श्री मुबारक उमराणी
☆ विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆
प्रिय कवितेस,
सप्रेम नमस्कार
अलीकडे आधुनिकीकरणामुळे पत्र म्हणजे दुर्मिळ. म्हणून मी ठरवलं मेसेज वगैरे कारण्यापेक्षा सरळ पत्र पाठवावे! आणि हे पत्र पहिलचं आहे. मला जसं जमलं समजलं तसं लिहिलं, चुकलं तर माफी असावी. शारदेच्या पदकमली रममाण होणा-या विणेच्या झंकारातून शब्द बद्ध होणा-या, कधी आसवातून बरसणा-या, कधी हास्यातून फुलणा-या, कधी मुक्त विहार करणा-या, कधी कारण नसतांना निराशेच्या गर्द खाईत नेणा-या शब्दात तूच लपलिस. तू कशी आहेस माहित नाहीस, हवेततरंगणाऱ्या, सळसळणा-या झाडांच्या पानात तूचआहेस, वेळूच्या बेटात मस्तपैकी शिळ घालत कान्हांच्या बासरीतून मंत्रमुग्ध विहार करणा-या वनराईच्या गाईच्या गळ्यातील घुंगुर माळांच्या नादमयी सुरात, मेंढपाळ्यांच्या काळ्या गर्द घोंगडीत त्याच्या दिडक्या चालीत आणि त्या रानभर चरणा- या मेंढरांच्या आवाजातील नाद मोहून टाकतो. सुंबरान मांडताना ढोलाच्या, टाळांच्या, कैताळाच्या नादमयी पायातील हालचाल, अंग अंग हेलकावे खाणारे त्यांचे देह पटक्याचा सोगा वा-यावर भूरभूरताना अबीर गुलालात माळून गेलेल्या चेह-यावरील हास-या भावात तूच आहेस.
सकाळच्या काकडं आरतीत गाव सारं जागं करतांना अंग अंग प्रत्येकाच्या मनात देवत्वाचा भास तूच निर्माण करून, दिवसभरात काम करणा-याची उमेद, जि्द्द त्यातून निर्माण होणारी स्नेहरूपी वात्सल्यातही तूच आहेस. घमानं चिंब निजलेला हमाल पाठीवर असह्य वजन असतांना चालताना त्यांच्या तोंडी “जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणांचा वाजतो” म्हणता असह्य वजन कुठल्या कुठे पळून जाते अन् तो हवेत तरंगल्यासारखा चालायला, पळायला,हसायला लागतो. हे सर्व कविते, तुझ्यामूळेचं नाही का?
पण कधी कधी सुन्न करणा-या घटना घडतात तेंव्हा “रक्ताळले शरीर भडका जीवात झाला आईस सोडवाया येणार कोण बोला”.अशी आर्त हाक मारणारी तूच असतेस. तूच असतेसं होनाजी बाळा, आण्णाभाऊ साठे, बहिणाई, पी.सावळाराम, पठ्ठे बापूराव, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाई, संत नामदेव, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड शाहिरांची ललकारी, केशवसुतांची तुतारी, कवीच्या कवितेत, लेखकांच्या लेखनित तुच,फक्त आम्ही नाममात्र असतो.
आभाळभर गरजणा-या काळ्या ढगातील वीज तूच असतेस ढगांना बोलके करणारा “मेघदूत” आम्ही कसे विसरेन? काळ्याकुट्ट अंधारात. रात किड्यांच्या रातभर गुजंन करण्यात तूच सूरमयी होतीस. चंद्राचा प्रकाश शितलतेचा स्पर्श करतांना होणारी शितलतेची जाणीवात तूच नाही का असतेस. सकाळी क्षितीज फुटते तांबडे तेंव्हा आभाळभर पसरून प्रकाश गीत गायेस, किती रूपे! हळूवार रंग बेरंगी फुलणा-या पाखरांच्या चिवचिवाटात तूच जन्म घेऊन जगण्याची खुद्द देतेस. तुझे कितीही कसेही वर्णन केले तरी अपूर्णच! !
हिरव्यागार माळरानात रानफुलांच्या रंगात रंगून दवबिंदूच्या मोत्यांची रास रचून सर्वाचं परिसर मोतीमय करतेस. पतंग उडविणा-या निरागस मुलांत, वा-यावर उडणा-या पतंगाच्या मांज्यात आगळाच स्वर तूच निर्माण करतेस. माळभर आनंदाची उधळण होते. त्यातून गीत निर्माण होतात हे माणसाला, निसर्गाला जगण्याची जिद्द, प्रेरणा, उमेद अन् माणसाला गीत गात गात जगण्याचे शास्त्र शिकवतेस, सागराच्या तळापासून ते आकाशाच्या अनंता पर्यत फक्त तूझेचं गीत घुमत असते.
ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांना तू अजरामर करून सोडलेस किती हे कार्य माणसांच्या पदी भरभरून देतेस, जो गातो तो तरतो, गानकोकिळा लता पासून आजच्या सोनू निगम पर्यताच्या मुखातून लयबद्ध. होऊन त्यांना प्रसिद्धिच्या अती उच्च पदी नेऊन त्यांचा उध्दार करतेस.
गौतमबुध्द, भगवान महावीर, मं. पैंगबर, गुरू नामक, प्रभू येशू, यांच्या मधूर वाणीतून धर्माची शिकवण देणारी तूचं होतीस.
देश भक्ताच्या, सैनिकांच्या, शेतक-याच्या कामगार, साधू संताच्या, कबिराच्या भक्तीत, मीरेच्या तल्लीनतेत, सुरदासच्या भक्तिभावात सा-या, सा-यात तुझाचं जयजयकार होतो.
किती वर्णावे तुज पहाडाच्या गिरीशिखरावर स्थैर्याची,सागर गार्भियांची, नदी, झरे चैतन्य पुष्प जीवनाला सुगंधित बनविण्याची प्रेरणा तूच दिलीस. पक्षी प्राणी यांच्या कंठातून येणा-या आवाजातून सप्तस्वरांची निर्मिती करायला लावलीस. मोरापासून षड्ज, बैलापासून ऋषभ, बोकडापासून गंधार, करकोच्या पासून मध्यम, कोकिळ पंचम, घोडा धैवत, हत्ती निषाद, या सारख्या स्वरांची निर्मिती तुच करून आपलं आगळवेगळ अस्तित्व दाखवलीस या स्वरांना भारतीयांचं दैवत म्हणून आळवतो.
सा- सांब सरस्वती, रे- रघुपति राघव, ग- गणपती, म- महादेव महेश्वर,प- परमेश्वर पशुपतीनाथ, ध- धनेश्वर, नि- निराकार नीळकंठेश्वर आणि संगीत ही मन प्रसंन्न करणारी अद्भूत जादू तुझ्यामुळेचं ऐकतोय आणि या निसर्गातील रंगसंगतीत अधिकचं खुलून दिसतेस. षड्ज होतो कमळासारखा, ऋषभ हिरवा मिश्रित पिवळा, गंधार सोन्यासारखा पिवळा, मध्यम कंद फुला सारखा, पंचम काळी, धैवत पिवळा तर निशाद ठिपक्यांची टिपक्याचा सगळा निसर्गचक्रांत तुझ्यासोबत मग काय कमी आहे बावीस रागांची रचना तर बघा प्राण्यांच्या पायाशी तुलना, धरती मातेला त्या पायांचा स्पर्श, चालताना होणारा एक नांदमय आवाज व्हावा ऐकावा आणि सारे आयुष्य मंगलमय व्हावे म्हणूनचं असेल मोर दोन पाय, बैल चार, बोकड चार, करकोचा दोन, कोकिळ दोन घोडा चार, हत्ती चार असे बावीस रागांची निर्मिती म्हणूनच कविता तू कोणत्याही भाषेत ये तुला नाद, लय, ताल, स्वर, झंकार आहेचं सारी वाद्ये तुझा नाद मधुर करण्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत आहेत. त्या वेळीस संगीताच्या बरोबरीत आम्ही सारे वेडे होतो. थयथय नाचतो. कशाचे भान उरत नाही तू आहेस म्हणूनचं जगण्याला अर्थ आलाय!
आकाशाचा कागद समुद्राची शाई, झाडांची लेखणी केली तरी तुझे गोडवे लेखन करता येणार नाही ते अपूर्णच राहील आणि अपूर्णतेतचं खरं जगणं आहे नाही का? कळत न कळत काही लिहायचे राहून गेलंतर राग मानू नकोस, समजून घे, मला तुझी सेवा करण्याची प्रेरणा दे!
हिचं इच्छा! तुझ्याकडे काही मागणार नाही कारण न मागता तू नेहमीचं मला भरभरून देतेस, हा ओघ असाचं राहो हीच मनोमन कामना!
पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. तुझा जयजयकार सा-या आसमंतात घुमो!
मी सदैव तुझाचं ऋणी राहीन हे ऋण मी कसे फेडू!
तुझाचं सेवक
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈