☆ विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

“भाषा” म्हणजे काय? त्याची उत्पत्ती, व्याख्या,ई ,क्लिष्ट चर्चेत न शिरता व्यावहारिक वापराचा विचार करुया.

भाषेची नाळ जोडली जाते ती “बोलणे” शी. बोलणे म्हणजे तरी काय? तर अभिव्यक्ती विचारांची आणि भावनांची मौखिक अभिव्यक्ती.

“देहबोली” हे पण अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण भाषाविरहित. मौखिक अभिव्यक्ती माणुस सोडुन ईतर प्राणिमात्रांमध्येही असते, कुत्र्यांचे भुंकणे, गाईम्हशींचे हंबरणे, वाघांची डरकाळी, भुंग्यांचा गुंजारव,पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डराव डराव, पालीचे चुकचुकणे, थी त्यांची भाषा असते असे म्हणतात.

माणसाने भाषेचा वापर केंव्हा, कसा सुरू केला यासाठी यासाठी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास तर नक्कीच करावा लागेल. पण तूर्तास भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे, सर्वश्रेष्ठ वरदान आहे असे अनुभवाने सिध्द केले आहे.

आपला भारत बहुभाषिक देश,.तरीही भाषा म्हटले की आवर्जुन प्राधान्य दिले जाते ते मातृभाषेलाच, मायबोलीलाच.

आपली मायमराठी, महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, समृध्द आणि संपन्न भाषा असे गर्वाने म्हणावेसे वाटते, तिच्या विविध रंगांचा, प्रत्येक रंगातील विभिन्न छटांवर  धावता दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न. उदाहरणे अनेक देता येतील पण शब्दसंख्येवरील मर्यादेमुळे तो मोह टाळावा आहे.

महाराष्ट्रातील मराठी म्हटले तरी वर्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी, खानदेशी, कोकणी, पुणेरी, मुंबईची, मराठवाड्याची असे अनेक रंग, आणि ढंग आढळतात. हिंदीची घुसखोरी, दुहेरी क्रियापदांमधे वापर अशी नागपुरी. फेटा घातलेली, थोडीशी रांगडी, कानडी शिडकावा म्हणजे कोल्हापुरी, वरुन काहीशी कडक वाटली तरी आतुन प्रेमळ, तिथल्या नारळासारखीच कोकणी, त्यातही मालवणी वेगळीच, वाक्यात किमान २, ४ शब्द ईंग्रजी किंवा हिंदी अगदी मस्त अशी मुंबईची, सोलापुरी तर न्यायची धाटणी, अन् सांस्कृतिक पगडी घातलेली पुणेरी, अनेक रंगातील अनेक छटा असल्या तरी प्रत्येकाचा बाज तेवढाच आकर्षक, तेवढाच रुबाबदार.

काळाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की बदलत्या काळाबरोबर शिक्षण,सांस्कृतिक जडणघडण, रीती रिवाज जसे बदलत गेले तसे भाषेचा पेहरावाही बदलणे स्वाभाविक होते, फार मागे जाऊया नको, २०व्या शतकात वापरले जाणारे अनेक शब्द आज कालबाह्य झाले आहेत. जसे, सदरा, पोलके, शेगडी, आणि ईतर अनेक, आजच्या आधुनिक मराठीत अनेक शब्द ईतर भाषेतून येऊन इतके रुळले आहेत कीअमराठी आहेत हे नविन पिढीला पटत नाही.

प्रत्येक व्यवसायाची पेशाची  भाषेची खासियत वेगवेगळी असते, वकील, डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, कारखानदार,व्यापारी,.प्रत्येक पेशात परत बारीकसारीक फेरफार असतातच,व्यापारी म्हटला तरी_कपडे,सोनेचांदी, भांडी,किराणा,धान्य,ई प्रमाणे,भाषा बदल होतोच,

राजकारण,समाजकारण,यातील भाषा वेगळी,तर संरक्षणदल,पोलिस दल इथली वेगळीच.

नैसर्गिक भेद किंवा इतरही काही कारण असेल पण स्त्री पुरूष यांच्या भाषेचा पोतही खुप वेगळा असतो, भाषा ही केवळ मौखिक अभिव्यक्ती ची मक्तेदारी नाही, लिखीत अभिव्यक्ती साहित्य क्षेत्रात लेखनाच्या रणांगणावर भाषेची भूमिका सरसेनापती असते, लेखकाच्या लेखनाचे यशापयश भाषेवरच अवलंबून असते,

साहित्य मग ते कोणतेही, कोणाचेही, कशाशीही संबंधित असो, त्याप्रमाणे लेखकाला शब्दरूपी शस्त्र वापरावे लागते, संत साहित्यात टाळचिपळी, तर बालसाहित्यातील चेंडुफळी असते.

कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, अतिलघु, लघुत्तम,लघु,दीर्घ,रहस्य,ई कथा,ललित,सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, ई लेख, प्रवासवर्णन, विविध काव्यप्रकार,अशा बहुविध साहित्य प्रकाराप्रमाणे, भाषेचा रंगढंग बदलत जातो,आणि आमची मराठी मायेच्या ममतेने  सर्वांना आकंठ दुग्धपान देते.

कुठेतरी वाचलेले आठवते, “भाषा सरस्वती त्यांच्यापुढे शब्द घेऊन ऊभी रहाते, आणि शब्दही माझा वापर केंव्हा करणार याची चातकासारखी वाट पहातात” धन्य ते साहित्यिक आणि त्यांच्या अजरामर कलाकृती, अशांपैकीच एक मान्यवर  कवि कुसुमाग्रज त्यांना कोटी कोटी प्रणाम,  शब्दरूप फुलांची ही माला सविनय,सादर अर्पण.

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

पुणे,

मो 9403862565,  9209301430

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments