प्रा. सुनंदा पाटील
विविधा
☆ पालवी ते पानगळ… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
श्रीराम जयराम जयजयराम……
श्रीराम जन्मोत्सवाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
सध्या रामजन्मोत्सव होय रामजन्मोत्सवच, जयंती नव्हे, साजरा करताना अधिक आनंद होतोय. कारण प्रभू आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच मंडळी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतेय. न्यू इयर साठी नाही. हॅपी न्यू इयर म्हणून हाय करणे ही संस्कृती आपली नव्हे. तर तो केवळ उपचार आहे. मोठ्यांना नमस्कार करून शुभेच्छा देणे आणि लहानांना आशीर्वाद देणे. वाकून मोठ्यांचा पदस्पर्श करणे यातही शास्त्र आहे. विज्ञान आहे. अशा तऱ्हेने शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात. हा संस्कार आहे. संस्कृती आहे. यातही शास्त्र आहेच ना? गुढीपाडवा कसा साजरा करायचा वगैरे सर्व गोष्टी प्रत्येकाच्या घरातली वडील माणसं सांगतातच. पण खरंच चैत्र महिनाच वर्षाचा प्रथम महिना का ?
शिशिर ऋतूत झडलेली पानं आपण बघतो ! झाडांना चैत्रात नवी पालवी फुटायला लागते. मानवी जीवनातली निसर्गाने सांगितलेली ही फार मोठी गोष्ट आहे तत्वज्ञान आहे. यातच येतो गुढी पाडवा. श्री राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव ! चैत्रगौर ! आंब्याची डाळ, पन्हं घेऊन !
दिवसा सूर्य अतिउच्च शिखरावरून टळटळू लागतो. पृथ्वीवरील पाणी, जेवढे शक्य असेल तेवढे वाफेच्या रूपात घेऊन जातो. तशातही टेम्भरे, करवंद, चारोळी, जांभूळ ही फळं निसर्गामध्ये देतच असतो. हा वर्षाचा प्रथम मास लवकर संपून न जावा असं वाटत असतानाच वैशाख येतो. कैरी जाते. तो आंबा घेऊन येतो. ऊन असतं पण फणस, आंबा, कोकम हवेहवेसे वाटतात ना? लगेच आगमन होतं जेष्ठाचं !
कडक ऊन. आणि मोसमी पूर्व थोडासा पाऊस. सृष्टी भाजून निघते. आणि पावसाची वाट बघणं सुरू होतं.
ढगांच्या गडगडासह, विजेच्या रोषनाईत नंतर आगमन होतं ते आषाढाचं. आर्द्रा नक्षत्र आपलं अक्राळ विक्राळ रूप दाखवू लागतं. पावसानं मस्त जोर धरलेला असतो. कारण हे सर्व पाणी जमिनीत मुरायला हवं असतं. झाडांना वर्षभर पुरायला हवं असतं. नदी नाले तलाव भरून ओसंडून वाहू लागतात. बळीराजा आनंदून जातो. लहानखुऱ्या पावसात त्याने पिकाची सुरुवात केलेली असते. आता यथेच्छ पाणी पिऊन पिकं मोठी होऊ लागतात.
माणसानंही असंच वागायला हवं. आपल्या योग्य वयात म्हणजे वयाची सोळा वर्ष पूर्ण करताच आपली ध्येये ठरवायला हवीत. पंधरा ते पंचेचाळीस हा खरा कालावधी शिक्षणाचा आणि हवं ते मिळविण्याचा. झपाटून अभ्यास, कष्ट करण्याचा. हे वय साध्य नव्हे तर, विद्यार्थी मित्रांनो साधन आहे. आषाढासारखं.
अतिपावसाचा कंटाळा आला असं म्हणावं लागू नये म्हणून की, काय लगेचच हिरव्या ऋतूचं आगमन होतं. अर्थातच श्रावणाचं. हिरवागार शालू नेसून एखादी नववधू विवाहासाठी तयार होऊन बसावी, तसा हा वर्षातला पाचवा महिना ! अधूनमधून पावसाची सर, मधेच पडणारं पिवळंधम्म उन्ह, आकाशाला तोरण बांधणारं इंद्रधनुष्य. सणांची रेलचेल !सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावणमास !
श्रावणातल्या धरणीचं लग्न लागलेलं असतं. तसं आषाढातच. भाद्रपदात झाडं, वेली वाढू लागतात. हळूहळू वेलींना फुलं येऊ लागतात. फळं लगडतात. सारा निसर्गच लेकुरवाळा होऊन जातो. ही लहान लहान लेकरं निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू लागताच लगेच किंचितशी थंडीची चाहूल लागते.
खरंच की ! थंडीची चाहूल म्हणजेच आश्विनाची सुरुवात. अंगा खांद्यावर फिरणारी पिल्लं शाळेत जाऊ लागावीत. तरूण नवरा – बायकोने आपल्या सुखी संसाराची तजवीज करावी, असा वयाच्या तीस – पस्तीशीतला दृष्टीकोन ठेवणारा अश्विन महिना. पिकं डोलू लागतात. ती खराब होऊ नयेत म्हणून, शेतकरी आई होऊन काळजी घेऊ लागतो. पिकातली कीड काढून टाकून शेत निकोप कसं होईल याची काळजी घेतो. किती समजूतदार आहे नाही निसर्ग ?
माणसाची चाळीशी येते. संसार बऱ्यापैकी स्थिरावलेला असतो. मुलांना वाट दाखवायची असते. घरदार, जमापुंजी हळूहळू वाढायला लागते. अगदी असंच रूप धारण करुन कार्तिक महिना येतो. पस्तीशीतल्या जाणत्या देखण्या स्त्रीसारखा. आश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन करून वेगवेगळे संकल्प करण्यासाठी येते ती बलिप्रतिपदा. हे व्यापऱ्यांचं नवीन वर्ष असतं बरं का?
नंतर हळूच आगमन होतं ते मार्गशीर्षाचं ! थंडीनं कळस गाठलेला असतो. तुम्ही आता स्थिरावलात. म्हणून सूर्य दाक्षिणेची काळजी घ्यायला दक्षिणायनात दाखल झालेला असतो. तब्येतीला आता जरासं जपायचं असतं. निसर्गही सारं जपू लागतो. धान्याच्या राशी घरात येतात. चार पैसे हातात खुळखुळू लागतात. गरज आणि सुखाची कल्पना संपून, मन चैनीकडे झुकावं, तसा हा वर्षातला ” शीर्ष महिना ” पुढल्या जन्मासाठी काही ठेव करून ठेवावी असं सांगणारा.
शेतकरी नाही का, पीक निघताच त्यातलं निखळ असं धान्य दुसऱ्या वर्षाच्या बीजाई साठी काढून ठेवतो ? अगदी तसाच. आमच्या वयाची साठीची अटकळ बांधणारा आणि सांधणारा हा मार्गशीर्ष सरता सरताच आगमन होतं ते पौषाचं.
पौषाचा पूर्वार्ध कडाक्याच्या थंडीचा. पण थोडंसं ऊन जाणवणारा. साठीच्या पुढल्या किंचितशा तब्येतीच्या कुरबुरी सुरु असाव्यात अगदी तसाच. तीळसंक्रांतीला तीळ गुळ, गाजर, बोरं, ऊस खाऊ घालणारा. सुखी असा !
आम्ही सत्तरीकडे झुकतो. तसा निसर्गात दाखल होतो माघ महिना. संपन्न पण जरासा काळजीचा. आमचीही मुलं आता संसारात रमणारी, मोठी झालेली असतात. आमच्या वानप्रस्थाच्या गोष्टी सुरु झालेल्या असतात. पण पैशाची ऊब आणि बऱ्यापैकी तब्येत एवढ्यातच वानप्रस्थ स्विकारू देत नाही. म्हणून कानटोपी घालून का होईना, आमचा मॉर्निंग वॉक सुरु असतोच. पण माणसाने तग धरायची तरी किती ? शेवटी शरीरच ते !
कुणाच्या आयुष्याचा शिशिर माघातच सुरु होतो. गळू लागतात काही पानं ! हळूच आणि नकळत फाल्गुन आयुष्यात प्रवेशतो. होळीच्या रूपाने आयुष्यातली किल्मिषं, कटूपणा, वाईटपणा, जाळून टाकणारा हा महिना. यावेळी मला माझ्या तिसऱ्या वर्गातल्या कवितेचं एक कडवं आठवतं.
“उदासवाणा शिशिर ऋतू ये पाने पिवळी पडतात
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झरझर झरझर गळतात
झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात
दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास “
नवीन पालवीला जागा देण्यासाठी जुन्यांना गळावं लागतंच. शेवटी निसर्गच तो.
असा आमचा निसर्ग आणि हे बारा महिने / सहा ऋतू ! आयुष्यात खूप काही शिकवून जातात. कधी ते जीवन शिक्षण असतं ! कधी तत्वज्ञान । कधी रसग्रहण । तर कधी संगीत, ताल, लय, नृत्य । कधी रंग, कधी चित्रकला । भांडार आहे नुसतं ज्ञानाचं ! अगदी प्रतिपदा ते अमावस्या किंवा पौर्णिमा या पंधरा तिथ्यांना सुद्धा कुठलातरी सण आहे. पुढे कधीतरी तेही बोलूच.
पण आम्ही सध्या इकडेच पाठ फिरवतोय. दरवाजाच्या बाहेर पडून डोंगर /पर्वत कसे दिसतात ते आम्ही बघत नाही. म्हणून तर आमची मुलं आज रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरलाच पर्वत समजाहेत. निसर्गात शुद्ध हवा आहे हे एसीत जगणाऱ्यांना कळतच नाही. रेनकोट घालून पाऊस अनुभवता येत नाही आणि बूट घालून, हिरवे गालीचे समजत नाहीत. सिमेंटच्या छतातून चांदण्यांचं आकाश दिसत नाही.
तर असे हे चैत्रादी बारा महिने. यांचा इथे केवळ वरवर धांडोळा घेतलाय. या वर्षातला प्रत्येक दिवस आमचा गुरू आहे. काहीतरी शिकवणारा आहे, आणि याच गुरूला आम्ही आज पारखे झालो आहोत.
अर्थात याला कुणी खुळेपणाही म्हणतील. पण मंडळी स्वतःच्या आईला कुणी मावशी म्हणतं का? नाही ना ? असे आत्या, मामी, काकी, मावशी साऱ्यांचा आदरसत्कार जरूर करायला हवा. पण आपले महिने, आपलं वर्ष, आपल्या तिथ्या, संस्कृती, भाषा याचा आदर करायला आधी शिका ! कारण ती आपली आई आहे.
आता शिशिराचा शेवट आलाय. एखादं पान शंभरी पार करून नव्या पालवीसोबत दिसेलही. पण खरंच ही गळकी पानंही नव्यांना जागा करून देतात. स्वतः गळून पडतात. पण ती पिवळी पानंही आनंदाने गिरकी घेत घेत खाली येतात, तसंच माणसांनही रडत कुढत शेवट जवळ करण्यापेक्षा हसत करायला हवा. कारण हे निसर्गाचं चक्र आहे. नववर्ष आलंय.
” सहा ऋतूंचे चाक फिरतसे शिशिर ऋतूही जाईल हा
वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा “
वसंत ऋतू सुरू झालाय. त्याच्याच हातात हात घालून चैत्राचं आगमन झालंय. या चैत्रप्रतिपदेला ब्रह्मध्वजा उभारून ते साजरं करा. काही दृढ संकल्प करा. पुढल्या आश्विन, कार्तिक, मार्गशीर्षात आनंदोत्सव साजरे करायचे असतील, तर त्याची तजवीज आतापासूनच करा. कुणाला ” हॅपी न्यू इयर ” न म्हणता वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा द्या ! म्हणा – – – –
गुढीपाडवा : आनंद वाढवा इथून पुढे वर्षभर आपले सर्व सण आनंदाने साजरे करू या !
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈