सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
“लाजू दंगा नको कलू… आनि त्या गुबूगुबू बालाला धक्का का देतोछ…पलेल ना तो” काही वर्षांपूर्वी आमच्या घरात या आणि अशा पूर्ण बोबड्या वाक्यांची तोफ झाडली जायची. वर्गातल्या बाई… एक ओढणी ची साडी नेसलेल्या…. म्हणजेच माझी चार वर्षाची चिमुरडी मैत्रीण शाळा शाळा खेळत असायची. हॉलच्या मध्यभागी वर्तमानपत्रा सोबत येणाऱ्या वीस-बावीस पुरवण्या उभ्या आडव्या रांगेत व्यवस्थित लावून वर्ग सजलेला असायचा. एकीकडे कोपर्यात देवघरातील घंटा आणि एक-दोन वह्या पण ठेवलेल्या असायच्या.ज्या पुरवणीवर जे चित्र असेल ते त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव.मी सुद्धा त्या वर्गातील एक विद्यार्थिनी असायचे.पण माझे स्टेटस जरा वेगळे.. त्यामुळे मला सोफ्यावर बसणे अलाऊड असायचे आणि मधून मधून इकडे तिकडे जाणे पण!
घंटा वाजायची.. शाळा सुरू व्हायची. नंतर “छुनिता तू छगल्यांना प्लालथना छांग.” बाईंची ऑर्डर यायची. प्रार्थनेनंतर मग आमच्या बाई हजेरी घ्यायच्या
“व्यायाम कलनाला मुलगा.. झोपाल्यावल बछलेली मुलगी…. छोतं गुबुगुबू बाल… छोनाली.. लाजू…..” अन् सगळ्यात शेवटी “छुनीता गदले!”
सर्वांची मी हजर- हजर म्हणत प्रॉक्सी हजेरी लावायचे.
सकाळची ऑफिस, कॉलेज वाल्यांची गडबड संपलेली असायची आणि मी निर्धास्तपणे मोबाईल मध्ये गर्क व्हायचे. इकडे बाईंचा बोबड्या बोलात अभ्यास, बडबड गीते असं रुटीन चालू असायचं. पण मध्येच
“छुनीता, नो मोबाईल.. अभ्याछ कल अभ्याछ..! पलिच्छा तोंदावल आलीय.” असा ओरडा पण मला खावा लागायचा.
मग मधली सुट्टी व्हायची. डबा खात बसलेल्या मुलांच्या डब्यातील पदार्थ चेक करताना बाईंच्या तोंडाचा पट्टा चालू असायचा. “लोज छांगते ना, पोली भाजी आना.. छक्ती देनाले पदाल्थ आना म्हनून!… हे कुलकुले, मॅगी अछले जंकफूद आनू नका… उद्यापाछून मी तुमाला छिक्छाच कलनाले.”
कधी शाळा लवकर सुटायची. तर कधी दोन -तीन तास चालायची. बाईंची गुंजणारी अधिकारवाणी ऐकू न आल्यामुळे जरा हॉल मध्ये डोकावून पाहिलं तर बाई आपली साडी सोडून त्याचे पांघरूण करून सोफ्यावर आरामात झोपून गेलेल्या असायच्या. आता ती मैत्रिण मोठी झाली आणि आमच्या मैत्रीत अंतर पडले.
माझी एक दुसरी बाल मैत्रिण कायम स्वयंपाक घरातच घुटमळते. नेहमी आजी जवळ राहते. शनिवारी-रविवारी आई-बाबांकडे! तिचे खेळ वेगळेच असतात. ती कधी भाजीवाली… कधी हॉटेल वाली.. कधी इस्त्री वाली.. कधी धुणीभांडी करणारी मावशी… तर कधी आई -बाबां- बाळ खेळातलीआई ! तासन् तास ती या खेळात रमते. कधी माझ्या ऑर्डर प्रमाणे साउथ इंडियन.. चायनीज.. इटालियन.. पंजाबी जेवणाचे पार्सल मला पाठवून देते. मोजून पैसे घेते. कधी माझं संबोधन आजी, कधी काकू, तर कधी वहिनी, मॅम…. वगैरे वगैरे… ते तिच्या व्यवसायाप्रमाणे बदलत असते. अगदी बोबड-कांदा नाहीये, पण र, ट, ठ,ड वगैरे कठिण अक्षर जरा वर्जच!
“वयनी लादी पुसते.पण आज कपले नाही धुनाल.आज माझं अंग थनकतंय… घली जाऊन औषध घेऊन झोपनाल… काल माझ्या नवल्यानं मला माललं बघा…उगीचच… आमतीत मीथ कमी पललं तल मालतात काअशं?”… तिच्या चेहऱ्यावरचे भाव,शब्दातून प्रकट होणारं व्यथित मन, मला फार काही सांगून जात असतं. ती वठवणाऱ्या सगळ्याच भूमिकेतील तिचा अभिनय, कल्पनाशक्ती खरंच दाद देण्यासारखीच असते. मोठेपणी ती छान अभिनेत्री बनेल असा मला विश्वास वाटतो.
पण तिच्या आईला केवढं टेन्शन!”काकू हिला कधी कळणार हो. एक दिवशी तिनं आपलं रडगाणं सुरू केलं. “हिला कित्ती पोएम, बडबड गीतं मी शिकवलीत. नको तेव्हा म्हणते. पण आमच्या दोघांच्या ऑफिसातले सहकारी.. चार-पाच जण.. आले होते. हिला पोएम म्हणण्यासाठी किती आग्रह झाला. पण ही पठ्ठी त्यांच्यासमोर चक्क झाडू- फरशी करायला लागली. खेडवळ भाषेत बोलायला लागली.आम्हाला इतकं लाजल्यासारखं झालं. दोन्ही घरात ढिगानं खेळणी आहेत. पण ही त्यांना हात पण लावत नाही.
“मग तिनं काय करायला हवंअशी तुझी अपेक्षा आहे?
अगं या लॉक डाऊनमुळं तिनं अजून शाळेचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही.तिला मित्र-मैत्रिणी नाहीएत. आजी कडं मजेने राहते.कधी हट्ट नाही कि रडणं नाही आणि सगळीच मुलं आपण गाणं म्हण म्हटलं की म्हणतातच असं नाही. नाही तिला निर्जीव खेळण्यात इंटरेस्ट. पण तू तिची स्मरण शक्ती, तिचा अभिनय पाहिला नाहीस का? समोर जी माणसे दिसतात,जसे वागतात,त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन.. त्या भूमिकेत शिरणं ही साधीसुधी गोष्ट नाही. तिचा हा गुण तुला कधी जाणवला नाही? हे असं कायम नाही राहणार. चिंता करू नको. मोठी झाली की ती आणखी वेगळ्या वेगळ्या भूमिकेत वावरु लागलेली दिसेल. तिच्या कलागुणांना प्रोत्साहन दे. आणि तिला सायकॉलॉजिस्टकडं घेऊन जाऊन कौन्सलिंग करुन घेण्याचा वेडा विचार सोडून दे. तू स्वतःचं बालपण आठव आणि आईच्या भूमिकेत शिरुन तिला समजून घे.”माझं
बोलणं बहुतेक तिला पटल्या सारखं वाटलं.
… क्रमशः
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈