श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
☆ 👆बो टं !👆✌️😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
“काही म्हणा, तुमच्या बोटांत खरंच जादू आहे !”
अशी दाद, आपण एखादे शिल्पकला, चित्रकला किंवा रांगोळी प्रदर्शन पाहून झाल्यावर, जर त्या कलाकाराची कर्म-धर्म संयोगाने प्रत्यक्ष गाठ पडली, तर त्याच्या कलेच कौतुक करतांना आपल्या तोंडातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडते !
आपल्या हातांची व्याख्या करायची झाल्यास, दंडापासून सुरु होऊन दहा बोटांपर्यंत संपणारा आपल्या शरीराचा एक अवयव, अशी ठोकळ मानाने करायला कोणाची हरकत नसावी. आणि ज्यांची हरकत असेल त्यांनी स्वतःचे बोटं (कुठले ते त्यांचे त्यांनीच ठरवावे !) आश्चर्याने स्वतःच्या तोंडात घातले तरी चालेल !
काही काही (नशीबवान ?) लोकांना कधी कधी दोन्ही हातांना मिळून अकरा बोटं असल्याचे आपण बघतो. अर्थात त्या अकराव्या बोटाचा ते काय आणि कसा उपयोग करतात, का त्याची त्यांना अडचणच होते, हे त्यांचे त्यांनाच माहित. यावर असे अकरा बोटंवालेच जास्त प्रकाश टाकू शकतील. त्यामुळे मी उगाच मला असलेल्या दहा बोटांपैकी माझं एखादं बोटं त्यांच्या अकराव्या बोटाकडे दाखवून, त्यांना माझ्याकडे बघून, माझ्या नावाने बोटं मोडायला कशाला लाऊ?
बायकोला जशी नवऱ्याशिवाय आणि नवऱ्याला जशी बायकोशिवाय परिपूर्णता नाही असं म्हणतात (कोण ते माहित नाही !) तदवतच, हातांना कमीत कमी दहा बोटांशिवाय पूर्णता नाही, हे मात्र मी म्हणतो बरं कां मंडळी ! अर्थात काही काही बायकांना आपल्या नवरोबांना नाचवायला (नवऱ्याला नाचवायला नाही) आपल्या हाताची हीच दहा बोटं कमी पडतात, ही गोष्ट अलाहिदा ! तर थोडक्यात काय, आपल्या दोन हातांना असलेल्या या दहा बोटांना, आपल्या रोजच्या जीवनात अनन्य साधारण असं महत्व आहे, हे कोणीही मान्य करेल. बरं या आपल्या बोटांचे हे महत्व आपल्याला आत्ताच कळलय, असं आहे का ? तर तसं अजिबातच नाही ! अगदी पौराणिक काळापासून, आपल्याला या बोटांचे महत्व निरनिराळ्या कथांमधून कळत आलेलं आहे. जसं, श्री कृष्णाने आपल्या एका हाताच्या करंगळीवर अखंड गोवर्धन पर्वत उचलला होता, तसंच द्रोणाचार्यांनी एकलव्य धनुरविद्येत अर्जुनापेक्षा पुढे जावून वरचढ ठरेल, हे ओळखून त्याला आपला अंगठा गुरुदक्षिणा म्हणून देण्यास भाग पाडले होते, इत्यादी इत्यादी !
माझ्या लहानपणी म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी बाळाला थोडं उभ राहता यायला लागलं, की आई-बाबा, काका-मामा-आत्या, त्यांच्या बोटाचा आधार देवून चालायला शिकवत असतं. तेंव्हा आताच्या सारखं वॉकरच खूळ नव्हतं. होता तो वडीलधाऱ्यांच्या बोटांचा आश्वासक पर्सनल टच ! त्यामुळेच की काय आमची पिढी अगदी लहान वयातच स्वतःच्या बोटांवर, सॉरी सॉरी, स्वतःच्या पायावर लवकर उभं रहायला शिकली. असो !
छोटया छोटया बाळांना सुद्धा आपल्या कुठल्या बोटांचा कसा उपयोग करायचा, हे कुणीही न सांगता चांगलेच कळतं. काही काही बाळांना आपला अंगठा किंवा करंगळी शेजारील दोन बोटं तोंडात घालून झोपायची सवय असते. त्यातून त्यांना मिळणारा अवर्णनीय आनंद आपण त्यांच्या झोपेतल्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला लगेच जाणवतो ! बरं ते बोटं किंवा अंगठा त्याच्या तोंडातून काढून बघा, नाही त्यानं त्याच्या रडण्याच्या आवाजाने तुम्हांला तुमच्या कानात बोटं घालायला लावली तर !
पुढे तरुणपणी बोटां संदर्भात जेवढे म्हणून काही वाक्प्रचार प्रचलित होते आणि कानावर पडत होते त्यात प्रामुख्याने “अमुक तमुक माणसावर अजिबात विश्वास ठेवू नकोस, तो या बोटाची थुंकी त्या बोटावर कधी करेल हे तुला कळणार नाही !” असं ऐकण्याचा योग वडीलधाऱ्यांकडून नेहमी येत असे ! आणि हो, आपल्या पैकी काही जणांना तरुणपणी तोंडात बोटं घालून शिट्टी मारण्याची कला (कोणाकडे बघून ते तुमच तुम्हीच आठवा !) अवगत होती, हे आपण मान्य कराल ! आता त्या शिट्ट्यांचा पुढे काही चांगला परिणाम झाला का दुष्परिणाम झाला, हे ते शिट्टी मारणारे बहाद्दरच जाणोत ! शिट्टी या विषयावर सुद्धा एक लेख लिहायचे डोक्यात आहे, बघूया माझी बोटं तो लिहायला कधी शिवशीवतात ते !
जगातील सात आश्चर्यांपैकी, (सध्या त्यांची संख्या वाढून नक्की किती झाली आहे ते मला माहित नाही, हे पण एक आश्चर्यच आहे, असं आपल्याला वाटल्यास आपण तसं तोंडात बोटं न घालता देखील म्हणू शकता !) एखादे प्रत्यक्ष बघतांना लोकांची बोटे तोंडात जातात, असं आपण प्रवासवर्णनाच्या पुस्तकात वाचतो ! पण हे खरचं घडत नाही, कारण मोठ्यांनी असं तोंडात बोटं घालणं कस दिसेल, या नुसत्या कल्पनेने आपली बोटं (आपल्याच) तोंडात जायची !
“ती आपल्या भावी नवऱ्याच्या, घनदाट केसातून आपली लांब सडक नाजूक बोटं (त्या काळच्या सर्वच कथा कादंबऱ्यातील नायिकांसाठी अशी बोटं असणं हे जणू एक सक्तीचं क्वालिफिकेशनच होतं जणू !) फिरवत, आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्न पहात होती !” अशी वर्णनं आपण पूर्वीच्या कथा कादंबऱ्यातून वाचली असतील. पण पुढे त्याच कादंबरीत, ठराविक वर्ष संसार झाल्यावर, तीच बायको आपली बोटं, (आता खरखरीत आणि जाडजूड झालेली) त्याच नवऱ्याच्या पूर्वीच्या घनदाट केसांच्या जागी सध्या (तिच्यामुळे?) पडलेल्या टकलावर, मिरं वाटण्यासाठी त्यांचा उपयोग करते, असं कधीच माझ्या वाचनात आलं नाही ! आपल्या वाचनात आलं असेल तर मला त्या कादंबरीच आणि लेखकाच नांव नक्की कळवा, म्हणजे मी माझ्या हातांची दहा बोटं जोडून त्याला कोपरापासून नमस्कार करायला मोकळा !
आपल्यापैकी बऱ्याच जणांना दहा बोटांसह दोन हात असतात, पण जी लोकं या बाबतीत काही कारणाने कमनशिबी असतात, अशी लोकं पण या जगात आनंदाने वावरतांना आपण बघतो. त्यातील काही जण तर आपल्या या व्यंगावर मात करून, आपल्या पायाच्या बोटांच्या मदतीने पेन पकडून, परीक्षा देतांना किंवा त्यात ब्रश धरून उत्तम चित्र साकारतांना आपण पहिले असेलच. त्या सगळ्यांच्या या अनोख्या अशा कर्तृत्वाला माझा मनापसून साष्टांग दंडवत !
पूर्वी लग्न जुळवतांना मध्यस्थ अगदी छातीठोकपणे सांगत, “मुलीच्या/मुलाच्या वागणुकीत बोटं ठेवायला जागा नाही, अगदी निर्धास्तपणे पुढे जा !” पण थोडे अपवाद वगळता, काही लग्ना नंतर, मुलीच्या/मुलाच्या आई बापाला आपले दोन्ही हात जोडायची पाळी येते, हे ही तितकेच खरं !
काही स्त्रिया किंवा पुरुष आपल्या दहा बोटांत, निरनिराळ्या आकाराच्या, रंगीत खड्यांच्या अंगठ्या घालून लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. असा एखादा तो किंवा ती मला दिसली, की मी लगेच मनातल्या मनांत समजून जातो, एकतर असं करून ते आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करताहेत किंवा त्यांच्या बोटांत कुठलीच कला नसावी ! अर्थात आपल्या बोटांचा कोणी कसा उपयोग करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असले तरी, दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा हे असं अंगठ्या घालून मिरवलेल बरं, या माझ्या मताशी तुम्ही पण सहमत व्हाल !
शेवटी, दुसऱ्या कुणीतरी आपल्या स्वभावावर, वागणुकीवर बोटं ठेवून, त्यात खोटं काढू नये, असंच प्रत्येकाला वाटत असतं. पण त्या दुसऱ्याच्या बोटावर आपले नियंत्रण नसल्याने, त्याने ते कोठे ठेवावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न झाला. आपण ते फारसे मनावर न घेणंच इष्ट. नाहीतर सगळ्यांनीच आपल्या एकेका वागणुकीवर बोटं ठेवले आणि ती सगळीच बोटं आपण सुधारायला गेलात, तर आपण आपला मूळचा स्वभावच हरवून बसाल ! अशा वेळी, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हाच धोपटमार्ग आपण निवडणे हे उत्तम ! बघा पटलं तर आणि नाहीच पटलं तर, आपलीच बोटं आपण आपल्याच तोंडात घालायला कोणाच्या बाची भीती आहे ?
ताजा कलम – वरील लेखात कोणा वाचकाला कोठे बोटं ठेवावं असं वाटलं तर ते तसे ठेवण्यासाठी तो मोकळा आहे, कारण शेवटी बोटं त्याच आहे !😅
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈