श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ बुरी नजरवाले तेरा मुह काला ☆ श्री अरविंद लिमये ☆

मुल़-मुली बाहेरुन खेळून तिन्हीसांजेला घरी परत आली की त्यांची किंवा घरातल्या तान्ह्या बाळांचीही पूर्वी मीठ-मोहऱ्या ओवाळून ‘दृष्ट’ काढली जायची. परगावाहून घरी आलेल्या मुली-सुनांना उंबऱ्यातच थांबवून त्यांच्या पायांवर पाणी घालून,त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा आणि मगच त्यांना घरात घेतलं जायचं. बाहेरची इडापिडा बाहेरच रहावी,ती त्यांच्यासोबत आंत येऊ नये,त्यांचा त्यांना त्रास होऊ नये ही भावना असलेल्या आणि रुढींनी शिक्कामोर्तब केलेल्या या परंपरा..! जुनं ते सगळं निरर्थक, त्याज्य, अवैज्ञानिक,तथ्यहीन म्हणून हे बऱ्याच प्रमाणात आता कालबाह्य झालेलं आहे.तरीही बराच काळ उलटून गेल्यावर मानसशास्त्राच्या अभ्यासांतर्गत झालेल्या विविध संशोधनातून Negative आणि Positive waves चे आपल्या आरोग्यावर,स्वास्थ्यावर होणारे परिणाम ठळकपणे अधोरेखित होऊन स्विकारले गेल्यानंतर मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतल्या वर उल्लेख केलेल्या आणि आज निरर्थक वाटणाऱ्या प्रथा-परंपरांमागचं विज्ञान नव्याने जाणवतं आणि त्या त्या प्रथा तथ्यहीन नसल्याचं आपल्या लक्षात येतं.

या ‘दृष्ट’ काढण्याच्या संकल्पनेतील ‘दृष्ट’ या शब्दाचा ‘दृष्टी’ याअर्थी थेट संबंध ‘वाईट नजरे’शीच आहे.वाईट नजरेतली  पूर्वी गृहित धरली गेलेली इडा-पिडा म्हणजेच आजच्या विज्ञानाचं समर्थन मिळालेल्या ‘Negative-waves’च. ‘बुरी नजरवाले तेरा मुॅंह काला’ या उक्तीमधे वाईट नजरेचा तिरस्कार ओतप्रोत भरलेला आहे तो यासाठीच.मग या Negative waves घराबाहेर काढून टाकण्यासाठी मीठ-मोहऱ्याच का? यामागेही कांही शास्त्र (म्हणजेच विज्ञान) असणारच. आज अशा कोडी बनून राहिलेल्या आपल्या संस्कृतीतील अनेक परंपरांमागचं विज्ञान जाणून घेण्याचं औत्सुक्यच त्या कोड्या़मधे लपलेलं रहस्य शोधायला आपल्याला उद्युक्त करणारं ठरेल.

इतर चार ज्ञानेंद्रियांच्या तुलनेत आपल्या पंचज्ञानेंद्रियांमधील ‘डोळे’ या ज्ञानेन्द्रियाची खास वैशिष्ट्ये आहेत.डोळ्यांचं वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणांचे असंख्य अलंकार इतर चार ज्ञानेंद्रियांच्या वाट्याला तितक्या प्रमाणात येत नाहीत म्हणून मला ‘डोळे’ वैशिष्टयपूर्ण वाटतात.बघा ना.डोळ्यांसाठी आपण त्यातील भावछटांनुसार किती विविध विशेषणे वापरतो.

डोळे टपोरे असतात.हसरे असतात. डोळे बोलके असतात. खोडकर असतात. तेजस्वी असतात किंवा विझलेले सुध्दा.ते उत्सुक असतात. निराशही कधीकधी. प्रेमळ असतात,तसेच जुलमी न् अधाशीही..!

खरंतर डोळे हे डोळेच असतात.ही जी असंख्य विशेषणं आपण डोळ्यांचे वर्णन करायला म्हणून वापरतो त्यांचे खरे हकदार डोळे नसतातच. खरी हकदार असते त्या डोळ्यांमधली नजर..! डोळे हे या नजरांचे वाहक असतात फक्त.मनातल्या या विविध भावना नि:शब्दपणे तरीही अचूक व्यक्त करत असते ती नजरच.लटका राग असो वा टोकाचा संताप.समाधान,आनंद असो किंवा दुःख, वेदना,घुसमट असो वेळोवेळी या सगळ्या भावना नजरेतून आधी डोळ्यांत उमटतात,मग चेहर्‍यावर पसरतात आणि नंतर शब्दांतून व्यक्त होतात.भावनेच्या तीव्रतेमुळे क्वचित कधी शब्द मुकेच राहिले तरीही नजरेतून व्यक्त होणाऱ्या या भावना त्यांच्या कमी-अधिक तीव्रतेनुसार पाहणाऱ्यापर्यंत           ‘शब्देविण संवाद ‘ साधत अचूक पोचतातच.

या भावना तशा हानीकारक नसतात. याला अपवाद अर्थातच अधाशी डोळ्यांचा. नजरेतल्या अधाशीपणाचा. वरवर विचार केला तर अधाशीपणातून पोटातली भूक व्यक्त होते असा समज आहे. पण मला वाटतं की भुकेलेपण आणि अधाशीपण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण भुकेल्या नजरेत एक प्रकारची अगतिकता असते. व्याकुळता असते. अधाशी नजरेत याचा लवलेशही नसतो. असते फक्त अतृप्ती. अधाशी पणात काठोकाठ भरलेला असतो तो फक्त हव्यास. तिथं ‘आणखी हवं’ ला अंतच नसतो.

अधाशीपणातली भूक अन्नाचीही असते पण फक्त अन्नाचीच नसते.भूक अनेक प्रकारची असू शकते. पैशाची असते, यशाची असते, प्रतिष्ठेची असते, सौंदर्याची असते किंवा वासनेने अंध झालेल्या मनातल्या उपभोगांचीही असते..!

हव्यास आणि अतृप्ती हे अशा अधाशीपणाच्या विकृतीतले समान धागे. अधाशीपण खाण्याच्या बाबतीतलं असेल तर कितीही खाल्लं, पोट भरलं तरी तृप्ती नसतेच. असते अतृप्तीच.तसंच भूक पैशाची असेल तर कितीही पैसा मिळाला तरी समाधान नसते. आपल्यापेक्षा अधिक पैसा मिळणाऱ्यांबद्दल हेवाच असतो मनात.हेच कोणत्याही प्रकारच्या भूकेबाबतचं समान वास्तवच.

अधाशीपणा लालसेने लडबडलेला असतो. तिथे अतृप्तीत भिजलेली वखवख असते फक्त ! हा हव्यास, ही  वखवख अधाशी डोळ्यांमधे ठासून भरलेली असते.ती लपूच शकत नाही. ही अधाशी डोळ्यांमधली नजरच ‘दृष्ट’ लावणारी असते. हे दृष्ट लागणं म्हणजेच इडा-पिडांच्या काळ्या सावल्या..! अधाशी डोळ्यांचं हे लागटपण म्हणजे Negative waves चे वहानच.आणि ‘दृष्ट काढणं’ हा त्यावरचा मानसिक निश्चिंतता देणारा बुऱ्या नजरेवरचा उतारा..!!

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments