श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ भाई… भाग – 5 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
*ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी*
( भाई – उत्तरार्ध )
वर्गात इतिहासाचा तास चालू आहे. ‘देशपांडे’ सर प्रतापगडा वरचा धडा शिकवत आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराज आणि अफजलखानाची भेट ठरलेली आहे. देशपांडे सर इतकं छान वर्णन करून सांगत आहेत की मनाने सगळेजण तो क्षण अनुभवयायला तिथे पोचले आहेत. महाराज खानाच्या भेटी साठी निघतात, तेवढ्यात तास संपल्याची घंटा होत. सगळेजण हिरमुसतात.
“भाई – पूर्वरंग” पहात असताना ती खास मैफल संपली तेव्हा मला अगदी असंच वाटलं होतं.
शाळेतल्या मुलाचं ठीक होतं.
त्यांना दुस-या दिवशी किंवा तीस-या दिवशी देशपांडे सर अफजलखानचा कोथळा बाहेर काढुन दाखवू शकत होते पण इथे “भाई – उत्तरार्ध” येण्यासाठी ८ फेब्रुवारी पर्यत म्हणजे तब्ब्ल एक महिना महेश गुरुजींनी ( tutorial वाले नव्हे ) थांबयला भाग पाडले होते.
पण तरीही या महिन्याभरच्या कालावधीत पूर्वरंगाच्या ‘ नशेत ‘ भले भले ‘रम’लेले दिसले आणि काल ८ तारखेला जेव्हा उत्तरार्धासाठी खुर्चीवर बसलो तेव्हा समोर पडद्यावर कुठल्या तरी फालतू जहिराती चालू असताना वसंतराव, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांची मैफल परत कानात गुंजी घालू लागली. शब्द ऐकू यायला लागले ” कानडा राजा पंढरीचा, यमुना किनारे मेरो गांव! सांवरे आजइयो,सांवरे”
आता या उत्तरार्धात,भाईंबरोबर “ऋणानुबंधाच्या कुठून, कशा आणि कुणाकुणाशी गाठी जुळल्या हे पहायची उत्सुकता लागून राहिली होती. तेवढ्यात श्रेयनामावली सुरु होऊन एक सुंदर अभंग सुरु झाला. अनोखे सरप्राईज होते ते माझ्यासाठी कारण माझा आवडता अभंग लागला होता ” इंद्रायणी काठी”.
ख-या अर्थाने सबकुछ पु.ल म्हणता येईल अशी पु.लं ची कलाकृती ‘ गुळाचा गणपती’ यात हा अभंग आहे आणि भाई उत्तरार्ध ही प्रदर्शित झाला ‘गणेश जयंतीलाच’. छान योगायोग ना?
हे गाणं ऐकताना वाटत होतं श्रेयनामावली अजून जरा वाढवता आली असती तरी चालले असते
भाग १- च्या शेवटी सुरु झालेली मैफल ही ख-या अर्थाने संपते ती कुमार गंधर्व यांच्या इंदूरच्या घरी. कुमारजी आजारी असताना हे सगळे त्यांना भेटायला जातात. यावेळेला बरोबर माणिक ताई पण असतात. ‘यमुना किनारे मेरो गाव’ पासून सुरु झालेेली मैफील परत या गाण्यापाशी येऊनच पूर्ण होते आणि एक वर्तुळ पुर्ण होते. या मार्गात मग अनेक गाणी भेटतात
कबीराचे विणतो शेले,
खरा तो प्रेमा ला,
सुरत पिया की न छीन बिसुराये,
आगा वैकुंठीच्या राया.
माझ्यामते हे पुर्ण होणारे वर्तुळ म्हणजे या दोन्ही भागाचा आत्मा आहे.
भाई- उत्तरार्धाच्या सुरवातीलाच नाटकासाठी
विजया बाई – सुनीता बाई यांच्यातील भूमिकेसाठी पात्र निवडीचा प्रसंग छान जमलाय. दवाखान्यात भाईंना भेटायला गेलेल्या विजयाताईंनी २४ x ७ बातम्यांचा दणका देणा-या मिडियाला सणसणीत मारलेली चपराक पाहण्यासारखी.
दूरदर्शन चे ‘प्रकाशवाणी’ हे नाव एका मराठी द्वेष्ट्या अधिका-या मुळे कसं राहून गेलं, त्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर खुलंलेले भाई, आणि नोकरी सोडल्याच्या निमित्याने झालेल्या पार्टीत कुमार गंधर्वांनी सादर केलेले ‘ अजुनी रुसूनी आहे ‘ खुलता कळी खुलेना ‘ चे सादरीकरण अफलातून. इथेच बटाट्याच्या चाळीचा जन्म झाला.
आणि यानंतरच भाईंनी,’ मी आता मला पाहिजे तसे जगणार’ हे ठरवले अन करुन दाखवले.
‘बटाट्याचा चाळीचा’ हा प्रयोग पाहून रात्री २ वाजता ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ‘ यांनी भाईंना केलेला फोन आणि पुढील १०००० वर्षात असा पु.ल होणे नाही म्हणून दिलेल्या शुभेच्छा , संगीत नाटकातलही जयमाला शिलेदार -राम यांचा प्रयोग, “रवी मी चंद्र कसा”हे गाणे, तेंडुलकर – भाई यांच्यातील संवाद(डॉ काशीनाथ घाणेकर – श्रीराम लागू जुगलबंदीची थोडीशी आठवण करुन देणारा)
शाळेतील जूना मित्र बारक्या -स्काॅलर भाई यांचा प्रसंग, बाळासाहेब ठाकरे- महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानंतरचे नाट्य, ‘तूला शिकवीन चागंलाच धडा असे म्हणत दवाखान्यात झालेली बाळासाहेबां नंतरची भक्तीची एन्ट्री. हे सगळ एकदम कडकच म्हणावे लागेल !
भाईच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा – समाजसेवा आणि त्यांचे बाबा आमटे याच्याबरोबरचे काम
– आदरणीय बाबा आमटे यांच्या आश्रमात भाई तेथील मुलां बरोबर ” नाच रे मोरा अंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच” या गाण्यावर नाचतात. ही केमिस्ट्री मस्त जमलीय. हे गाणे पाहून मला वाटते प्रत्येकाच्या लहानपणीच्या शाळेतील स्नेहसंमेलनाच्या आठवणी जाग्या होतील.
मराठीतील दोन बायोपिक मधे ( डाॅ काशिनाथ घाणेकर आणि भाई-२) झळकण्याचा मान
” नाच रे मोरा ” ? या गाण्याला मिळाला आहे. असे भाग्य दुस-या कुठल्याही गाण्यास आजपर्यंत मिळाले नसेल. ख-या अर्थाने ह्या गाण्याचा once मोर झाला असे म्हणता येईल
आजकाल मोठ्या मोठ्या पार्ट्यात कुणी हाय फाय इंगजी बोलत सुत्रसंचालन करणारी मॅडम, सगळ्यांना घेऊन ग्रुप डान्स करताना एखादा अंगविक्षेप करते आणि त्याच स्टेपची हुबेहूब नक्कल बाकीचे करतात. त्यांनी हा भाई आणि या मुलांनी केलेला नृत्याविष्कार जरुर पहावा. छोट्या छोट्या पण पहावयाला सुखकारक स्टेप्स कशा करता येतात हे नक्की शिकता येईल.
आनंदवनातल्या आणि आमटे यांच्याबद्दल बोलताना भाई बोरकरांची एक कविता सांगतात
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
भाई, अगदी पटले हे. हेच तुमचे ही हात जे हार्मोनियम वर अगदी सहजपणे फिरले आणि त्यांनी सुरांची मैफल निर्मिली, लेखणीतून अजरामर साहित्य निर्माण केले. या निर्मिती मागचा ध्यास या बोरकरांच्या कवितेतून दिसून येतो.
कुमार गंधर्व गेल्याचीे दु:खद बातमी कळल्यावर भाई म्हणतात, “आम्ही हा जन्म आनंदाने जगलो कारण आम्ही कुमार ऐकला”
भाई, एक सांगतो, आज आम्ही पण असे म्हणू की आम्हीही आनंदाने जगू कारण आम्ही ‘भाई’ पाहिला, भाईंचे लेखन वाचले आणि अनुभवलेही.
“शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”
असे शेवटचे गाणे जेंव्हा सिनेमा संपताना लागते तेंव्हा एकच गोष्ट जाणवते,
“भाई पाहून कळले सारे भाईं च्या पलीकडले”
समाप्त
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com