सौ शालिनी जोशी
विविधा
☆ फाल्गुन—- होळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. कांही ठिकाणी हा सण प्रत्येकाच्या घरी, तर काही ठिकाणी गावकरी मिळून साजरा करतात. एरंडाच्या रोपाभोवती लाकडे व गोऱ्या यांची मांडणी करतात. त्याभोवती रांगोळी घालतात व त्याचे दहन करतात. वैयक्तिक सण असेल तर दुपारी अंगणात होळी पेटवून तिची पूजा आरती करतात. प्रदक्षिणा घालतात व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सार्वजनिक होळी ही साधारणपणे संध्याकाळी पेटवितात. पूजा करून नारळ नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी त्या राखेचे गोळे करून मुले खेळतात. खरे पाहता हे अग्निदेवतेचे पूजन आहे.
हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर राजा होऊन गेला. तो घमेंडी, ताकदवान व अहंकारी होता. त्याला देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्यात विष्णूचा तो जास्तच द्वेष करीत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. ही गोष्ट राजाला आवडत नव्हती. कितीही राजाने सांगितले तरी प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. तेव्हा राजाने प्रल्हाद याला दहन करून मारण्यासाठी आपली बहीण ‘होलिका’ हिच्या मांडीवर बसवले. कारण तिला ‘अग्नीपासून भय नाही’ असे वरदान होते. तिने प्रल्हादासह अग्निप्रवेश केला. पण वेगळेच घडले. विष्णू कृपेने होलिकेचे दहन झाले. आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशाप्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. तेव्हापासून होळी हा सण साजरा करतात. वाईट जाळून चांगले आत्मसात करावे हे सांगणारा हा सण. वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. होलिकेच्या दहनाचा दिवस म्हणून होलिकोत्सव.
कोकणातील हा मोठा सण. याला ‘शिमगा’ म्हणतात. हा शेतकऱ्यांचा निवांतपणाचा काळ. शेतीची भाजावळ झाल्यापासून पावसाची वाट बघण्याचा हा काळ. या दिवसात देवांच्या पालख्या गावभर मिरवतात. लोक रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करतात. नृत्य गाण्याचा आनंद घेतात. काही ठिकाणी गावकरी वेगवेगळी सोंगे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. कधी पुरुष स्त्रीवेश धारण करतात. स्पर्धा होतात. मर्दानी खेळ खेळतात. कोळी लोक होडक्याची पूजा करून पारंपारिक नृत्य करतात. आदिवासीही सामुदायिक नृत्य करतात. गावानुसार प्रथा बदलते.
एकमेकातील वादविवाद, द्वेष, राग विसरून सर्व समाजाला एकत्रित आणणारा असा हा सण. भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या या आत्ताच्या काळातील होलिका आहेत. त्यांचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश हा सण देतो. सर्व अशुद्ध भस्मसात करून शुद्ध वातावरण करणारा हा सण. म्हणून ही अग्नीची पूजा.
होळी म्हणजे वसंतऋतुच्या स्वागताचा उत्सव असेही म्हणायला हरकत नाही. जुने दुःख विसरून नवचैतन्याकडे वाटचालयाला शिकणे हाच होळीचा अर्थ.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈