सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

बडबड बडबड ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

परिचित शब्द आणि कृती आहे ना? अगदी लहान असल्या पासून म्हणजे शब्दही बोलता येत नसतो तेव्हा पासून सुरु होणारी कृती. भावना शब्दात व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे बोलणे. जास्त बोलणे झाले, नकोसे वाटले की त्याची बडबड होते. मग मोठी माणसे म्हणतात कीती टकळी चालू आहे?   आणि बायका जमतात तिथे तर या बडबडीचा उच्चांक असतो. एक असेच हास्य चित्र बघण्यात आले होते. दोन महिलांच्या बोलण्यातून वीज निर्मिती करुन त्यावर रेल्वे चालली आहे असे चित्र होते. यातील अतिशयोक्ती सोडली तर महिला बडबड करतात हे सत्यच आहे. आणि त्याच मुळे त्या मानसिक ताणातून बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त त्या कोणाशी बोलत असतील? असा विचार आला आणि जरा शोधशोध केली, मैत्रिणींशी चर्चा ( म्हणजे परत बडबडच )  केली. आणि आश्चर्य म्हणजे असे समोर आले, की महिला सर्वात जास्त स्वतःशी बोलतात. आणि  मग स्वतःच स्वतःचे निरीक्षण केले. आणि खूपच गंमत वाटली.

अगदी झोपेतून उठल्या पासून याची सुरुवात होते.

सकाळी उठताना

चला उठा, कामे खोळंबली आहेत. उशीर झाला तर सगळाच उशीर होणार. आयता चहा कोण देणार?  चला चहा करा आणि सगळ्यांना उठवा.

मॉर्निंग वॉकला गेल्यावर

जा बाई जोरात. स्लिम व्हायचे आहे ना. मला काही फरक पडत नाही. मी माझ्याच वेगाने चालणार.

कोणत्याही मीडियावर नवीन लेख दिसला

बरं हिला रोज सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसायला जमते. माझी तर कामेच संपत नाहीत. चला आवरायला हवे.

दुपारी विश्रांतीच्या वेळी

आता जरा पडते. फक्त कोणी यायला नको. आणि कंपनीचा फोनही यायला नको. त्यांना हिच वेळ सापडते. जरा पडले की ऑफरचा फोन करतात.

दुसऱ्याचे स्टेट्स बघून

बरा स्टेट्स बदलायला वेळ मिळतो. कुठे कुठे भटकतात कोण जाणे? आणि असले कपडे या वयात शोभतात का?

दुपारी उठल्यावर

चला आवरायला हवे. आता एकेक जण घरी यायला लागेल. मग त्यांचे चहा पाणी. मी घरीच असते ना, मला काय काम? (असे सगळे म्हणतात. एकदा घरातली कामे करुन बघा, म्हणजे कळेल. ) असे म्हणून सगळीच कामे करावी लागतात.

रात्री झोपताना

झालं एकदाचं आवरुन. कोणी मदत करत नाही. हातावर पाणी पडले की सगळे सोफ्यावर मस्त गप्पा मारत बसणार. आणि मी किचन आवरणार. कधी कधी वाटते तसेच पडू द्यावे. पण तो स्वभाव नाही ना.

मध्यरात्री जाग आल्यावर

अगं बाई आत्ता कुठे तीनच वाजले आहेत. झोपा अजून दोन तास. नाहीतर उठायच्या वेळी झोप लागायची.

अशी जास्तीत जास्त स्वतःशी बडबड चालू असते. इथे थोडीच बडबड दिली आहे. असे अनंत विचार चालू असतात. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, उघडपणे ज्या भावना बोलू शकत नाही त्या मनात बडबड करतो. यात सगळेच असे तक्रार सूर असतात असेही नाही. बरेचदा मी किती नशीबवान आहे. घरातील माणसे माझे कौतुक करतात. नातेवाईक चांगले वागतात, मान देतात. अशीही विधाने असतात. पण ही चांगली विधाने आपण व्यक्त करू शकतो. त्याने कोणाचे मन दुखावले जात नाही. पण तक्रारी, दुखणी, कामे ज्या गोष्टी उघड बोलून कोणी दुखावेल असे वाटते त्याच गोष्टी मनाशी बडबड करतो.

आता मी नाही का मनातली बडबड तुम्हाला सांगितली. कारण तुम्ही सगळी आपली माणसे आहात. माझी ही मनातली बडबड तुम्हाला म्हणून सांगितली. माझी अजून एक गंमत तुम्हाला सांगते. मी ज्यावेळी एकटी वॉकिंग साठी जाते, त्यावेळी अशीच स्वतःशी बडबड करते. आणि गंमत म्हणजे त्यातून एखादी कविता तयार होते. ती विसरु नये म्हणून रस्त्यावरच्या एखाद्या दुकानात जाते आणि तेथून रद्दी पेपर घेऊन त्यावर उतरवते. आणि घरी येऊन डायरीत लिहिते.

तर माझ्या मनातले आज तुम्हाला सांगितले. तुम्ही पण मनातच ठेवा हं!

तुम्हाला म्हणून सांगते. सकाळ पासून लिहायचे म्हणते, पण वेळ कुठे होतोय. शेवटी आज संध्याकाळी फिरायला न जाता लिहिले तेव्हा कुठे हे लिहिता आले.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments