श्री सतीश स.कुलकर्णी 

अल्प परिचय  
सतीश स. कुलकर्णी : साधारण तीस वर्षांपासून पत्रकारितेत. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकांमध्ये उपसंपादक ते वृत्तसंपादक. तीन वर्षांपासून मुक्त पत्रकारिता व व्यावसायिक लेखन, ब्लॉगलेखन. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ उपक्रमात  khidaki.blogspot.com ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस. ललित लेखनाचे ‘शब्दसंवाद’  पुस्तक प्रकाशित. शब्दांकन, संपादन, पुनःलेखन, मुद्रितशोधन, पुस्तक परिचय आदी काम व्यावसायिक तत्त्वावर करतो.

☆ विविधा : फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆

(डॉ. एडनवाला ह्यांना ‘स्माईल ट्रेन’ चा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.)

अहमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘स्माईल मेकर’ ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३० मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरातील ११, नगरवाला रस्ता पत्त्यावरचा बंगला, हेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी ‘पारशी टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली.

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या ‘ज्युबिली मिशन हॉस्पिटल’ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील ‘चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर’ ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत.

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचार करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे ‘स्माईल ट्रेन’. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचाच एक घटक बनले. त्यांच्या निधनानंतर ‘स्माईल ट्रेन’ ने संकेतस्थळावर विशेष श्रद्धांजली लेख प्रसिद्ध केला.

हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली.  श्री बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अगदी अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

… सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं भेट द्या >> – https://khidaki.blogspot.com/2020/07/Adenwalla.html

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खूप छान व दुर्मिळ माहिती मिळाली.