श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ बाकी उरलेला गोयंकर बाब… – लेखिका – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(नुकतीच बा.भ. बोरकरांची पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने)
बा. भ. बोरकरांबद्दल काय लिहावं? त्यांची पहिली कविता माझ्या वाचनात आली ती अर्थात ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’. मराठी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शाळकरी किंवा महाविद्यालयीन गोयंकर विद्यार्थ्याने ही कविता आपल्या भाषणात कधी ना कधी म्हटलेली असतेच. मीही त्याला अपवाद नव्हते. चौथीत असताना गोवा स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाची सुरवात मी ह्याच कवितेने केली होती. अर्थात तेव्हा ती शाळेतल्या बाईंनी माझ्याकडून घोटवून घेतली होती. काव्यगुण वगैरे कळायचे वय नव्हतेच ते, पण त्यातल्या सहज सोप्या, त्या वयात उमजेल अश्या उपमा आवडल्या होत्या.
पण पुढे दहावी-अकरावीला येईपर्यंत बोरकरांची हीच कविता इतक्या शाळकरी बाळबोध भाषणांमधून ऐकली की मला ती कविताच बाळबोध आणि शाळकरी वाटायला लागली. दोष कवितेचा नव्हता, कविता वापरून वापरून गुळगुळीत करणाऱ्या लोकांचा होता, पण एखादं भरजरी, गर्भरेशमी वस्त्र देखील रोज वापरलं तर चार-आठ दिवसात जसं कळकट आणि बोंदरं होऊन जातं तशी ही कविता मला त्या वेळी भासायला लागलेली होती.
पुढे मराठी भाषा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ’तेथे कर माझे जुळती’ आणि ‘जीवन त्यांना कळले हो’ ह्या सारख्या बोरकरांच्या कविता वाचल्या तेव्हा हळूहळू कळायला लागले की बोरकर कवी म्हणून किती मोठे आहेत ते. ह्याच दरम्यान कधीतरी त्यांची लावण्य रेखा ही कविता वाचनात आली आणि तेव्हा मात्र मी पूर्ण भारावून गेले. अगदी आजही ही कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत आणि बोरकरांची लावण्य रेखा ह्या माझ्या सर्वात आवडत्या मराठी कविता आहेत. त्यातले शेवटचे कडवे तर मला प्रचंड आवडते.
‘देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातूनफाके शुभ्र पार्यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा’
त्याच्या पहिल्या दोन ओळी वाचून मला माझ्या आजोबांची आठवण होते. हाती आले ते आयुष्य घेऊन प्रामाणिकपणे जगले ते, आणि त्यातूनही जमेल तेव्हढे त्यांनी समाजासाठी केले. मी त्यांची सर्वात धाकटी नात, मी त्यांना पाहिलेच मुळी त्यांच्या पक्व म्हातारपणी, बरे-वाईट सर्व जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्यावर स्थिरावलेल्या शांत डोहाप्रमाणे ते झाले होते त्या वेळी.
पुढे मीही मराठीत लिहायला लागले तेव्हा बोरकर मला वेगळ्या अर्थाने उमगायला लागले. माझ्या लेखनात माझ्याही नकळत काही कोंकणी शब्द डोकावून जातात, कुंपण हा शब्द मला येत नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा वंय ह्या शब्दाला पोफळीचा शिडशिडीत, सडपातळ गोडवा आहे. टाकळा ह्या मराठी शब्दाला एक कोरडा खडखडीत भाव आहे, पण त्याचेच कोपरे घासून गोलाकार केले की कोंकणीत ते रोप तायकिळो बनून लाडिकपणे आपल्या भेटीस येतं.
बाकीबाब बोरकरांचं सांगायचं झालं तर त्यांचं अस्सल गोयंकारपण बोरकरांनी कधीच सोडलं नाही. त्यांच्या कवितेतून भेटणाऱ्या अनेक कोंकणी शब्दांमधून पदोपदी गोवा डोकावतो. एखाद्या वर्गात शिक्षक गणिताचे अवघड प्रमेय सोडवून दाखवत असतात, सर्व मुले एकाग्र चित्ताने ते प्रमेय उतरवून घेत असताना, एखादा खोडकर मुलगा फळ्यावर लक्ष द्यायचे सोडून वर्गाच्या खिडकीतून बाहेर डोकावत असतो आणि त्याच्यामुळेच तो वर्ग जिवंत वाटतो, नैसर्गिक वाटतो, तसे ते बोरकरांच्या कवितेतले खिडकीबाहेर डोकावणारे व्रात्य कोंकणी शब्द. त्या शब्दांशिवाय बोरकरांची कविता इतकी अर्थवाही आणि नादमधुर झालीच नसती.
फूल औदुंबरालाही येते, पण ‘आलिंगन चुंबनाविना हे मीलन आपुले झाले ग, पाहा पाहा परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग’ ह्या ओळींमध्ये जी अर्थगर्भ गेयता आहे, अध्यात्माची सांवळी छटा आहे ती ‘पहा पहा बागेत हरीच्या औदुंबराला फूल आले गं’ ह्या ओळीत उमटलीच नसती.
गोव्याच्या सुरंगीच्या, जाईच्या, सुक्या मासळीच्या, पहिल्या पावसानंतर घमघमणाऱ्या तांबड्या मातीच्या खरपूस वासाने दरवाळणारी बोरकरांची कविता. गोव्याच्या तत्कालीन संस्कृतीचा, बोरीसारख्या जुवारी नदीकाठच्या, नारळी पोफळींनी नटलेल्या निसर्गरम्य गावात गेलेल्या बालपणाचा ठसा बोरकरांच्या लेखनात ठाई ठाई दिसतो. देवळातली भजने आणि चर्चच्या घंटा ऐकत बोरकर लहानाचे मोठे झाले.
हिंदू एकत्र कुटुंबातील गोतावळा, भरल्या घरचे सणवार, पोर्तुगीझ शिक्षणामुळे झालेली युरोपीय कवितेची संस्कृतीची, जीवनपद्धतीची ओळख, बालपणापासून मराठी संत साहित्य, अभंग-भूपाळ्या नित्य कानावर पडत आल्यामुळे नकळतच मनात खोल रुजलेला भारतीय तत्त्वविचार आणि मुळातला सौंदर्यासक्त, रसलोलुप आणि तरीही अध्यात्माने भारावलेला पिंड ह्या सर्वांचे एकत्रित, अजब मिश्रण बोरकरांच्या कवितेत दिसते.
मी बोरकरांपेक्षा कितीतरी लहान, त्यांच्या नातवंडांच्या पिढीची. पण ज्या आणि जश्या वातावरणात बोरकर वाढले जवळजवळ तश्याच सांस्कृतिक वातावरणात मीही वाढले. बोरकरांची जडणघडण झाली ती पारतंत्र्याच्या जोखडाखाली असलेल्या गोव्यात. माझा जन्मच झाला स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या गोव्यात. राजकीय परिस्थिती वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक परिस्थिती मला घडवणाऱ्या गोव्यात बरीचशी तशीच होती. त्यामुळे बोरकरांच्या कवितेतून डोकावणारा गोवा मलाही माझाच वाटतो.
१९३७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जीवनसंगीत ह्या बोरकरांच्या दुसरया काव्यसंग्रहातल्या कविता वाचताना मला हे खूप जाणवलं. ह्या संग्रहातल्या कविता ह्या बहुतांशी संस्कृतप्रचुर, तांब्यांच्या, केशवसुतांच्या कवितेची छाप असलेल्या. तरीही त्या कवितांमधून दिसणारे गोयंकार बाकीबाबांचे दर्शन फार लोभस आहे. कोंकणीत सांगायचे तर अपुरबायेचे!
इतुक्या लौकर न येई मरणा’ ही कविता म्हणजे एका सौंदर्यासक्त, जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक गोयंकाराचे हृदगतच आहे, ‘रेंदेराचे ऐकत गान, भानहीन मज मोडुनी मान, चुडतांच्या शेजेवर पडून भोगू दे मूक निःशब्दपणा’ ही इच्छा फक्त एक सच्चा गोयंकारच व्यक्त करू शकतो. रेंदेर म्हणजे माडाच्या झाडावर चढणारा आणि माडाच्या थेंबथेंब टपकणाऱ्या नीरेसाठी वर खाच करून तिथे मातीचे मडके लावणारा टॉडी टॅपर. ही नीरा पुढे माडाची फेणी करण्यासाठी आणि पावाचे पीठ आंबवण्यासाठी वापरली जाते. पायाच्या बेचक्यात माडाचे झाड कवटाळून तुरुतुरु वर चढणारा, कमरेला कोयती आणि मातीचे मडके बांधलेला रेंदेर हा माझ्याही पिढीने बघितलेला आहे.
ह्याच कवितेत बोरकरांनी झऱ्यासाठी वझरा हा खास कोकणी शब्द वापरलेला आहे. ह्याच कवितेतल्या ’तिखट कढीने जेवूनि घ्यावे मासळीचा सेवित स्वाद दुणा’ ह्या ओळी ऐकूनच पु. ल. देशपांडे ह्यांच्या आजीने, म्हणजे बाय ने बोरकरांना ’अच्च गोयंकार व्हो’ म्हणजे ‘सच्चा गोवेकर आहे हा’ हे सर्टिफिकेट दिले होते असा उल्लेख पुलंच्या त्यांच्या आजोबांवरच्या लेखात आहे.
जीवनसंगित मधल्याच ‘दवरणे’ आणि ‘मुशाफिरा’ ह्या दोन कवितांमध्ये बोरकरांनी ज्या उपमा आणि शब्द वापरले आहेत आणि जी शब्दचित्रे रेखाटली आहेत ती एकदम खास गोव्याची आणि त्यातही, बोरी गांवची आहेत. दवरणे किंवा कटे म्हणजे भारशिळा. पूर्वीच्या काळी लोक पाठीवर ओझे घेऊन मैलोनमैल चालत. तेव्हा त्यांना पाठीवरचा भार टेकता यावा, क्षणभर विश्रांती घेता यावी म्हणून वाटेवर असे दवरण्याचे दगड किंवा कटे बनवलेले असत. गोव्यात जांभा दगड खूप. त्याच्या शीळा एकावर एक रचून बनवलेली हे कटे, एखाद्या रणरणत्या निष्पर्ण माळावर वाटसरुंची वाट पहात वर्षानुवर्षे उभे असत. खुद्द माझ्या कुंकळ्ळी गावात असे बारा कटे आणि त्याभोवती वस्त्या होत्या.
अश्या ह्या उजाड माळावरच्या एकाकी ‘दवरण्या’चे वर्णन बोरकरांनी ’शांत विरागी’ असे केले आहे, ज्यावर त्यांनीही आपल्या हृदयावरचे ओझे खाली ठेवून आपले कवीमन उघडे केले. ‘मुशाफिरा’ ही कविता म्हणजे तर बोरकरांच्या बोरी गांवचे रेखाटलेले एक विलक्षण चित्रदर्शी शब्दचित्र आहे. ‘सांज दाटली शिरी, परतली घरा भिरी, सांवळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा, स्तब्ध मार्ग तांबडा, वळत जाय वाकडा, मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा’ ह्या ओळींमधल्या प्रत्येक शब्दातून बोरकरांचे अस्सल गोयंकारपण दिसते. कातरवेळेचा स्वतःचा असा एक विलक्षण दुखरा, हळवा करणारा उदास मूड असतो तो ह्या ओळींनी अत्यंत समर्थपणे पकडला आहे.
ह्याच कवितासंग्रहातल्या ’वारुणी रात’ ह्या कवितेत बोरकरांनी शेतातली कापणी ह्या अर्थी ‘लुवणी’ हा खास गोव्याचा कोंकणी शब्द वापरलेला आहे. ‘अर्धे लुवल्या अर्धे मळल्या अफाट त्या शेतात’ ह्या ओळीत जी नादमधुर गेयता आहे ती ’अर्धे कापल्या, अर्धे मळल्या’ ह्या ओळीत नसती उतरली. करवंटीच्या ऐवजी योजलेला करटी-वाटी हा शब्दप्रयोग तसाच गोव्याची आठवण करून देणारा आहे.
‘सागरा’ ह्या कवितेत त्यांनी समुद्राच्या लाटांचे वर्णन करताना हिरव्या-निळ्या ह्या शब्दप्रयोगाऐवजी, ‘पाचव्या-निळ्या’ ही विशेषणे वापरली आहेत. गोव्याच्या कोंकणीत हिरव्या रंगाला ’पाचवो’ म्हणतात. त्यात पाचूच्या रंगाचा हे अध्याहृत आहे. पुढे बोरकर एका ठिकाणी ’भीतीचा किंवाटा’ हा शब्दप्रयोग करतात. किंवाटा म्हणजे कोंकणीत आवेग, तो भीतीचाही असतो, प्रेमाचाही असतो. इथे लाटा ला यमक म्हणून बोरकरांनी किंवाटा हा शब्द वापरलाय.
संधीकाल ही कविता तर गोव्याच्या एका उन्हाळी संध्याकाळचे अतिशय सुंदर वर्णन करते. वसंत सरून गिम म्हणजे ग्रीष्म ऋतू सुरु झालेला आहे, परसातील आंबा ‘फळभारे रंगा’ आलेला आहे. कैऱ्या खायला तुरतुरीत खारींची येजा त्या आंब्यावर सुरु झाली आहे. ‘चपल चानिया धावत तुरतुर झटती सर्वांगा’ ह्या एका लयबद्ध ओळीत बोरकरांनी हे शब्दचित्र रेखाटले आहे. चानी म्हणजे कोंकणीत खार. खार हा शब्द न वापरता त्याऐवजी चानी हा खास कोंकणी शब्द वापरून बोरकरांनी अनुप्रास साधला आहे.
ह्याच कवितेत फुलपाखरासाठी त्यांनी ’पिसोळे’ हा खास कोंकणी शब्द वापरला आहे जो पुढेही त्यांच्या अनेक कवितांमधून दिसतो. ‘चपळ पिसोळी चतुर चोरटी भुरभुरती जवळी’ ह्या ओळीत संगीत आहे, लयबद्धता आहे जी ‘चपळ फुलपाखरे चतुर चोरटी’ ह्या शब्दप्रयोगात कधीच आली नसती.
बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्या थोर कवीच्या कवितेतून सर्व काव्यगुण वजा केले तरी जो बाकी उरतो तो गोयंकार बाब मला फार फार लोभसवाणा वाटतो.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈