श्री प्रमोद वामन वर्तक
अल्प परिचय !
जन्म – 29 डिसेंबर 1953
नोकरी – व्यवसाय 2012 मधे VRS घेवून RBI मधून निवृत्त !
साहित्य निर्मिती –
- RBI मधे असतांना बँकेच्या हाऊस मॅगझीन मधून (Without Reserve) इंग्रजी कविता प्रसिद्ध.
- RBI मधील ‘मराठी वांग्मय मंडळाच्या’ बोर्डवर त्या त्या वेळच्या चालू घडामोडीवर विनोदी टीका टिप्पणी करणारे लेखन. RBI स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित एकांकिका लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक.
- RBI मधून निवृत्त झाल्यावर सुमारे दोनशेच्या वर कविता, चारोळ्या, ललीत लेख व विनोदी प्रहसन यांचे लेखन.
- “सिंगापूर मराठी मंडळाच्या” अंकातून कविता प्रसिद्ध. तसेच त्यानी आयोजित केलेल्या कविता स्पर्धेत कवितेची निवड आणि त्याचा मधुराणी प्रभुलकर आयोजित “कवितेचे पान – सिंगापूर !” या web series मधे छोटया मुलाखतीसह समावेश !
विविधा
??? बैठक !???? श्री प्रमोद वामन वर्तक
मी तरुण असतांना (अर्थात वयाने !) जे काही शब्द प्रचलित होते, त्यातील “बैठक” हा शब्द, सांप्रतकाळी नामशेष झाल्यात जमा आहे !
“अहो जोशी काकू, तुम्ही तो नवीन आणलेला फ्लॉवर पॉट द्याल का आज संध्याकाळी, थोडा वेळासाठी ?” “हो न्या की, त्यात काय विचारायचं मेलं ? आज काही खास आहे वाटत घरी ?” “अहो, आमच्या सुमीच्या लग्नाची ‘बैठक’ आहे संध्याकाळी !”
असे संवाद त्या काळी, लग्न सराईत म्हणजे लग्नाच्या सीझन मध्ये चाळी चाळीतून ऐकायला मिळत असतं ! या संवादात फक्त फ्लॉवर पॉटची जागा दुसऱ्याकडच्या, दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूने घेतलेली असायची, एवढाच काय तो फरक ! आणि हो त्या काळी लग्नाचा सीझन असायचा बरं का ! आत्ता सारखे दोन्ही पक्षांना सोयीचा मुहूर्त काढून, लग्न उरकण्याचा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता !
लग्न जमल्यावर, म्हणजे रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन, एकमेकांची पसंती झाल्यावर, लग्नाची ही “बैठक” साधारणपणे मुलीच्या घरी एखाद्या रविवारच्या सकाळी होत असे ! ही बैठक एकदाची यशस्वी झाली, की त्याच संध्याकाळी भावी जोडपे फिरायला जायला मोकळे ! या अशा लग्नापूर्वीच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोचलेल्या “बैठकी” पर्यंत, एकदा जमणाऱ्या लग्नाची गाडी आली, की भावी वधूपित्याला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत असे ! कारण नंतर कुठल्याच कारणाने असे “बैठकी” पर्यंत जमत आलेलं लग्न, देण्या घेण्यावरून मोडल्याची उदाहरण हातावर मोजण्या एवढी सुद्धा नसायची !
“ताई, उद्या माझी रजा हाय !” आमच्या कामवाल्या बाईने, सौ.ला एका सुप्रभाती आल्या आल्या, काम सुरु करायच्या आधीच, हसऱ्या चेहऱ्याने ही ललकारी दिली ! ते ऐकून सौ ने पण तिच्या इतक्याच, पण त्रासिक चेहऱ्याने तिला विचारलं, “अग मालू उद्या मधेच गं कसली तुझी रजा ?” यावर तिने लगेच हातातले भांडे हातातच ठेवून, नमस्कार केला आणि उत्तरली “उद्या आमच्या ‘तिरकाल न्यानी बाबांची बैठक’ हाय !” “बैठक म्हणजे ? तुझ्या त्या बाबांचं लग्न बिग्न ठरलं की काय ?” सौ ने हसत हसत पण खोडकरपणे विचारलं ! “काही तरीच काय ताई, आमचे बाबा अखंड ब्रमचारी हायत म्हटलं !” “अग मग बैठक कसली ते सांगशील का नाही ?” “अवो बाबांची ‘बैठक’ म्हणजे ते परवचन देनार आनी आमी समदी बगत मंडली, ते खाली बैठकीवर बसून ऐकनार !”
तर मंडळी, मालूच्या त्या उच्चारलेल्या वाक्यातील “बैठक” या शब्दाच्या, मला समजलेल्या नव्या अर्थाने, माझ्या शब्दांच्या ज्ञानाची बैठक थोडी विस्तारली !
“आजच्या ‘बैठकीत’ बुवांचा आवाज जरा कणसूरच लागला, नाही ?” शास्त्रीय संगीताची खाजगी बैठक संपल्यावर बाहेर पडतांना, असे संवाद कधी कधी कानावर येतात ! यात कणसूर म्हणजे नक्की काय, हे माझ्या सारख्या कान सम्राटाला, तीच बुवांची बैठक खूपच आवडल्यामुळे कळतंच नाही ! कदाचित माझी शास्त्रीय संगीताच्या जाणकारीची बैठक, फक्त कानापूर्ती मर्यादित असल्यामुळे असं झालं असावं ! असो !
हल्ली अनेक संघटनांच्या, राजकीय पक्षांच्या चिंतन “बैठका” होण्याचं प्रमाण वाढलं आहे ! अशा चिंतन बैठका मध्ये कसलं चिंतन होतं, ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्या बैठकामधे प्रवेश नसाल्यामुळे कधीच कळू शकत नाही ! हे बरंच आहे ! त्यांच चिंतन त्यांना लखलाभ !
फडावरची लावणी आणि “बैठकीची” लावणी असे दोन प्रकार असतात, असं ऐकून होतो ! हे दोन्ही प्रकार जरी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही, तरी अनेक मराठी तमाशा चित्रपटांनी माझी ही इच्छा पूर्ण केली, हा भाग निराळा ! फडावरच्या लावणीत नृत्यांगना बोर्डावर नाचत नाचत लावणी म्हणते आणि बैठकीच्या लावणीत, ती एकाच जागी बसून हाताची अदा, डोळ्याचे विभ्रम इत्यादी करून लावणी सादर करते !
या दोन्ही प्रकारात मला एक फरक जाणवला तो असा, की ही बैठकीची लावणी सादर करणारी नटी, फडावरील लावणी सादर करणाऱ्या नटी पेक्षा अंगाने थोडी जाडजुडच असते ! किंबहुना माझं आता असं स्पष्ट मत बनलं आहे की, उतारवयात शरीर थोडं स्थूल झालेल्या आणि स्वानुभवातून आलेल्या बौद्धिक बैठकीतून एखाद्या अशा नटीनेच, हा बैठकीच्या लावणीचा प्रकार शोधून काढला असावा ! असली तमाशा बहाद्दरच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील असं मला वाटत !
पूर्वीचे खवय्ये (का खादाड ?) लग्नात जेवण झाल्यावर, त्याच बैठकीत ताटभर जिलब्या किंवा परातभर लाडू संपवत असत, असं मी फक्त ऐकलंय ! असा प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचे भाग्य या पुढे कोणाला बघायला मिळणे दुरापास्त आहे, यात दुमत नसावे !
तसेच एखाद्या पैलवानाने एकाच सत्रात पाच हजार जोर, दंड बैठका काढल्या, ही पण माझी ऐकीव बातमी बरं का ! उगाच खोटं बोलून मी आपल्यातील संवादाची बैठक कशाला मोडू ?
“मग काय राजाभाऊ, येत्या शनिवारी रात्री कुणाच्या घरी ‘बैठक’ ठरली आहे ?” या गजाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नातील “बैठक” या शब्दात नानाविध अर्थ अभिप्रेत आहेत, हे आपल्या सारख्यांना वेगळे सांगायलाच नको ! ज्याने त्याने, आपापल्या बुद्धिमतेच्या बैठकीप्रमाणे त्याचे अर्थ लावावेत आणि आपली बुद्धिमत्तेची बैठक त्या शब्दाच्या मिळणाऱ्या नवनवीन अर्थाने विस्तारावी, ही विनंती !
एखाद्या पुस्तकाची समीक्षा करतांना, साक्षेपी समीक्षक (म्हणजे नक्की कोण ?) त्यात “पुस्तक चांगले उतरले आहे, भाषा चांगली आहे, पण लेखकाच्या विचारांची ‘बैठक’ नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करत्ये, (आता बैठक म्हटल्यावर ती वाटचाल कशी करेल, हे मला न उलगडलेलं कोडं बरं का !) हे शेवट पर्यंत वाचकाला कळतच नाही ! लेखकाच्या स्वतःच्या बौद्धिक विचारांचा, त्याच्या स्वतःच्याच डोक्यात गोंधळ उडालेला दिसतो, हे पुस्तक वाचतांना कळते आणि त्याचे प्रत्यन्तर पुस्तकात पाना पानांत प्रत्ययास येते !” अशी सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बैठकीचा कस पाहणारी बोजड वाक्य हमखास लिहून, हे साक्षेपी समीक्षक वाचकांच्या डोक्यातील गोंधळ आणखी वाढवतात, एवढं मात्र खरं !
“बैठक” या शब्दाचे आणखी बरेच अर्थ जे तुम्हांला ठाऊक असावेत पण मला ठाऊक नाहीत, ही शक्यता आहेच ! तरी आपण ते अर्थ मला योग्य वेळ येताच कळवाल, अशी आशा मनी बाळगतो !
शेवटी, आपली सर्वांची बौद्धिक बैठक, या ना त्या कारणाने नेहमीच उत्तरोत्तर विस्तारत राहो, हीच त्या जगदीशाच्या चरणी माझी प्रार्थना !
© श्री प्रमोद वामन वर्तक
मो – 9892561086
(सिंगापूर) +6594708959
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
झकासच आणि चौफेर !