सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
१) उत्तर हिमालयीन नद्यांचा जोड .
गंगा यमुना मेघना यांचे प्रवाह पश्चिमेकडे वळवून कालवा व जलाशय बांधावेत अशी कल्पना आहे .ब्रह्मपुत्रेचे तर आपण फक्त 25 टक्केच पाणी वापरतो. बरेचसे पाणी वाया जाते .नदी प्रवाह वळविला तर पूर नियंत्रणाबरोबर वीज निर्मिती व सिंचनवाढ होईलच .त्याच बरोबर त्याचा फायदा नेपाळ आणि बांगलादेशलाही होईल. हिमालयीन घटकांसाठी 14 अंतर दुवे योजिले आहेत .
घागरा –यमुना /सारडा- यमुना / यमुना –राजस्थान/ राजस्थान –साबरमती / कोसी– घागरा –कोसीमेची / मानस –संकोष / टिस्टा– गंगा / जोगिगोपा– टिस्टा –फरक्का / गंगा –दामोदर– सुवर्णरेखा / सुबरनरेखा– महानदी / फरक्का –सुंदरबन/ गंडक –गंगा / सोनमधरण– गंगा जोडव्याच्या दक्षिण उपनद्या—– या योजनेपैकी बरेचसे अभ्यास पूर्ण झाले आहेत.
२) द्विपकल्प घटक.
या घटकाचे पुन्हा उपभाग केले आहेत.
अ) पहिल्या टप्प्यात गोदावरी– महानदी —कृष्णा आणि कावेरी कालव्याद्वारे जोडल्या जातील .या नद्यांच्या काठावर धरणे बांधून त्याचा उपयोग दक्षिण भागासाठी केला जाईल.
ब) दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या उत्तर आणि तापीच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडील काही नद्या जोडल्या जातील. याचा उपयोग मुंबईला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात सिंचनासाठी होईल.
स) तिसऱ्या टप्प्यामध्ये केन आणि चंबळ जोड ,हा मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागासाठी उपयुक्त ठरेल.
द) चौथा टप्पा हा पश्चिम घाटातील अनेक पश्चिमवाहिनी नद्यांना, कावेरी आणि या पूर्व वाहिनी नद्याना सिंचनासाठी जोडल्या जातील .द्वीप घटकांच्या अंतर्गत आणखीही जोड विचाराधीन आहेत.
3) इन्ट्रास्टेट घटक.
महानदी — गोदावरी हा 800 किलोमीटर लांबीचा प्रकल्प तिस्ता –महानंदा –सुवर्णरेखा नद्यांमधून भूतान कडून आंध्र मधील गोदावरी पर्यंत उद्भवणाऱ्या संकोषा नदीला जोडेल .अलमट्टी– पेन्नर– नागार्जुनसागर — सोमासिला जोडाचा खर्च कमी होण्यासाठी वेलीगोंडा बोगद्याने श्रीशैल्यम ते सोमासिला जलाशयात रूपांतर केले. पांबा — अंजकोविल , पार– तापी — नर्मदा– परबती –काळी, सिंध –चंबळ, पोलावरम– विजयवाडा, श्रीशैल्यम– पेन्नर हे वापरात आहेत .दमणगंगा —पिंजल ,कट्टलई– वैगाई– गंदर, केन –बेतवा ,नेत्रावती–
हेमावती ,बेटी –वरदा वगैरे जोड प्रकल्पांपैकी ,काहींचे अभ्यास पूर्ण झाले आहेत. पेन्नयार– शारंगपाणी हा इन्ट्रास्टेट नसला तरी बिहारने सहा, महाराष्ट्राने 20, गुजरात, ओरिसा, तामिळनाडू, झारखंड यांनीही जोडणी प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. बियास– सतलज तसेच पेरियार — वायगई जोड पूर्ण झाले आहेत.
अशा या महाकाय प्रचंड खर्चाच्या, पण खूप मोठ्या फायद्याच्या प्रकल्पां बद्दल अनेक टीकाकारांनी शंका व्यक्त केल्या . पूर नियंत्रणासाठी दुसरे पर्याय वापरावेत. पर्यावरणाला धोका पोहोचेल .काही भागातील जमिनीची क्षारता वाढेल. अनेक कुटुंबे विस्थापित होतील . जैवविविधतेवर परिणाम होईल. नदी शंभर वर्षांनी पात्र बदलते, मग याचा काय उपयोग ? प्रस्ताव खूप महाग आहे .त्यामुळे आरोग्य, शिक्षण ,रस्ते या क्षेत्राकडे निधी कमी होईल.
जागतिक स्तराचा विचार करता असे प्रकल्प किती फायदेशीर झाले आहेत याची अनेक उदाहरणे सांगता येतील. डँन्यूब कॅनॉल, उत्तर समुद्र आणि अटलांटिक महासागर– काळा समुद्र जोड, जगातील सर्वात मोठा जिन्शा नदीपासून सहाशे किलोमीटर लांबीचा, 63 बोगद्यांसह , युनान प्रांतातला प्रकल्प, यांगत्से –येलो जोड , स्पेन मधील चार नद्यांची खोरी जोड, मरे –डार्लिंग जोड ,अमेरिकेतील इलिमाँय नद्या, तलाव, आणि मिसिसिपी नदीमार्गे मेक्सिको पर्यंत 540 किलोमीटर लांब, टेनेसी –टाँबी ७३७७कि.मी. जलमार्ग , गल्फ इंस्ट्राकोस्टल — फ्लोरिडा ते टेक्सास १७००कि.मि.चा जलमार्ग हे सर्व प्रकल्प फायदेशिर व यशस्वी झाले आहेत.नदीजोड प्रकल्प राज्यांतर्गत राबविण्याचे धोरण राज्य सरकारने यापूर्वीच स्वीकारून शिक्कामोर्तब झाले आहे .1979 पर्यंत भारताने 600 हून अधिक धरणे बांधली आहेत. उल्हास, वैतरणा ,नारपार ,दमणगंगा, खोऱ्यातील 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी गोदावरी कडे वळवून ,मुंबई कोकण आणि दुष्काळी मराठवाड्याकडे त्याचा फायदा दिला जाणार आहे.
पन्नास वर्षापूर्वी राजारामबापूंच्या कारकिर्दीत ते कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागांसाठी खुजगाव धरणासाठी आग्रही होते. त्यावेळी शिराळा ,वाळवा तालुक्यात पाण्याचे साठे होते. त्यावर राजकारण झाले आणि ते न झाल्यामुळे राज्याचे नुकसान झाले. तेव्हा त्यांचा आग्रह मानला असता तर, त्या भागाचा पन्नास वर्षापूर्वीच विकास झाला असता. अटल बिहारी वाजपेयी, विश्वेश्वरय्या ,करुणानिधी यांनीही देशातील अनेक समस्यांवर” नदी जोड प्रकल्प “हाच उपाय असल्याचे सांगितले.
गेल्या आठ-पंधरा दिवसातील देशातील चित्र पाहिले तर अर्धा देश ,अर्धा महाराष्ट्र पुराने व्यापला गेला. कृष्णेच्या खोऱ्यातील 12 धरणे कोल्हापूर ,सातारा ,आणि सांगली जिल्ह्यात येतात. पुरामध्ये तिन्ही जिल्ह्यांचे अपरिमित नुकसान झाले. जमिनी ,माणसे, जनावरे ,घरे पुरात वाहून गेली. याउलट काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत राहिला . माणगंगेचे पात्र कोरडे राहिले अशावेळी ‘नदीजोड प्रकल्पाची’ महती आणि गरज आपल्या लक्षात येते.
जागतिक स्तरावरील यशस्वी आणि फायदेशीर उदाहरणांचा विचार करता ,आपण त्यांचे अनुकरण ,त्यांचे तंत्रज्ञान स्वीकारायला काय हरकत आहे? हा एक महाकाय आणि प्रचंड खर्चिक प्रकल्प आहे ,हे मान्य आहे .पण त्यासाठी केवळ ही सरकारची जबाबदारी नसून, राष्ट्र विकास डोळ्यासमोर ठेवून, प्रत्येक नागरिकानी, उद्योगपतीनी काही अंशी वाटा उचलायला काय हरकत आहे ? गंगा —कावेरीचे स्वप्न साकार झाले तर भारत याच शतकात महासत्ता होईल अशी अपेक्षा करूया——–
गंगा ,यमुना ,पद्मा ,मेघना.
कृष्णा, कोयना आणि वेण्णा.
घागरा ,तिस्ता, चंबळ, गोदा.
तापी ,माही आणि नर्मदा.
जेव्हा जुळतील साऱ्या भगिनी,
संपन्न होईल भारत भूमी.
सार्ऱ्यांच्या त्या होतील जननी.
सुजलाम सुफलाम या नंदनवनी.
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता.
मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈