डाॅ. व्यंकटेश जंबगी
☆ विविधा ☆ ब्रम्हवादी याज्ञवल्क्य मुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆
” याज्ञवल्क्य” या शब्दाचा अर्थ-ब्रम्हवादी ऋषी, जनक राजाचे गुरू, याज्ञवल्क्य स्मृतीचे रचणारे !
भारताच्या वैदिक काळात हे एक मोठे दार्शनिक होऊन गेले.ते कर्मकांडाचे पुरस्कर्ते होते.त्याना यज्ञ,याग,होय,हवन इ.चे विशेष ज्ञान होते.ते अत्यंत ब्रम्हनिष्ठ होते.श्रीमद् भागवत पुराणानुसार महर्षि व्यास यांनी वेदाचे विषयानुसार ४ भाग केले.म्हणून व्यास मुनिना “वेदव्यास”असेहि म्हणतात.व्यासांनी पैल मुनिना ऋग्वेद, वैशंपायन यांना यजुर्वेद, जैमिनीना सामवेद आणि अथर्ववेद सुमंतु या आपल्या शिष्यांना शिकविला.याज्ञवल्क्य हे वैशंपायन यांचे शिष्य होते.ते यजुर्वेदाचे अध्ययन करीत होते.एक दिवस वैशंपायनाना राग आला, त्यांनी याज्ञवल्क्याना शिकलेला भाग परत देण्याची आज्ञा केली.याज्ञवल्कांनी तो भाग ओकून परत दिला.काही मुनींनी तो “तित्तर”पक्ष्यांचे रुप घेऊन ग्रहण केला.तीच तैत्तरीय शाखा झाली.तेव्हा याज्ञवल्क्य यांनी “मी मानवाला गुरू करणार नाही”अशी प्रतिज्ञा केली.सूर्याची उपासना केली.सूर्यदेव प्रसन्न झाले.त्यांनी घोड्याच्या रूपाने प्रकट होऊन यजुर्वेदाचे ज्ञान दिले.हाच शुक्ल यजुर्वेद होय.(संदर्भ:भा.पु.१२वा स्कंध,६वा अध्याय, श्लोक ७३,७४)
याज्ञवल्क्य यांना दोन पत्न्या होत्या.एक मैत्रेयी आणि दुसरी भारद्वाज ऋषी कन्या कात्यायनी.मैत्रेयीने पतिकडून ब्रम्हविद्या ग्रहण केली.कात्यायनीला तीन पुत्र होते.
एकदा जनक राजाने ब्रम्हनिष्ठ गुरूच्या शोधासाठी,अशा मुनिना सोन्याने मढविलेल्या गायी देण्याची घोषणा केली.याज्ञवल्कांनी शिष्यांना गायी आपल्या आश्रमाकडे वळविण्यास सांगितल्या.एवढा त्यांचा आत्मविश्वास होता.परंतु गार्गी नावाच्या विदुषीने आधी त्यांना शास्त्रार्थ करण्याचे आवाहन केले.या दोघांचा प्रश्नोत्तराच्या रुपाने जो संवाद झाला,तेच”बृहदारण्यकोपनिषद” होय.यात अत्यंत जटील प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्यांनी दिली आहेत.
याज्ञवल्क्य यांचे प्रसिद्ध ग्रंथ-
१) शतपथ ब्राह्मण २) याज्ञवल्क्य स्मृती ३) याज्ञवल्क्य शिक्षा ४) प्रतिज्ञा सूत्र ५) योगी याज्ञवल्क्य.
त्यांच्या स्मृतीला वंदन करून येथे थांबतो.
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈