सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
1950 ते 1970 च्या दोन दशकात जन्म घेतलेले माझ्याशी सहमत होतील. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश केलेली ही पिढी.
पाचव्या वर्षी पर्यंतचे लालनपालन आजी-आजोबा, काका काकू, आत्या, आईबाबा, मोठी भावंडे यांच्या सहवासात होत असे. आजोळचे मातुल लोक तर खूपच लाड करायचे. तिथे रागावणे, डोळे मोठे करणे हे नसायचेच. फक्तच कौतुक आणि लाड. चारच दिवस आलेली माहेरवाशीण आणि नातवंडे आजोळच्या घराचा परमानंद होता.
लालन म्हणजे लाड आणि पालन म्हणजे पाळणे. पाच वर्षांपर्यंत घरात भरपूर लाड असायचे. मुख्य म्हणजे लवकर उठण्याची सक्ती नसे. घरातले सगळेच खाऊ द्यायला, गोंजारायला, सतत आसपास असत.
आज्जीनं दिलेला लाडू, आईनं दिलेल्या गूळ-शेंगा, काकानं आणलेला ऊस, बाबांनी आणलेला सुका मेवा अशा खाऊच्या लाडाकोडातलं श्रीमंत बालपण!
आजोबांची काठी, आत्याची पर्स, काकांच्या चपला, बाबांच्या स्कूटरच्या किल्ल्या असे ऐवज लपवणे ही त्यावेळेस आवडती खोड होती. त्यावेळी त्यांच्या मूडप्रमाणे मारही भरपूर खावा लागे.
घरची मुले कुठे आणि काय खेळाहेत, कशानं खेळत आहेत यावर घरातल्यांचं बारीक लक्ष असे. हेच पालन! अशा प्रेमळ शिस्तीच्या लालनपालनात आयुष्याचा पाया भक्कम व्हायचा. घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी, ओढ आणि सुरक्षितता वाटण्याचं कारण हा भक्कम पायाच आहे.
पाच वर्षांनंतर गुढीपाडव्याला पाटीपूजन केले जायचे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जायची. पाटी आणि पेन्सिल या दोन वस्तू मुलांच्या हाती सोपविल्या जायच्या.
मुलांना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव करून दिली जायची. त्यावेळी पाटीपेन्सिल हे आयुष्यातलं पहिलं साधन. पुढे वही-पेन, फळा-खडू, हे तिचे वारसदार.
पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायची. एक एक अशा अकरा आकड्यांची. देवासमोर पाटीपूजन करायचं. मग ती मुलांच्या स्वाधीन केली जायची. मार्च-एप्रिल मध्ये गुढीपाडवा येतो, महिनाभर पाटी जपून ठेवली जायची. कधीतरी दुपारी हळूच पाटीवर सूर्य, फूल, चांदोबा , झाड अशी चित्रे काढायचा प्रयत्न चालू असायचा.
जून मध्ये शाळा सुरू होते. एका हातात डबा ( कडीचा स्टीलचा डबा)
आणि दुस-या हातात पाटी. खिशात पेन्सिलीचा तुकडा. नवा कोरा शाळेचा ड्रेस. तो मापानं मोठाच शिवलेला, दोन वर्षांची बेगमी.
अगदी सुरवातीला मण्यांची पाटी म्हणजे पाटीच्या अर्ध्या भागात दहा तारा , प्रत्येक तारेवर दहा, नऊ, आठ, सात असे एक पर्यंत रंगीत मणी ओवलेले.( आठवले का?) त्या मण्यांच्या मदतीने गणिताच्या दुनियेत पाऊल टाकलं.
त्यानंतर मणी नसलेली पाटी. तीही दोन आकारात उपलब्ध होती..लहान आणि मोठी. आम्हाला दुसरीच्या वर्गात लहान पाटी आणि तिसरी, चौथीला मोठी पाटी दिली गेली. आणखीही एक पाटी मिळायची, डबल पाटी.
म्हणजे दोन पाट्या जोडपट्टी लावून एकत्र केलेल्या असत. पेन्सिलीनं लिहिलेलं पुसलं जाऊ नये, म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे ठेवले जायचे.
एक अख्खी पेन्सिल शाळेत पोचेपर्यंत अख्खी असायची, लिहायला सुरुवात केली कि, तुकडे कधी व्हायचे ते कळतच नव्हते. मग ते तुकडे लिहून संपेपर्यंत नवी मिळायची नाही. त्यावेळी एकमेकांना पेन्सिलीचे तुकडे देऊन मदत करण्यात खूप आनंद वाटायचा.
पेन्सिलीचा षटकोनी आकार इतका योग्य कि चिमुकल्या बोटांतली शक्ती गरजेपुरतीच लागेल, इतका विचार करून निर्मात्यांनी तयार केली असे.
अंगठा, तर्जनी आणि मधले बोट या त्रयींची पेन्सिलीशी दोस्ती झाली की पाटीवर अक्षरे व अंक डौलदारपणे उतरत. या तीन बोटांचा संबंध थेट मेंदूशी होऊन तिथल्या पेशी तरतरीत होऊन अपेक्षित परिणाम पाटीवर दिसे. अॅक्युप्रेशर हा शब्द खूप नंतर कळला. त्यावेळच्या शिक्षण तज्ञांनी इतक्या लहान वयाच्या मुलांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा सर्वांगाने विचार करून ही पद्धत आचरली असणार.
पाटी सांभाळणे म्हणजे लिहिलेले पुसले जाणार नाही आणि पाटी फुटणार नाही याची काळजी घेणे, पेन्सिलीचे तुकडे सांभाळणे ही जबाबदारी पाच ते नऊ वर्षाच्या बालकांवर होती .
पाटीवर लिहिल्याने अक्षर वळणदार आणि टपोरे होते, हे मात्र खरं!!
चौथीतून पाचव्या इयत्तेत गेल्यावर पाटी पेन्सिल चा निरोप घेऊन वही पेन यांची ओळख होत असे.
त्या बालवयातलं बालगीत ” शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली ” हे गाणं प्रत्येक बालकाच्या मनातलं होतं.
कालानुरूप ते बालवयही मागे पडले, त्याबरोबरच पाटीपेन्सिल ही कालबाह्य झाली.
इतका मोठा बदल होईल, अशी कल्पना ही कुणी केली नसेल.
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈