सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ बार्बरीक – (महाभारतातील अनभिज्ञ योद्धा) ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

रामायण महाभारत ही अजरामर महाकाव्ये! आजही महाभारताचा विचार केला तर, गीतेचा उपदेश… श्रीकृष्णाचे चरित्र… कौरवांची कारस्थानं… पांडवांनी दिलेले प्रत्युत्तर… द्रौपदीचं वस्त्रहरण… ते हाणून पाडणारा श्रीकृष्ण …भीष्माची प्रतिज्ञा… अठरा दिवस चाललेले महायुद्ध ….या आणि अशा कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा समावेश असलेलं महाभारत हा अभ्यासाचा विषय आहे असं वाटू लागतं.

महाभारत ही अतिशय चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली कुरु वंशाची कहाणी आहे. त्यात त्याग आहे ….प्रेम आहे…. सुड आहे… भांडण आहे… भाऊबंदकी आहे… धर्म आहे… आणि अधर्म ही आहे.

या कहाणीत अनेक कथानके, उपकथानके…. बहुसंख्य लोक कथा जोडल्या गेल्याआहेत. कर्णाची दुर्योधनाशी असलेली अभंग मैत्री, कर्णाचं दानशूर असणं, अर्जुनाचं शौर्य, भीमाचा पराक्रम, हे सगळं जगासमोर आलेलं आहे. पण त्याच बरोबर काही लोक पराक्रमी असून ही कधीच लोकांना माहित झालेले नाहीत .अशाच एका अनभिज्ञ पराक्रमी वीर योध्याचं नाव आहे बार्बरीक ….घटोत्कच पुत्र.. बार्बरीक… आणि त्याची ज्ञात असलेली ही कथा!

बार्बरीकानं श्री कृष्णाच्या सल्ल्यानुसार महीसागर संगमावरील गुप्त देवी चण्डिकेला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले होते व तेथे तंत्र मार्गाने साधना करणाऱ्या विजय नावाच्या मुनींना गुरु मानून त्याने त्यांनाही सहाय्य केले होते.महाजिव्हा  राक्षसी ,रेपलेंद्र ,पलाशी इत्यादी राक्षसांचा जे त्यांच्या साधनेत विघ्न आणत होते त्यांचा त्याने बिमोड केला होता. त्याचा सेवाभाव पराक्रमआणि भक्ती मुळे प्रसन्न होऊनचंडीकादेवीने त्याला वरदान म्हणून तीन अमोघ बाण दिले होते.त्यातला पहिला बाण सोडून ज्याचा वेध घ्यायचा ते कितीही मोठे सैन्यबळ असले तरी त्याने लक्ष्य साधता यायचे. दुसऱ्या बाणाने ते बांधले जायचे.व तिसऱ्या बाणाने ते पूर्णपणे नष्ट व्हायचे.शिवाय या बाणांचा पुनःप्रयोगही करता यायचा.

बार्बरीक हा अर्जुनाच्या तोडीचा धनुर्विद्यापटू होता. त्याला जेव्हा महाभारताच्या युद्धाची वार्ता कळली तेव्हा युद्धभूमीवर मधेच असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली उभा राहून बार्बरीकानं घोषणा केली की जो पक्ष हरणार असेल मी त्याच्या बाजूने लढणार .

त्याच्या वीरतेची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितले की केवळ तीन बाण मारून या पिंपळाची सगळी पाने तोडून दाखव. बार्बरीकाने आपल्या बाणांचा प्रयोग सुरू केला. पहिल्या बाणाने लक्षवेध केला.दुसरा बाण सर्व पानांना बांधू लागला आणि तिसरा बाण पिंपळाचे एकन्एक पान चिरत चालला होता. त्याच वेळी एक पान कृष्णाच्या पायापाशी पडले. ते कृष्णाने हळूच पायाखाली घेतले.

बार्बरीकाच्या तिसऱ्या बाणाने  साऱ्या पानांना कापून टाकले व शेवटचे पान जे कृष्णाच्या पायाखाली होते तेथे येऊन तो थांबला.

बार्बरीक म्हणाला,”प्रभू, तुमचा पाय बाजूला घ्या. मी बाणाला पिंपळाची सर्व पाने कापायची आज्ञा दिली आहे, तुमचा पाय नाही .”

कृष्ण थक्क झाला. पण त्याला आपले वचन आठवले- ‘यतो धर्मस्ततो जयः ‘कौरवांनी आपल्या वागण्यातून, व्यवहारातून अनेक वेळा दाखवून दिले होते की ते कपटी आणि अधर्मी वृत्तीचे द्योतक आहेत… आणि या युद्धात पांडवांचा… पर्यायाने…. धर्माचा जय होणे अत्यावश्यक आहे.

पण बार्बरीक  जर हारणाऱ्या कौरवांच्या बाजूने लढला तर ही गोष्ट शक्य होणार नाही. हे लक्षात येताच कृष्णाने आपली कूटनीती  वापरली.

तो दुसर्‍या दिवशी सकाळी ब्राह्मणाचा वेष धारण करून बार्बरीकाच्या शिबिरात गेला. बार्बरीकानं विचारलं,” हे ब्राह्मणदेवा तुम्हाला काय हवे आहे?” ब्राह्मणाच्या रुपातील कृष्ण म्हणाला,” मला हवं आहे ते तू देऊ शकणार नाहीस.” त्याच्या जाळ्यात बार्बरीक बरोबर अडकला. कृष्णाने त्याच्याकडे त्याचे मस्तक मागितले आणि आपल्या वडिलांच्या- घटोत्कचाच्या- बाजूने यशश्री मिळावी म्हणून बार्बरीकाने आपले मस्तक कृष्णाला अर्पण केले.

त्याच्या या बलिदानाने कृष्ण पण हेलावून गेला आणि त्याने त्याला वरदान दिले की यानंतर कलियुगात त्याच्याबरोबर बार्बरीकाची पूजा केली जाईल .

ज्या ठिकाणी कृष्णाने बार्बरीकाचे मस्तक ठेवले त्या जागेचे नाव ‘खाटू’ असे असून राजस्थानमधले हे मुख्य मंदिर आहे ….आणि तेथे बार्बरीकाची पूजा होते. खाटू श्याम… असं त्या देवाचं नाव आहे.  राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध प्रांतात तो पूजला जातो.

नेपाळमध्ये किरात राज, यालांबर अथवा आकाश भैरव म्हणून याची आराधना केली जाते.

अशी ही बार्बरीकाची कथा! कदाचित ही लोककथा पणअसेल पण खाटू श्याम या नावाने तो जनमानसातअमर झालेला आहे. आणि पूजला ही जात आहे.

*  समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments