सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
माझी तिच्याच एवढी आणखी एक चिमुकली मैत्रीण!… तिचा जास्तीत जास्त मुक्काम आमच्या बागेत असतो. सकाळी- सकाळी हातात एक कुंडा घेऊन आमच्या बागेत बकुळीची फुलं वेचायला जेव्हा ती येते तेव्हा तिला स्वेटर घालण्यासाठी परत पाठवावं लागतं. थंडीने नुसती कुडकुडत असते बिचारी. मला जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा बकुळीच्या फुलांचे गजरे करणं हे आमचं आवडतं काम असतं.काही झाडांच्या मोठ्या पानांना काड्या टोचून पत्रावळी, द्रोण बनवणं तिला खूप आवडतं….तिच्याआजीकडून ती शिकलीय ते करायला…. मग खोटी खोटी देवपूजा आणि पाठोपाठ पत्रावळीवर नैवेद्य ठेवणं हे तर आलंच.
ती परी कल्पनात मग्न असते. परिकथा तिला फार आवडतात.खूप घेराचा छानसा फ्रॉक घातलेली ,मोकळ्या कुरळ्या केसांवर फुला फुलांचा हेअर बँड लावलेली ,बागेत फुलं, पानं निरखत कल्पनेतल्या फुलपाखरांबरोबर ,पक्षांबरोबरहितगुज करणारी ही वनकन्यका खूपच लोभस दिसते.
“तू मोठेपणी कोण होणार?” ” परीराणी” तिचं उत्तर असतं. तर इतर दोघींची उत्तरं असतात, “मी तिचल होनाल, “मी आई होनाल. असाच एक माझा छोटा मित्र, तो जरा याबाबतीत कन्फ्युज्डच असतो. “मी बार्बर होणार ..नाही नाही मी मेकॅनिक…नाहीतर प्लंबरच होणार.” तो सांगतो. उच्चारात बोबडे पणा नाही, स्पष्ट साफ आवाजात तो आपल्या भावी करिअरचा प्लॅन सांगतो….. अजाणतेपणाने!
.. त्याला राजा राणीच्या गोष्टी नाही आवडत.चिऊ-काऊच्या गोष्टीची तो वाट लावून टाकतो.”शेण म्हणजे काय?मेण म्हणजे काय?म्हातारीआजी भोपळ्यात कशी मावेल?” असे त्याचे प्रश्न असतात. पक्षी, प्राणी, जनावरे बोलतात,यावर त्याचा विश्वास नाहीय. त्यामुळे इसापाच्या नीतिकथा फेल! त्याला अगदी व्यावहारिक म्हणजे फुगेवाला,ट्रॅफिक पोलीस,रस्त्यावर भटकणारा कुत्रा अशा कुणाचीही जुळवून रंजक केलेली गोष्ट आवडते.
त्याचे सगळे खेळ मैदानी असतात. त्याच्या बरोबर मला फुटबॉल,बास्केटबॉल, क्रिकेट असले खेळ खेळावे लागतात… आणि कायम त्याला जिंकुनही द्यावे लागते. मुद्दामच थकल्याचं नाटक करत मी खाली बसले की “तुझे पाय चेपून देतो” म्हणत पाय चेपता चेपता हळूहळू माझ्या मांडीवर डोके ठेवून तो झोपी जातो. त्याचा चेहरा पाहताना सुख सुख म्हणजे दुसरे काय? ते हेच असा विचार मनात येऊन मला आनंद वाटतो.
छोट्या मुलांना माझ्याबरोबर खेळायला आवडते आणि मलाही त्यांच्याबरोबर खेळायला. ते आपल्या भावविश्वात मला घेऊन जातात .त्यांची सुखदुःखे माझ्याबरोबर शेअर करतात आणि त्यांच्या सहवासात मी माझी प्रापंचिक शारीरिक-मानसिक दुःखं विसरून जाते.
वयाने सत्तरी ओलांडलेली मी मनाने लहान होऊन जाते. कधी वास्तवाची जाणीव झाली की माझं म्हातारपण मला डिवचू लागतं. पण त्याला न जुमानता देवाजवळ मी हेच मागणे मागते, ‘देवा मनानं का होईना मला बालपणातच ठेव. मला बालपण उपभोगू दे. ते सुख तू माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ नकोस.’
समाप्त
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈