श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ फुंकर ☆ श्री अरविंद लिमये☆

कोणत्याही जखमेची वेदना कमी करायला एक हळूवार फुंकरही पुरेशी असते. मग ती जखम शरीरावरची असो वा मनावरची. तत्परतेने केलेली मलमपट्टी जखम लवकर भरुन येण्यासाठी आवश्यकअसते. एरवी जखम चिघळत जाते. हे चिघळणं वेदनादायीच असतं. जखम झालेल्याइतकंच जखम करणाऱ्यासाठीही. म्हणूनच जखम झालीच तर ती चिघळू न देण्याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.

चिघळणं म्हणजे विकोपाला जाणं. चिघळलेल्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या, तरी जखमेचा कोरला गेलेला व्रण मात्र जखमेच्या जन्मखूणेसारखा कायम रहातो.

मनावरील जखमा बऱ्या झाल्यानंतरचे हे असे व्रण मात्र जखम बरी झाली तरी त्या जखमेच्या वेदनेसारखे दीर्घकाळ ठसठसतच रहातात. नात्यातलं आपलेपण मग हळूहळू विरु लागतं

नाती रक्ताची असोत, वा जुळलेली किंवा जोडलेली असोत, वा निखळ मैत्रीची असोत ती अलवारपणे जपणं महत्त्वाचं. जपणं म्हणजे जखमा होऊ न देणं आणि झाल्याच तर त्या चिघळू न देणं. यासाठी गरज असते ती परस्पर सामंजस्याची.

व्यक्ति तितक्या प्रकृती हे मुलभूत तत्त्व हाच कोणत्याही नात्याचा पाया असायला हवा. मग परस्पर सामंजस्य आपसूकच आकार घेईल, आणि नात्यानाही सुबक आकार येत जाईल.

परस्पर सामंजस्य म्हणजे वेगळं कांही नसतंच.  दुसऱ्यालाही आपल्यासारखंच मन असतं आणि मतही हे कधीच न विसरणं म्हणजेच परस्पर सामंजस्य. कधीकधी असूही शकतो दुसऱ्याचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळा तरीही कदाचित तोच बरोबरसुध्दा हे मनोमन एकदा स्विकारलं की मतभेद कायम राहिले तरी मनभेदाला तिथे थारा नसेल.  मनभेद नसले तर मनावर नकळत ओरखडे ओढलेच जाणार नाहीत.  दुखावलेपणाच्या जखमाच नसतील तर मग त्या चिघळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तरीही नकळत,  अनवधानाने दुखावलं गेलंच कुणी कधी, तरीही त्या दु:खावर फक्त आपुलकीच्या स्पर्शाची एक हळूवार फुंकरही दु:ख नाहीसं व्हायला पुरेशी ठरेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments