विविधा
☆ ‘बाई,बाई’… ☆ सुश्री दीप्ती लेले ☆
बाई ऽऽ केवढा हा पाऊस सतत कोसळतोय…. बाईऽऽ आणि या विजांची तर आता भीती वाटते”… ही ‘बाई’ कोण बरं? नेहमी हा प्रश्न पडतो मला… या बाईचा पत्ता एकदा शोधून काढायला हवा. गोंधळात पडलात ना? मला असं म्हणायचं आहे की, तुम्हीच बघा हं… लहान मुलगी असू दे, तरुणी असू दे किंवा अगदी आजीबाई असू दे, ‘बाई’ हा शब्द प्रत्येक बाईच्या तोंडी असतोच …आता हेच बघा ना, मी काय म्हटलं, “बाई केवढा हा पाऊस!” म्हणजे भीती वाटली तरी ‘बाई’ असं म्हटलं जातं आणि “अगंबाई थांबला वाटतं हा पाऊस” असा आनंद झाला तरी ‘बाई’ हा शब्द येतो, म्हणून मी विचारलं ही बाई कोण? 8 मार्च हा जागतिक महिला दिन आणि अशावेळी बाई या शब्दाची थोडीशी गंमत… पाऊस कोसळत असताना आपल्या प्रियकराच्या आठवणीने काळजीनं नायिका काय म्हणते ऐकलं आहेत ना गाणं, “झिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे गं ‘बाई’ गेला मोहन कुणीकडे”
मोठ्या वयाच्या बायका असं “बाई” असं म्हणतात का… तर नाही एखादी छोटीशी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगून जाते
“तुझी नी माझी गंमत वहिनी
ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधूया ग
दादाचं घर ‘ बाई’ उन्हात”
दादाची तक्रार करताना सुद्धा ‘बाई !’ ‘बाई’ शब्दाचा उगम शोधायला गेलो तर काही मिळत नाही. बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजत, नकळतच हा शब्द येत असावा. खूप वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणानिमित्त म्हटली जाणारी एक ओवी एका पुस्तकात वाचायला मिळाली… “पंचमीचा सण बाई दणादणा आला मुराळी भाऊ आला बाई जाते मी माहेराला… सासुबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेऊ घाला दही साखर भाकरीला मी तर निघाले माहेराला…” बघितलं सख्यांनो बाई हा शब्द किती वेळा आणि किती सहज या ओळीं मध्ये आलाय… अगदी हे गाणं सुद्धा आपण ऐकलं असेलच कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ….
सख्यांनो लहानपणी खेळलेला भोंडला आठवतोय?
खिरापत ओळखणं, पाटावरचा हत्ती, भोवती धरलेला फेर, भोंडल्याची गाणी… अगदी मजा असायची… त्या गाण्यांमध्ये दडलेला हा बाई शब्द हळूच या गाण्यातून कसा डोकावतो बघा… अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं… म्हणजे बघा माहेरची आठवण काढून भावूक झालं म्हणून बाई आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच… “कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई” आपल्याला या नाट्यपदांची सुद्धा आठवण येते ….असा हा शब्द बाई …कवी आणि गीतकार मग ते पुरुष असले तरी त्यांना सुद्धा बाई शब्द कवितेत, गाण्यात वापरल्याशिवाय राहवलं नाही. केदार शिंदे सारख्या दिग्दर्शकांनं सुद्धा सिनेमाचा विषय बाईच्या मनातले ओळखता येतं, ऐकू येतं.. असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं “अगंबाई अरेच्या!!”
अगदी ग दि माडगूळकर यांना सुद्धा आपल्या गाण्यांमध्ये , गीतांमध्ये हा बाई शब्द वापरावासा वाटला आणि गाणं तयार झालं
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली… गं बाई माझी करंगळी मोडली…
आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाड़मयाचा पगडा होता आणि अजूनही आहे. पूर्वी भावना व्यक्त करताना कवीला देवाधिकांचा आधार घ्यायला लागायचा असा एक काळ होता. राधाकृष्णा शिवाय या प्रेम या विषयाला हात घालणं थोडंसं गैर समजलं जायचं. त्यामुळे पूर्वी स्त्रीच्या केशसंभार याविषयी लिहिताना सुद्धा कवी म्हणतात,
कसा गं बाई केला कोणी ग बाई केला राधे तुझा सैल अंबाडा…
हे लिहिता लिहिता अजून एका गाण्याची आठवण झाली ती म्हणजे
“नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम बाई मी विकत घेतला शाम”
काय करणार… रेडिओवर RJ म्हणून पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक असं काम केल्यामुळे कोणताही लेख लिहिताना, काहीही बोलत असताना गाणी आणि बोलणं याची सांगड आपोआप घातली जाते. गाणी आठवायला लागतात भराभर …. आपण रिमिक्सचा जमाना बघितला, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला हे गाणं रीमिक्स झालं आणि तरुणाईला आवडलं …भांगडा पाॅपवर ठेका धरणारी तरुणाई हळूहळू मराठी गाणी सुद्धा ऐकायला लागली …अर्थात ही किती चांगली गोष्ट नाही का!
आपण बघितलं की कितीही आपण माॅडर्न झालो, इंग्रजी भाषा शिकलो, तरी “अगबाई” (अर्थात OMG सारख्या अनेक इतर शब्दांनी किंवा मोबाईलच्या शॉर्ट शब्दांनी हळूहळू ती जागा काबीज केली आहे) च्या जागी दुसरा कोणताही शब्द पटकन वापरला जात नाही.
एक छोटीशी आठवण इथे सांगावीशी वाटते आम्ही 10- 12 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका छोट्याशा घरी गेलो होतो… आमच्या नातेवाईकांकडे…..तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरा नवीन आलेले होते त्या कॅमेराच्या स्क्रिनवर चित्र दिसतं ही गोष्ट नवीन होती. आम्ही त्या घरातल्या आमच्या छोटुकली चा नाच आणि तिचं गाणं जेव्हा त्याच्यावरती रेकॉर्ड केलं आणि तो स्क्रीन तिने बघितला मात्र… आणि तिने एका विशिष्ट कोकणी स्वरात एक हात कमरेवरती आणि दुसरा हात गालावरती ठेवून “अग्गेऽऽ बाऽयऽऽ” असं कोकणी विशिष्ट स्वरात म्हटलं तेव्हा आमचे आम्हाला इतकं मस्त वाटलं आणि हसूच आलं.
आपल्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना आपल्याला, दांडेकर बाई, कुलकर्णी बाई, देशपांडे बाई अशी आपल्या शिक्षकांना बाई म्हणण्याची पद्धत होती… अर्थात मध्यंतरीच्या काळात बाई या शब्दाला काही चा वेगळा अर्थ सुद्धा प्राप्त झालेला होता पण तरीही बाई म्हटल्यानंतर मला तरी अजूनही शाळेतल्या बाईच आठवतात.
जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध व्हिलन निळू फुले यांचा ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हाट्सअप च्या जमान्यात त्याचे अनेक मिम्स तयार होतात…. मराठी किंवा हिंदी मालिकातून एक बाई दुसर्या बाईला कशी छळते, कट कारस्थान करते हे हल्ली भरभरून दाखवलं जातं… प्रत्यक्षात असं होतही असेल मला माहित नाही मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेनमधून प्रवास करताना एकमेकींशी कचाकचा भांडणाऱ्या बायका प्रसंगाला बायकाच बायकांची मदत करतात हे ही मी डोळ्यांनी पाहिलं आहे….. काय घ्यायचं, काय सोडायचं, कोणाशी कसं वागायचं, नाती कशी जपायची, संवाद कसा साधायचा… घराचं घरपण टिकवायचं नोकरी घर मुलं नातेवाईक या सगळ्यांचा बॅलन्स कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी बायकांना छान जमतात…
असो हे बाई पुराण आता इथेच थांबवते…. वर्षभर बायकांच्या बडबडी वर …त्यांचं शॉपिंग …त्यांची बुद्धिमत्ता याच्यावरती फुटकळ विनोद करणारे आता हा आठवडा मात्र बाईचं कर्तृत्व, तिचा सन्मान, women empowerment … यावर भरभरून बोलतील, लेख लिहितील, कार्यक्रमांचे आयोजन करतील… पण आपल्या सर्वसामान्य बायकांच्या आयुष्यात मात्र त्याचा काडीमात्रही फरक पडणार नाही…. आपण आपली रोजची कामं, कर्तव्य पार पाडत राहणार आणि अधून मधून आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या घरच्यांसोबत आपल्या आयुष्याचा आनंद घेत राहणार…. बरं सगळ्या बायकांना… महिला दिनाच्या शुभेच्छा बरं का!!!
© सुश्री दीप्ती सचिन लेले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈