सुश्री त्रिशला शहा
विविधा
☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1☆ सुश्री त्रिशला शहा ☆
(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)
‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटल जात,कारण या वयात कशाची चिंता,काळजी नसते.खाणे,पिणे,खेळणे आणि शाळेत जाणेएवढच काम लहान मुलांच असत.मोठ्यांना असणाऱ्या काळज्या,समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.पैसे मिळवण,घर चालवण हा त्रास मुलांना नसतो.त्यामुळेच की काय ‘ रम्य ते बालपण’ अस म्हटल जात.पण काही मुलांच्या बाबतीत हे बालपण रम्य नसते.ज्या वयात या मुलांच्या हाती वह्या,पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलांना मजूरीवर जाव लागत.
घरातील पैशाची कमी, उपासमार, गरजेच्या वस्तू न मिळण शाळेच्या फी, पुस्तकासाठी पैसे नसणे अशा परिस्थिती मुळे मुलांना मजूरी करावी लागते. आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना पालकांची मदत मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच शाळेला पूर्णविराम देऊन ही मुल, हाँटेलमधे टेबल पुसणे, भांडी घासणे, बांधकामावरच्या विटा उचलणे अशी काम करत रहातात.यालाच बालमजुरी किंवा बालकामगार असे म्हणतात, वयाची ९ वर्षे ते १६ वर्षे वयातील मुलांना बालकामगार म्हणतात.
काही वेळा पालकांना कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.तसेच पालक शिक्षीत नसतील तर मुलंही शिक्षणापासून वंचित रहातात. त्यामुळे ही मुले मजूरीकडे वळतात.
बालमजूरी किंवा बालकामगार ही जागतिक समस्या आहे. पण अजूनही हा प्रश्न म्हणावा तितका सुटला नाही. भारतासारख्या संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांमधे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच गावात विशेषतः खेड्यामध्ये लहान मुलांना कामावर जावे लागते. उसतोड कामगारांची मुलं, बांधकामावर कामाला जाणाऱ्यांची मुलं बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर कामाला जातात. बरीच मुलं हाँटेल, कार्यालय, बार, वीटभट्टी, फँक्टरी अशा ठिकाणी मजूरी करताना दिसतात. फटाक्यांच्या फँक्टरीत तर असंख्य मुले काम करतात. अशा फँक्टरीमधे दुर्दैवाने काही अपघात झाला तर या मुलांना कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता असते.
आईवडिलांचे कमी उत्पन्न,दारु पिणारे वडील, अनाथ मुले,घरातील कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार अशा कारणांमुळे ही मुलं बालमजूर म्हणून काम करताना दिसतात.काही मुलं टि.व्ही.,सिनेमाच्या वेडापायी घरातून पळून जातात आणि त्यांना कुठेच आधार नाही मिळाला तर ते आपोआपचं मजूरीकडे वळतात.
क्रमशः…
(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈