सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
सर्वसाधारणपणे घराच्या बाहेरच्या भिंतींवरून इमारतीचे आकारमान, घरमालकाची आर्थिक सुस्थिती आणि बांधकामाचे कौशल्य व्यक्त होते. खरी ओळख असते ती, घरातल्या आतल्या भिंतींची,.
पूर्वी भिंतीवर पूर्वजांचे फोटो, अर्थात ब्लॅक अॅड व्हाईट. देवांचे फोटो, राजा रविवर्म्याची चित्रे ओळीने लावलेली असत. आता एखादी कलाकृती, नैसर्गिक देखावा यांच्या फ्रेम्स असतात. हल्ली चायनीज शुभचिन्हे लावायची फॅशन आहे. भिंतीवर ची अशी प्रतिके घरातल्यांची मनोवृत्ती व्यक्त करतात.
हल्ली खूपशा घरात वास्तुशास्त्रानुसार फ्रेम्स आणि पिरॅमिड्स असतात. जास्त करून बहुमजली सदनिकांमध्ये अशा प्रकाराच्या वस्तू असतात. सहाजिकच आहे, कष्टांनं मिळवलेल्या वास्तूमध्ये सुख, शांती, समाधान, प्रगती असावी असे वाटणे नैसर्गिक आहे आणि तसे उपाय करणे, आवश्यक आहे.
मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिच्या घरात एकदम सुने सुने वाटत होते. एकाही भिंती वर एकही चित्र, फोटो, फ्रेम्स काहीच नाही. भिंती अगदी ओक्याबोक्या दिसत होत्या. मला तिची मनःस्थिती माहीत होती. 5-7 वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुले लहान होती. बिचारी कशीबशी संसार पुढे रेटत होती. त्या भिंतींच्या मुकेपणाने तिचं मुकेपण व्यक्त होत होतं.
काही वर्षांपूर्वी भिंतीवर कॅलेंडर असायचेच. एकच नव्हे तर अनेक दिनदर्शिका लावल्या जायच्या. पण आता कॅलेंडर मोबाईल वर उपलब्ध आहे. त्यामुळे कॅलेंडर भिंतीवरून हातात आले आहे.
ठराविक भिंती ला ठराविक रंग देणे याचाही नियम आहे. अंतर्गत सजावट करणारे व रंगारी लोकां ना ते बरोबर माहीत असतं. भिंतींच्या रंगाचा तिथे रहाणा-या लोकांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.
क्रमशः…
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈