डाॅ. मेधा फणसळकर
संक्षिप्त परिचय
माणगाव, सिंधुदुर्ग येथे वास्तव्य आणि वैद्यकीय व्यवसाय.
लेखन व वाचनाची आवड. अनेक नियतकालिके, मासिके, दिवाळीअंक यामधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन! ललीतलेखन हा अधिक आवडता लेखनप्रकार! विनोदी लेखनाची आवड! काही कविता, कथा आणि व्यक्तीचित्रणे वेगवेगळ्या अंकातून, इ- अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
☆ विविधा ☆ बंद दरवाजा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆
दोन दिवस या माझ्या स्मार्ट भ्रमणध्वनीने हैराण केले बाई !मी आपली सारखी उचलून उचलून त्याला अंजारुन गोंजारुन इंटरनेटशी सख्य करायला सांगत होते, तो बिचारा माझा सोनूला पण दहा दहा वेळा विनवणी करुन त्याला आपल्या कवेत घ्यायला विनवत होता.पण आज भारत संचार निगमच्या नेटमहाराजानी संप पुकारला होता.बाकीचे नेटकर पण जरा तोऱ्यात असल्याने आखडून दाखवत होते. त्यामुळे माझे कायप्पा (WAP) आणि मुखपुस्तक (fb) पण बिचारे हवालदिल झाले होते. त्यांचे सर्वच दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून मैत्रिणींबरोबर चिवचिवाट, हळूच एकमेकींना private मेसेज टाकून दुसऱ्या एखादीबद्दल गॉसिप करायला न मिळाल्याने आणि सख्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला न मिळाल्याने माझ्या जीवाची नुसती घालमेल होत होती. रोज सकाळी पुन्हा पुन्हा मी त्या भारत संचार ची विनवणी करत होते, पण पठ्ठ्या काही दाद देत नव्हता. शेवटी मनावर दगड ठेवून त्या माझ्या भ्रमणसोन्याला हातातून बाजूला ठेवले आणि ‛आलीया भोगासी’ असे म्हणून कणिक तिंबायला घेतली. सगळा राग तिच्यावर असा काढला की प्रत्येक पोळी तव्यावर टम्म फुगली. त्यावर मुलांचे बाबा म्हणतात कसे, “ चला रे मुलांनो, पट्कन जेवायला बसा. आज आपल्यावर कायप्पा आणि मुखपुस्तकाने कृपा केलीय. गरगरीत पोळी आणि झणझणीत रस्सा खाऊन टाका बरे! परत कधी नशिबात असेल सांगता येणार नाही. ”मला जरा रागच आला. त्याच रागात दणादणा भांडी घासली, खसाखसा ओटा पुसला आणि लख्ख केला. ती टमटमीत पोळी आणि झणझणीत रस्सा रागारागाने गिळला. मग बराच वेळ एकट्या पडलेल्या त्या माझ्या भ्रमणसोन्याला पुन्हा प्रेमाने हातात घेतले. चांगले अंजारले-गोंजारले आणि नेटमहाराजांची आराधना करायला सुरुवात केली .
श्वास रोखून बघत राहिले तर काय आश्चर्य? चक्क नेटमहाराज प्रसन्न झाले आणि सर्व बंद दरवाजे उघडले गेले आणि कायप्पा धबधब्यासारखा कोसळू लागला. मुखपुस्तकाच्या संदेशानी इनबॉक्स भरुन गेला आणि त्या वर्षावात मी चिंबचिंब भिजून गेले.
© डाॅ. मेधा फणसळकर
9423019961
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈