डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ फजिती झाली…. पण…. ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
असं म्हणतात की दर पाच कोसावर बोलीभाषा बदलते. आणि प्रत्येक भाषेला एक स्वतःचा स्व-भाव असतो. अशातच माझ्या बाबतीत “मराठीने केला मालवणी भ्रतार” अशी अवस्था! त्यामुळे लनानंतर मी अत्यंत शुद्ध(?) अशा पुणेरी मराठीतून एकदम सुद्ध मालवणी भाषेच्या प्रदेशात येऊन पडले आणि अक्षरशः धडपडले. कारण ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अस्सल मालवणी माणसांशी रोजचाच संपर्क! त्यामुळे घडलेल्या फजितीचे हे किस्से!
अगदी सुरुवातीला जेव्हा गर्भवती महिला तपासायला यायच्या तेव्हा आमच्यात घडणारे संवाद-
मी:- यापूर्वी कुठे दाखवले होते का?
रुग्णा:- हो, आमेरिक!
मी:- (आश्चर्याने तिला नखशिखांत न्याहाळत) अमेरिका? तुमचे मिस्टर तिकडे असतात का? रुग्णा:- नाय! आमचे मिशेश(?) हडेच असत.
मी:- मग तुमचे माहेर तिकडे का?
रुग्णा:- नाय! माझा मायार दोडामार्गाक!
मी:- (हैराण होऊन) बरं बरं.. तिकडचे काही तपासणीचे कागद आहेत का?
रुग्णा:- ह्या बघा तडेचा कार्ड( असं म्हणत आपले प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिलेले कार्ड पुढे करते)
मी:- हा हा, म्हणजे तुम्ही सरकारी दवाखान्यात तपासले होते तर…
रुग्णा:- ताच सांगलय मा मगाशी? आमेरिक म्हणून!
मग मला उलगडा झाला की आमच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‛आंबेरी’ नावाच्या गावात आहे. त्यामुळे आंबेरीला असे सांगताना या बायका मालवणी भाषेत ‛आंबेरीक’ असे म्हणत आणि मला तो उच्चार अमेरिकेसारखा वाटे.
असेच एकदा साधारण आठ- नऊ वर्षांच्या दोन मुली आल्या. त्यांच्या- माझ्यातील हा संवाद-
मुलगी:- आयेन आपडीची गोळी देऊक सांगलय.
मी:- (गोंधळून) कसल्या गोळ्या?
मुलगी:- (जवळ येऊन कुजबुजत) आपडीच्या ओ…
मला तर “आपडी- थापडी गुळाची पापडी…” हा खेळच आठवू लागला. माझ्या चेहऱ्यावरील गोंधळलेले हे भाव तिथेच बसलेल्या आणि डॉक्टर असणाऱ्या माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी हसत – हसत एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद माझ्याकडे सरकवला. तेव्हा माझा चेहरा अगदी आरशात पाहण्यासारखा झाला होता. कारण ‛आपडी’ म्हणजे ‛मासिक पाळी’ या नवीन शब्दाची माझ्या डिक्शनरीत नव्यानेच भर पडली होती.
आता मात्र मी पूर्णपणे मालवणी भाषा अवगत केली आहे. तरीसुद्धा रुग्णांची म्हणून एक वेगळीच परिभाषा असते. त्यातलाच हा एक नमुना-
रुग्ण:- बाईनु, गेल्या खेपेक तुम्ही ‛भुनी बुंदी ‘ दिला होतास ना तेना माका एकदम बरा वाटलला. ताच द्या माका.
मी:- अरे, तुला एवढा पित्ताचा त्रास होत असताना मी कशाला तुला बुंदी देईन? आणि असलं काही मी दवाखान्यात कशाला ठेवेन?
रुग्ण:- तुमीच तर दिल्यात.तडे मेडिकलातसून घेवूक चिठ्ठी दिललास. त्याच्याबरोबर खयचो तरी गूळ पण होता.
(हे सर्व ऐकून आपण डॉक्टर नसून हलवाई आहोत की काय अशी मला शंका येऊ लागली.) तेवढ्यात त्याने आधीचे प्रिस्क्रिप्शन काढून समोर ठेवले. त्यावरची नावे बघून मी कपाळाला हात लावला व मुकाट्याने पुन्हा नवीन प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली. कारण ती औषधे होती- भूनिंबादि काढा आणि योगराज गुग्गुळ!
सध्या या दीड- दोन वर्षात कोविडमुळे आम्हाला पेशंट लांबूनच तपासावे लागत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना येणाऱ्या रुग्णांची मानसिकता बघता इंजेक्शन नाही आणि प्रत्यक्ष हात लावून तपासणी नाही म्हणजे ‛डॉक्टराक फुकट पैसे देना’ असा समज! अशीच एक रुग्णा व डॉक्टर यामधील घडलेला हा प्रत्यक्ष किस्सा-
डॉ. :- काय गे, हल्ली बरी असस वाटता. बरेच दिवसांनी इलस!
त्यावर बाईचा जवाब इतका लाजवाब होता की बाकीचे रुग्ण डॉक्टरांकडे जरा वेगळ्याच नजरेने बघू लागले आणि डॉक्टरना आता धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले.
बाई:- काय करूचा येवून? तुम्ही काय आमका हात पन लावनास नाय काय जवळ पन घेनास नाय.
आता काय बोलणार? ! ! !
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈