श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ बसंत की बहार आई ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

संक्रांत आली. तीळगूळ देता-घेता आणि गुळाची पोळी खाता खाता अंगात ऊब येत गेली. सक्रांत आली,  म्हणता म्हणता रथतसप्तमीही जवळ आली. रथसप्तमी येते पौष शुद्ध सप्तमीला. ही तिथी सूर्यपूजेची तिथी. माझ्या लहानपणी आजी,  आई, मामी अंगणात तीन दगडांची चूल करायच्या. चुलीवर मातीचं बुडकुलं ठेवायचं. त्यात भरून दूध घालायचं. खाली काटक्यांचा जाळ करायचा. मग ते दूध उतू जाऊ द्यायचं. तो सूर्याला दाखवलेला नैवेद्य असे. सजीव सृष्टी साकारण्यासाठी सूर्य हा महत्वाचा घटक. आता सूर्यदेव अधीक प्रखरतेने तापणार आणि थंडीला दूर पळवणार म्हणून हा त्याला नैवेद्य. अंगणात सूर्याचा रथ,  त्याचे सात घोडे वगैरे रांगोळीही काढली जायची.

लहानपणी पाठ केलेलं होतं,  वर्षाचे महिने बारा. चैत्र, वैशाख….. ते  माघ, फाल्गुन आणि वर्षाचे ऋतु सहा. वसंत,  ग्रीष्म,  वर्षा,  शरद,  हेमंत,  शिशीर. या पाठांतरात प्रत्येक ऋतुला दोन दोन महिने दिलेले. त्यात मार्गशीर्ष, पौष हे महिने हेमंताचे. हा ऋतू पानगळीचा. पुढचे माघ, फाल्गून हे महिने शिशिराचे. तोही थंडीचाच ऋतू मानला जायचा. ऊब आणि उष्णता वसंताबरोबर येणार. त्याचे आगमन चैत्र पाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आता हे सारं जितक्या काटेकोरपणे पाठ केलेलं होतं,  तितका काटेकोरपणा काही सृष्टीत घडताना प्रत्यक्षात दिसत नाही. साधारण रथसप्तमी सरली की थंडी कमी होऊ लागते. शिवरात्रीला ती आणखी कमी होते आणि होळीबरोबर तर ती पळूनच जाते. ‘होळी आली थंडी पळाली’, असंच लोक म्हणायचे. थंडी पळते पण त्याच्या आगे-मागे सृष्टीतही स्थित्यंतर घडू लागते.

साधारण माघापासूनच पानगळीने खराटा झालेल्या झाडांवर आधी हिरवी लव, नंतर कोवळी पालवी हसू,  खेळू,  नाचू लागते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यातून, गुजराथ,  मध्य प्रदेश,  राजस्थान इ. ठिकाणी लोक माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात आणि त्यांच्या दृष्टीने वसंताचे आगमनही तेव्हाच होते. ऋतूंचा सांधा जणू या महिन्यात बदलतो.

  ‘मिठी मातीला मारून    पाने ढाळितात आसू

   वर हासतात फुले     शाश्वताचं दिव्य हसू’

तेव्हापासूनच उमटणार्‍या वसंताच्या पाउलखुणा पुढे ठळक होत जातात. फाल्गुनात हे पुष्पवैभव परम उत्कर्षाला जाऊन पोचते. पळस,  पांगारा,  शेवरी फुलफुलून  येतात. त्यांच्या तजेलदार केशरी,  नारिंगी, लाल – गुलाबी रंगामुळे त्यांना जंगलातील अग्निशीखा असं म्हणतात. काही निष्पर्ण,  तर काही सपर्ण झाडांवरचा हा रंगोत्सव डोळ्यांवर जादू करतो. मग माणसेही रंगात न्हाऊन निघतात. त्यासाठीच तर संस्कृतीने होळी-रंगपंचमी यासारखे सण योजलेत. उत्तरेकडे पूर्वी पळसापासून रंग तयार करायचे. हे नैसर्गिक रंग पक्के पण हानीकारक मुळीच नसायचे. हे रंग एकमेकांवर उडवायचे. अनंद, उल्हासात निसर्गाच्या रंगोत्सवात सामील व्हायचं. उत्तरेकडे म्हंटली जाणारी फागू (फाल्गून) गीते वसंताचं स्वागत करणारी. सृष्टीने धारण केलेल्या नव्या रुपाची वर्णनं करणारी.

महाराष्ट्रात असं रंगात रंगणं होतं रंगपंचमीला. होळीत जुना कचरा जाळून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगात रंगून जायचं.

चैत्रात वसंत ऋतू एखाद्या सम्राटासारखा चराचरावर अधिराज्य गाजवतो. आता ऊन कडक होतं. वरून आग ओतली जातेय की काय असं वाटू लागतं. अशा वेळी पळस फुलांकडे पाहताना वाटतं,

`वणवा पेटला पेटला   पळसफुलांनी   पाकळ्यांवर झेलला.’

याच दिवसात जाई,  जुई,  मोगरा,  चमेली,  सायलीसारखी नाजूक फुले वेलींवर, झुडुपांवर ऊतऊतून येतात. वाटतं,

‘किती आवेग फुलांचे    वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही     उभ्या उन्हात जाळते.’

या काळात उन्हाच्या झळांनी देह-मनाची काहिली काहिली होते पण वार्‍याच्या झुळुकीबरोबर येणारी सुगंधी लकेर सारं निववून, शांतवून जाते. वर्षभर दुर्लक्षित असलेला बहावा आपल्या अंगावर सोनमाळा धारण करत,  येणार्‍या-जाणार्‍याचे लक्ष वेधून घेतो.

‘किती कशा भाजतात    उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ      बहाव्याच्या फुलमाळा’

बघता बघता वैशाख सरत येतो. आपले पुष्पवैभव आवरून आणि सृष्टीचे आधिराज्य ग्रिष्माकडे सोपवून वसंत निघून जातो. फुले मातीत मिसळली आहेत खरी,  पण त्यांचं शाश्वताचं हासू काही लोपलेलं नाही. ते फळांच्या रसातून हसतेच आहे.

टीप – यातील कवितांच्या ओळी माझ्या स्वत:च्या आहेत. – उज्ज्वला केळकर

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments