सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
आपण कधी कधी अगतिक आणि अहसाय होतो ना? त्या दिवशी माझी तशीच अवस्था झाली होती. डेंटिस्ट डॉक्टरांकडे त्या खुर्चीत मी बसले होते आ ऽ ऽ वासून. माझ्या दाढेच्या पोकळीचे ख ss र करून कोरीव काम चालले होते. तेवढ्यात डॉक्टरांचा एक मित्र आला. माझ्या दाताचे ड्रिलिंग करता करता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
त्या मित्राचा मुलगा नुकताच M.B.B.S झाला होता आणिलगेच एका सरकारी दवाखान्यात जॉबही मिळाला होता. त्या आनंदा प्रित्यर्थ्य या मित्राला पेढे द्यायला तो आला होता.
बातमी चांगली होती म्हणजे काय खूपच चांगली होती. डिग्री मिळताच जॉब? वॉव! या मध्ये मी अस्वस्थ होण्यासारख – काहीच नव्हते. पण त्यांचे पुढचे बोलणे ऐकून माझा मेंदू हादरायला लागला.” आता काही काळजी नाही बघ. अरे, सरकारी दवाखान्यात काम असते कुठे आता? पण पगाराची निश्चिंती. अरे असा जावई मिळवायला आमच्या घरी रांग लागल रांग ! कपाटापासून गॅस शेगडी पर्यंत सगळ देतात जावयाला. आम्हाला काही चिंता नाही बघ.”
हे ऐकल्यावर त्याची मेडिकल कॉलेजला अॅडमिशन कशी झाली असेल ? तो पास कसा झाला असेल याहीपेक्षा त्याच्याकडे पेशंट आला तर त्याचे कसे व्हायचे या विचाराने माझ्या दाढेची पोकळीच काय मेंदूही हादरायला लागला.
मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे सगळे घरदार अलर्ट. मुलांवर घारीसारखी नजर असते पालकांची. त्याचे कॉलेज किती ते किती? कलासच्या वेळा कोणत्या? त्यानुसार आई आपल्या कामाचे नियोजन करत असते. एका मैत्रिणीच्या मुलाचा हा अनुभव. क्लासच्या एका परीक्षेमध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले होते. पण त्या सरांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्याचा तपासलेला पेपर त्याला न दाखवता त्याला त्यांनी ही उत्तरं बघून लिहिलीस हे कबूल कर नाहीतर तुला घरी सोडणार नाही अशी तंबी दिली. तो सारखे सांगत होता मी अभ्यास करून, नबघता पेपर सोडवलाय. पण सरांना ते काही केल्या पटत नव्हते. तासभर बिचारा उभा! सर काही केल्या त्याला घरी जाऊ देईनात. त्याला खूप भूक लागली होती. शेवटी कळवळून तो सरांना म्हणाला,” सर, तुम्ही सांगता म्हणून म्हणतो मी पेपर बघून सोडवला.” कॉपी न करता त्याला तसे बोलावे लागल. इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आई काळजीत. आल्यावर त्याने खरे कारण सांगितले तरी तिलाही ते पटेना. या मानसिक दोलायमान अवस्थेत त्याचे आठ दहा दिवस अस्थिरतेत गेले. आता तोच मुलगा आपल्या मेरिटवर हिमतीवर चांगली नोकरी मिळवून परदेशात स्थिर झालाय. काय विचार करायचा आपण आणि काय निष्कर्ष काढायचा यातून?
आपण मोठ मोठे अभिनेते इतके पाहतो की त्यांनी मेडिकलच शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते सोडून देऊन अभिनया कडे वळले आणि ते क्षेत्र गाजवल. कोणी इंजिनियरींगची डिग्री मिळवून गायनाकडे वळले आणि प्रसिद्ध गायक बनले. या लोकांनी सांगितलेले समर्थन न पटण्यासारखे असते. एका गरीब, हुशार, होतकरू मुलाला तुमच्या शिक्षणाचे पैसे तरी द्यायचे ना, त्याचे आख्खे घर वर आले असते. त्याची बुद्धि आणि वेळ धडपड करण्यात जाऊन त्याचे आयुष्य कष्टात काळजी करण्यात गेले नसते. कितीतरी मुली सुद्धा बारावीला चांगले मार्क्स पडले म्हणून मुलींच्या कोट्यामधून इंजिनियरींगला अॅडमिशन मिळवतात आणि लग्न झाल्यावर आमच्याकडे नोकरी केलेली आवडत नाही म्हणून घरी बसतात. हे आधी नाही का समजत? पण कोण, कुणाला आणि कसे सांगणार ?
असे आपल्या अवती भोवती कितीतरी प्रश्न निर्माण होत असतात. डोक्याभोवती पिंगा घालून आपल्याला त्रस्त करत असतात. आपणच का विचार करत रहातो असेही वाटते. कितीतरी गोष्टी काही केल्या पटत नाहीत. तरी आपण गप्प बसतो.
बघा, पटलं तर
व्हय म्हणा.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈