☆ विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले ☆
सकाळपासून गल्लीमध्ये काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती. त्या वृक्षाच्या आसपास ज्यांच्या गाड्या होत्या त्या हलवण्यासाठी सगळ्यांना फोन केले गेले. कुऱ्हाडी, मोठाले दोर घेऊन माणसे झाडाभोवती गोळा झाली होती.. सगळेजण वर बघून बघून निरीक्षण करत होते. अन ते दृश्य बघून माझ्या मनात चर्र झाले.संशयाची पाल मनात चुकचुकली. आम्हा मैत्रिणींना जे होऊ नये असे वाटत होते तेच घडणार होते.
काही वर्षापूर्वी मुद्दाम कोणीही वृक्षारोपण न करता समोरच्या बिल्डींगच्या बाहेर एक इवलेसे झाड वाढायला लागले होते. ना कोणी त्याला पाणी घालत होते, ना कोणी त्याची निगा राखत होते.बघता बघता त्याचे खोड गलेलठ्ठ झाले,वेगाने त्याच्या फांद्या इतस्ततः फैलावत गेल्या. छोट्या-छोट्या हिरव्यागार पानांनी डोळ्यांना गारवा दिला.ते झाड अलगदपणे सावली द्यायला लागलं. रखरखीत उन्हामध्ये जाणा येणाऱ्या ला दोन मिनिटांचा का होईना. पण शांतपणा जाणवायला लागला.
झाडाच्या टोकाला झिप्री गुलाबी नाजूक नाजूक फुले डोलायला लागली. आमच्या मनाला ते झाड आनंद,विसावा,गारवा द्यायला लागलं. पण त्याच वेळी याच वाढलेल्या फांद्या मुळे बिल्डिंग मध्ये अंधार पडायला लागला. झाडाच्या पानांची पानगळ होऊन घरामध्ये उडून येऊन कचरा व्हायला लागला. झाडणार्या म्युनिसिपालिटीच्या कामगारांनाही त्या वाळक्या पानांचा कचरा त्रासदायक व्हायला लागला. रोज त्या झाडाला शिव्या घालत घालत, झाडून वाळलेली पाने त्याच झाडाच्या बुंध्यापाशी जाळायला सुरूवात झाली. बिचारे झाड ते चटके सहन करत होते. आपला देण्याचा स्वभाव ते सोडत नव्हते की चटके देणाऱ्याला शिव्याशाप मुळीच देत नव्हते.
एकदा अशीच एक माकडांची टोळी आली. त्या झाडावर उड्या मारुन मारुन धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये त्यांनी हैदोस घातला आणि झाडाबद्दल चा लोकांचा दुस्वास वाढायला लागला. सगळ्यांना ते नकोसे झाले. त्या झाडाच्या सावली पेक्षा,त्या शीतल गारव्या पेक्षा लोकांच्या डोळ्यांमध्ये तिरस्काराचे अंगारे फुलत गेले.
अखेर बहुमताचा विजय झाला आणि त्या आमच्या लाडक्या,डेरेदार हिरव्यागार वृक्षावर सपासप कुऱ्हाड चालवायला सुरुवात झाली.बघता बघता झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या.वेदनांचे घाव झेलत तो वृक्ष निर्दयी माणसापुढे शरण येऊन आपली होणारी कत्तल मुकाट्याने सहन करत होता. ज्या इवल्याशा रूपाचे डेरेदार वृक्षा मध्ये रूपांतर व्हायलाअनेक वर्षे लागली,तोच डेरेदार वृक्ष बिना फांद्यांचा बोका बोका दिसायला लागला काही तासांमध्ये!
हाच तो वृक्ष होता जो हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेत होता आणि आम्हाला हवा असलेला ऑक्सिजन फुकट देत होता. जो आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने आपले अन्न आपणच बनवत होता. त्यांनी आमच्याकडे कधीही भीक मागितली नव्हती, “द्या हो आम्हाला खायला. द्या हो आम्हाला पाणी प्यायला”. आपल्या मुळां वाटे आपल्यालालागणारे पाणी आपल्या पण तो मिळवत होता. उंच उंच गेलेल्या फांद्यांच्या शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोहोचवत होता.
त्याच उंचीपर्यंत पाणी घेण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर लागते. त्यासाठीचे बिल आम्ही भरतो. एक पैसाही खर्च न करता आपली गरज तो आपणच पूर्ण करत होता. आम्हाला सावली देत होता पण आम्हाला त्याचे हे फायदे, तो उपयोग कधीच दिसला नाही.
एक मताने झाडावर कुऱ्हाड मारून मारून संध्याकाळपर्यंत त्या महान वृक्षाचे होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मोठमोठाल्या लाकडांचा खच पडला होता. निष्प्राण पाने जमिनीवर झोपली होती. पानांचे, फांद्यांचे, खोडाचे श्वास घेणे पूर्णपणे थांबले होते. आता फक्त निर्जीव लाकडे झाली होती.संध्याकाळ पर्यंत टेम्पो मधून लाकडाचे ओंडके भरून भरून नेले गेले. निर्जीव हिरवी पाने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांनी आणखीनच मारून टाकली.
अंधार पडला, रात्र झाली. झाडाच्या त्या रिकाम्या रिकाम्या जागेला मी मनोमन श्रद्धांजली वाहिली. “किती जरी तुझा त्रास झाला तरी तू आम्हाला सावली दिली होतीस रे! आमच्या डोळ्यांना तुझ्या हिरवाईने गारवा दिला होतास.”
रात्री लवकर झोप लागेना. तो प्रचंड वृक्ष डोळ्यासमोरून हलत नव्हता. तेवढ्यात माझ्या कानाशी कोणी कुजबुजले, “अगं वेडे,.. नको मनाला लावून घेऊ. आमचे संपूर्ण आयुष्यच तुमच्याच साठी आहे. आम्ही हवा शुद्ध करतो, तुम्हाला फुले फळे देतो, सावली देतो. थोडं स्पष्ट बोलतो वाईट वाटून घेऊ नको, टेम्पो मधून जी सगळे लाकडे भरून ने ली गेली ना, ती सुद्धा तुमच्या शेवटी तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. तुला एक सांगतो तुझ्या घरी एक फुलझाड लाव ना ! येईनच मी तुला भेटायला फुलांच्या रूपात.
इवलेसे रोप माझ्या स्वप्नांमध्ये रुजले आणि वाढायला लागले.
© सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈