🔅 विविधा 🔅

🌸 बकुळ हार 🌸 सुश्री गौरी बागलकोटे ☆

आताच फेसबुक चाळत असताना मी एका ज्वेलर्स ची जाहिरात पाहिली. त्यात त्यांनी एक दागिना प्रमोट केलेला — बकुळ हार

मनात आले कोणत्याही प्रकारात म्हणजे १ग्रॅम, बेंटेक्स,चोख सोंने यात  बकुळ हार मिळेल या जमान्यात, पणं खरी बकुळी मिळण कठीण झाले आहे. नाही म्हणायला कोल्हापूरच्या अंबाबाई देवळासमोर मिळतात बकुळीचे गजरे,  पणं लोकली फारशी पहायला नाही मिळत बकुळी. झाडे पणं कमी झाली. रातराणीच कौतुक सगळ्यांना. ती असते कुंपणावर. पण बकुळ दुर्मिळ झाली. शहरातून हद्दपार झाली जवळजवळ. बांधावर शेताच्या किंवा रस्त्याकडेला एखादे बकुळ दिसते. नाहीतर नवग्रहांची, किंवा नक्षत्र  झाडे असतात तिथे हमखास सापडेल. बकुळीच्या झाडाखालून गेल्यावर तो सुगंध पूर्ण श्वासात भरून घ्यावासा वाटतो. तो बाकी फुलांना नाही.

लहानपणी आम्ही एवढे बिझी नसायचो हा क्लास झाला की दुसरा तो झाला की तिसरा. त्यामुळे निसर्ग, सण साजरे करायला थोडा वेळ असे लहान मुलांना.

हादगा जवळ आला की विविध फुले शोधत मुली फिरत. त्यात गुलबक्षी विविध रंगात सजलेली, पिवळा, पां ढरा,अन् गुलबक्षी रंग. इतकी सुंदर फुले रस्त्याच्या कडेला उगवत अतिशय नाजूक, कमी आयुष्य असलेली फुले. दोन रंगाच्या कॉम्बिनेशन मधे ही उगवतात. जसे की पांढरा लाल, लाल पिवळा खुप छान दिसतात. त्याची देठे नाजूक असतात. एका विशिष्ठ कोनातून वाकवावी लागतात, नाहीतर लगेच तुटतात. देठाच्या शेवटी हिरव्या रंगाचा गोल असतो. असे फुल खुप छान रंगांनी सजलेले.

आता हादगा कमी झाला. मुलींना या सर्व गोष्टीत फारसा इटरेस्ट राहिला नाही. रस्त्याच्या कडेला ही फुले अजूनही दिसतात, अन् भूतकाळात घेऊन जातात. त्या फुलांची केलेली तीन पेडाची वेणी अजून आठवते, फुले दिसली की ती तोडून वेणी करावीशी वाटते. आम्ही मुलीचं अस नाही, मुल आमचे बालमित्र आम्हाला ह्या वेण्या करायला फुले तोडून आणुन देत असत. आणि आम्ही बसून त्या वेण्या गुंफत असु. मधे कुठे वेणी सुटत आली तर आमच्या मैत्रिणी मित्र सांगत इथे सुटत आलाय. मग कुणीतरी नाजुक हातानी सावरून वर घेत असे. त्यात मोडलेल फुल काढून आम्ही ती वेणी परत गुंफत असु. आणि त्या फुलाचा खालचा  हिरवा गोल भाग हिरवे मिरे म्हणून भातुकली मधे घेत असु.

अजरणीची फुले, याला बोलीभाषेत हद्ग्याची फुले म्हणतात. मला वाटत होत ह्याची झाडे संपली. पण नाही बऱ्याच कॉलेज कॅम्पस मध्ये ही झाडे अजून तग धरून आहेत. त्याच्या पाकळ्यांच्या पिपण्या फार आनंद देवुन जात. मी कुणाच्या गालावर फोडली, मी कुणाच्या कपाळावर फोडली. याची स्पर्धा लागायची,  त्यावरून चिडाचीडी, भांडाभांडी. सॉलिड मजा यायची. तू मला टिचकी मारलीय काग …काग.??😊

ह्याची पणं वेणी होते. भिजकी फुले असतील तरच याची वेणी मोडते. नाहीतर खुप मोठी वेणी होते. माझ्या हत्तीचा फोटो खुप मोठा म्हणजे पा टा एव्हढा होता. त्याला पुरेल एवढा हार व्हायचा. भानुंच्या वाड्यात हे झाड होत. आता नाही आहे. पण परवा सांगलीला जाताना वालचंद च्या कंपाऊनडला संपूर्ण  अजरणी ची झाडे आहेत. तेव्हा अजून आजरणी अजून जिवंत आहे, हे मला पटले.

भानुवाड्यात पांढरा चाफा पणं होता. त्याच्या अंगठ्या फार पॉप्युलर होत्या.  पाकळी बारीक चीमट्यानी भोक पाडायचं अन् ती पाकळी देठात ओवायची, सगळ्या पाकळ्या झाल्या की झाली अंगठी तयार.

असे हे लहानपणी चे दागिने.

गोरे वाड्यात, (आता कळल त्याला गोरेवाडा म्हणतात) बकुळीच झाड होते. जेरे बाईंच्या शाळेत जाताना मोठ्ठं बकुळी झाड होतं. शाळेला जाता येता आम्ही सगळे ही फुलं वेचायचो. कुणी मुठीत घट्ट पकडुन फुल घरी घेवून यायचो. कुणी मुठीचा वास घ्यायचा, पुन्हा, पुन्हा घेत राहायचा. कुणी ही फुल देवाला घालण्यास घरी घेवून येत, न वास घेता. कुणी वरून फुल पडल की पडल उचलून तोंडात घालत. फुलातील मध चोखायला. अशी किती मिळाली त्यावर आनंद द्विगुणित व्हायचा. हे सर्व शाळेतून येताना. कारण घरी जाताना आम्हाला  कोणी घ्यायला येत नसे.  कुणी ना कुणी आम्हाला सोडायला यायचे. तेंव्हा नुसता सुगंध श्वासात भरून घेत असु. जो आता फार दुर्मिळ झाला आहे.

बकुळ हार सोन्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा सध्या फार चलतीत आहे. ज्याचा आकार तेव्हडा बकुळीसारखा आहे. दिसते बकुळ फुल पणं त्यात तो मनात भरणारा सुगंध मात्र हरवलेला आहे…….

© सुश्री गौरी बागलकोटे

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments