते. अन्यथा; जन्माला आला अन् मरून गेला… एवढेच घडते !

HàPPY Vålentine’s DåY

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड- मो ९४२३२६७४९२

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments