श्री एस्.एन्. कुलकर्णी
☆ विविधा ☆ बोलणे-विचार करून बोलणे ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆
निसर्गाने बोलण्याची शक्ति फक्त मनुष्यालाच दिली आहे. कोणताही प्राणी, पक्षी बोलु शकत नाही. मनुष्यप्राणीच फक्त बोलु शकतो. हे निसर्गाने मनुष्याला दिलेले वरदानच आहे.
आपल्या भावना, विचार, इच्छा, गरजा व्यक्त करण्याचे ते एक मोठे साधन आहे. आपण बोललो ते बरोबर आहे का, योग्य आहे का अयोग्य हे मनुष्याला बोलल्यानंतरच त्याच्या परिणामावरूनच समजते. तेंव्हा मनुष्याने विचार करूनच बोलले पाहीजे. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ? न विचार करता बोलले तर समोरची व्यक्ति दुखावली जाण्याची, दुरावली जाण्याची शक्यता अधिक असते. बोलल्यानंतर मी असे बोललोच नाही, मी असे कांही म्हणालोच नाही, मला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव करण्यात काय अर्थ? म्हणुन बोलल्यानंतर विचार करीत बसण्यापेक्षा विचार करूनच बोलणे अधिक चांगले. त्यामुळे अनेक अनर्थ टळतील.
तुम्ही कसे आहात हे तुमच्या बोलण्याच्या पध्दतीवरून समजते. बोलताना तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, प्रामाणिकपणा यावरूनच तुमची पारख केली जाते. तसेच त्यावरून तुमचा “सुसंस्कृतपणा” लक्षांत येतो. आवाजाची पट्टी नेहमीच मध्यम असावी. वरच्या पट्टीत बोलणे टाळावे.बोलताना योग्य शब्द वापरले पाहीजेत. अयोग्य शब्द, अपशब्द टाळावेत. बोलण्यातुन समोरच्याबद्यल आदर व्यक्त झाला पाहीजे. बोलण्यात कोरडेपणा असु नये. आपुलकी जिव्हाळा असावा. आणि तो खरा असावा.त्यामध्ये तोंडदेखलेपणा नसावा. बोलणे नेहमी मुद्देसुद आणि मुद्याला धरूनच असावे. पाल्हाळ लावले की समोरचा माणूस कंटाळतो.ऐकुन घेण्यास टाळाटाळ करतो.
“कौन बनेगा करोडपती” मधील अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते. समोरची व्यक्ति कितीही लहान असो अथवा मोठी, अमिताभ बच्चन त्यांच्याशी आदरानेच बोलतात. त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे समोरची व्यक्ति अधिक मोकळी होते, रिलॅक्स होते आणि ऊत्साहित होते. बच्चन यांचेबद्दलची भिती जाऊन तिही मोकळेपणाने बोलायला लागते. हे बच्चनजींच्या बोलण्याचे, संवाद साधण्यामागचे कौशल्य आहे. अशा निरीक्षणातुनच आपलाही विकास होतो.
कसे बोलावे हे खरे तर अनेक गोष्टीतून साध्य करता येते. अनेक दिग्गजांचे बोलणे ऐकुन, विद्वान लोकांचे मार्गदर्शन घेऊन आपण ही कला अवगत करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे साहित्य वाचुन आपण आपले शब्द सामर्थ्य वाढवु शकतो. यामधुनच बोलताना आपल्याला योग्य शब्दांची निवड करता येते.
भाषण देणारे अनेकजण असतात. पण मुद्दाम आवर्जुन ऐकावे ते आदरणीय श्री अटल बिहारी वाजपैयीजी तसेच प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले सर यांची भाषणे,व्याख्याने. आपले बोलणे नेहमीच अर्थपूर्ण असले पाहीजे. निरर्थक बोलण्याला कांहीच अर्थ नसतो आणि कोणी ऐकतही नाही. बोलताना मोजकेच बोलले पाहीजे. अती बोलले की त्यामध्ये हमखास वावगे, अनावश्यक बोलले जाते. समोरचा माणुस त्यामुळे दुखावला जाऊ शकतो.
शब्द हे शस्र आहे. शस्रापेक्षाही अधिक घायाळ करण्याची शक्ती त्यामध्ये असते हे कायम लक्षांत ठेवले पाहीजे. तेंव्हा बोलताना विचार करूनच बोलले पाहीजे.
© श्री एस्. एन्. कुलकर्णी
वारजे, पुणे-४११०५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Very true….these tips should be followed by every 1…..
Very true….the way u have written this article is so thoughtful n meaningful….