?  विविधा ?

☆ बदलूया का थोडं… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

चार खुंट्या ठोकून दोन पाटल्या टाकून अख्ख्या कुटुंबाचं आणि पाहुण्या रावण्यांचं  पण मस्त भागत होतं . तर कुठून ही श्रीमंती आली न मॉड्युलर kitchen चा घाट घराघरात पोचला देव जाणे. अख्खा दिवस जरी राबलं तरी स्वैपाकघर काही स्वच्छ वाटत नाही, काही ना काही उरलेलच असतं, बरं, बाई ची मदत असेल तर ठीक चालू होतं, पण कोविड पासून तोही मदतीचा मार्ग बंद झाला. मागच्या अंगणात टोपलभर भांडी राखेने अन नारळाच्या शेंड्यानी कचाकच घासून व्हायची, खरकटं पाणी अंगणातल्या झाडात पडायचं, आणि कडकडीत उन्हात भांडी मस्त पैकी निर्जंतुक होऊन जायची. आता सिंक च्या टिचभर ओलसर जागेत घासायची अन नुसती पाणी निथळत स्वैपाकघरातच ठेवायची, भांडीच काय पण कपड्यांना पण ऊन लागत नाही, निर्जंतुकीकरण तर दूरच राहिलं.

दिवाळीत सगळ्या गाद्या,उशा दुलया कड कड वाळून व्हायच्या, उन्हात न्हाऊन निघायच्या, आता पापड, मूग वड्या तर सोडाच, धान्यांना उन्हं लागत नाहीत तिथे अंथरूण पांघरूण दूरच राहिले.

सकाळ संध्याकाळ घर झाडून कचरा अंगणातून जरा बाहेर फेकला की सगळं कसं लख्ख व्हायचं, आता त्या पांढऱ्या चकचकीत फरशीवर चार वेळा झाडले अन तीन वेळा पुसले तरी केसांचे भ्रमण मंडळ तर कधी एकटा दुकटां केस,  आरामात लोळत पडून असतात घरभर.

न्हाणीघर वेगळं तर टॉयलेट वेगळं, तेही घरापासून जरा ८ पावलं दूर मागच्या वाड्यात… उंचावर… आणि आता असते किचन च्या भिंतीला लागून ,तेही दोन्ही विधी एकत्र करायची ‘सोय?’ त्यातही एका कुटुंबात २, ३ असे बाथरूम्स … आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगती कडे?

मोठ्या हौशीने अवन (ओव्हन)  घ्यायचं अन फक्त शिळं अन्न गरम करायला वापरायचं, कुणी बरं एवढी दुर्बुद्धी दिली असेल आपल्याला.. काही बोटावर मोजण्याइतके असतीलही हुशार पण उरलेली मेजॉरिटी अशीच.. रीहीटींग वाली…

त्यातही झुरळे जागोजागी, त्या मॉड्युलर किचनच्या कानाकोपऱ्यात, सिंक, अन फ्रिज काय काय म्हणू नवे घ्यावीत… कितीही नायनाट करायचा म्हटलं तरी ह्यांची जनसंख्या नाहीच येत आटोक्यात.. कधी कधी वाटतंय घराचे छप्पर कापून काढावे अन सूर्याला म्हणावं ओत तुझी आग बाबा, होऊ दे सगळं लख्ख..

चार गज लावून अर्धा साडीचा पडदा लावलेली खिडकी पण कमी प्रकाश अन हवा देत नव्हतीच तेव्हाही  आणि आता भल्या मोठ्या स्लाईडिंग खिडक्या… म्हणजे बस घासत काच अन खालची सगळी न निघणारी धूळ माती, दात घासायच्या ब्रश नी … सगळाच गोंधळ..

दिवाळीत एखादा ड्रेस मिळायचा ! मोजून २,४ कपडे… आता ४ कपाटं पण पुरत नाहीत कपडे ठेवायला, वरतून काही प्रसंग आला म्हणजे घालायला काही सापडत नाही हे वेगळेच…एकुलती एक परदेशात वारी करायची म्हटली तरी थर्मल चे २ , ३ सेट माणशी अन त्या महागड्या मोठ्याच्या मोठ्या ब्यागा पण… वैताग नुसता…

पोरांचा वाढदिवस म्हणजे तर विचारूच नका… इतके म्हणून ते बिनकामाचे गिफ्ट जमा होतात जणू गिफ्ट शॉप्सच्या पालन पोषणाची जबाबदारी आपणच घेतलीये… त्यात ते रिटर्न गिफ्ट चे फॅड… हजारोंच्या वर पेन पेन्सिल शार्पनेर अन खोडरबर अन पाऊच अन रंगीत पेंसिल्स … चित्रांची अन रंग भरायची  बुक्स… सगळा कचरा… बरं इतकी सुबत्ता पाहून आपल्या सारखी एका पेनावर जीव लावून वर्षानुवर्षे काढणारी पिढी कशी निपजेल… मग अजूनच चिडचिड! आपलीच घुसमट…एका पिढीत प्रचंड काटकसर तर दुसऱ्या पिढीत प्रचंड सुब्बत्ता, उधळ माधळ… कसे करायचे सहन… बरं  थोडं जुनं थोडं नवं करता करता नाकी नऊ आलेत आता ..

आपण बदलू या का थोडं ?

जेवढं जमेल तेवढं ?  

ते, निदान बर्थडेला पैसे देऊ या, गिफ्ट्स नकोत.. रिटर्न गिफ्ट मध्ये लगेच वापरल्या जातील अशा वस्तू देऊ या, जसे दिवाळी असेल तर ५ दिवे, उन्हाळा असेल तर कॅप, काहीतरी कल्पकता… छोटसं झाड वगैरे… ते प्लास्टिक चे डबे अन अभ्यासाचं साहित्य नको ना आता.. ते पुढच्या ७ पिढ्याना पुरेल इतके झालेत आता सर्वांच्या घरी… अजून काय काय बदलता येऊ शकेल… सुचवा बरं जरा, अन पाळूया आपण सर्वच तसे ..खूप झालं हे आता

…एक वैतागलेली गृहिणी

प्रस्तुती…सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments