सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

फादर्स डे☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही गोष्टी चा सुवर्णमध्य हा निश्चितच चांगला असतो. कुठलीही टोकाची भूमिका, मते ही बरेचवेळा चुकीच्या मार्गाने जाण्याची संभावना असते. हा नियम वाढदिवस साजरे करणे, विशिष्ट दिवस साजरे करणे ह्याला लागू पडतो. मान्य आहे काही नाती अशी असतात की त्याला विशिष्ट दिवशीच महत्व असतं अस नसतं पण ते साजरे केले तर तो दिवस ती व्यक्ती, ते नातं आपल्या मनात दिवसभर रुंजी घालून आपला दिवस आनंदात घालवत हे पण खरं.

१६ जून !  फादर्स डे.  मला बाबांची आठवण, त्यांच्या बरोबर घालवलेला काळ हा संपूर्णपणे आठवतो, अजूनही त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून खुप आनंद मिळतो. पण खास करून त्यांच्या वाढदिवशी म्हणा किंवा फादर्स डे ला ते संपूर्ण दिवसभर मनात असतात.

बाबा”हा शब्द दिसायला छोटा, अगदी साधासरळ,सुटसुटीत. पण ह्या इटुकल्या पिटुकल्या शब्दांत काय काय सामावलेलं असतं बघा.ह्या शब्दांत असतं प्रेम,जिव्हाळा, भक्कम आधार, संकटकाळी मौनातून मिळणारा दिलासा.म्हणूनच की काय सहसा मूल जे सुरवातीचे एक दोन शब्द बोलायला शिकतो त्यात”बाबा हा शब्द असतोच असतो.

“बाबा”ही व्यक्ती अशी असते नं तिच्याबद्दल आईवर वा आईशी बोलतो तितकं भरभरून बोलल्या जात नाही .पण मनाचा एक अख्खा पूर्ण कप्पा आपल्या बाबांनी व्यापलेला असतो.त्यांच्याबद्दल भरभरून शब्द बाहेर पडत नाहीत पण मौनातल्या आणि मनातल्या ह्या प्रेमाची,हक्काची,खंबीर पाठींब्याची पकड जबरदस्त असते. बाबा हा प्रत्येकाचा असा नाजूक कोपरा असतो नं मग ते बाबा अति अति विख्यात लता मंगेशकर ह्यांचे असोत की माझ्या सारख्या अति अति सामान्य साधना केळकर हिचे असोत. बाबा इज बाबा !  खरचं वडीलांची जागा आपल्या सगळ्यांसाठीच स्पेशल.

मला नं बाबा असा उल्लेख आला की नेहमी कवी “बी”ह्यांची “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या”ही कविता आठवते. ह्या कवितेचं वर्णन करायचं तर ही भावपूर्ण अर्थ असलेली अफाट लोकप्रियता लाभलेली कविता असं म्हणता येईल.  ह्या कवितेची आठवण म्हणजे आम्हां भावंडांना पाळण्यावर झोपवितांना बाबा त्यांच्या सुरेल आवाजात आम्हाला ऐकवतं. तेव्हा ही कविता बाबांच प्रेम,ते करीत असलेले लाड,त्यांनी केलेले कौतुक झेलीत खूप आवडायची. अर्थ समजायच तेव्हा वयचं नव्हतं. पण ती कविता बाबांनी ऐकविल्याशिवाय आम्हाला झोपच यायची नाही. पुढे बाबा आमच्या मुलांना झोपवितांना,खेळवितांना  ही कविता गायचे तेव्हा त्यातील शब्दनशब्द खरोखरच अंतर्बाह्य हलवून जायचा, ह्यातच ह्या कवितेची महती आली.

माहेरी जातांना प्रत्येक खेपेला आम्ही घरी पोहोचण्याच्या नेमक्या वेळी बाबा व-ह्यांडात पेपर हातात घेऊन बसलेले असतात. हातात पेपर,नजर मात्र रस्त्याकडे,आमची वाट बघत असलेली,कान आमची चाहूल घेत असतात. हे क्षण आम्हा माहेरवाशिणींसाठी लाखमोलाचे बरं का. सहसा मुलांना वडिलांकडून खूप अपेक्षा असतात.पण एका इंटरव्ह्यू मधील अनुराग कश्यप चे वाक्य मनाला खूप भिडून गेले ते म्हणाले,” जितक्या वर्षांचे आपण स्वतः असतो तितक्याच वर्षांचं आपल्या बाबांचं वडीलपणं असतं. आधी ते माणूस असतात मग आपण झाल्यावर ते बाप बनतात”.  खरचं ह्या अँगलने कधी विचारच आला नव्हता मनात. संसारात दोघेही कमावते असले तर एकावर आर्थिक बाबतीत पूर्ण ताण येत नाही.  त्यामुळे बाबा नेहमी त्यांच्या कार्यालयातील सहका-यांना आर्थिक मदत करायचे.अशा कित्येक लोकांच्या अडीनडीला ते धाऊन जात आणि ते ही अगदी कुणालाही न सांगता. त्यांनी केलेली मदत ह्या हाताची ह्या हाताला देखील कळतं नव्हती. जेव्हा ते लोक पैसे परत करुन आभार मानायला येतं तेव्हाच कळायचं. अशात-हेने कित्येक सहका-यांच्या मुलांच्या शिक्षणात तसेच लग्नकार्यात ह्यांच्या मदतीचे योगदान असायचे.

देव कधी भेटला तर एक मागणं नक्कीच .

“आयुष्य कृष्णधवल असलं तरी,

स्वप्नांने रंग आपणच भरावेत,

जन्म कुठलाही मिळाला तरी,

जन्मोजन्मी बाबा मात्र तुम्हीच असावेत,

बाबा मात्र तुम्हीच असावेत।।।।

Happy father’s day Baba

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments