सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर

        आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.’

भाकरीचे उदाहरण देऊन संसाराचा सार्थ अनुभव बहिणाबाईंनी सांगितलाय. भाकरी हवी असेल तर त्यासाठी तव्याचे चटके, चुलीची धग सहन करायलाच हवी. कोणतीही इच्छित गोष्ट सहज प्राप्त होत नाही असेच बहिणाबाईंना सुचवायचे आहे. सुख हवे असेल तर दुःख झेलावे लागते,हिरवळ हवी असेल तर उन्हातानातून चालावे लागते,परमेश्वरभेट हवी असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागते, मोह मायेपासून अलिप्त रहावे लागते. थोडक्यात एखादी गोष्ट विनासायास मिळाली की तिचे महत्व रहात नाही मात्र तीच वस्तू प्रयत्नातून,परिश्रमातून मिळाली असेल तर तिचा आनंद अवर्णनीय तर असतोच पण चिरंतर देखील असतो.

एखादी माऊली एकाग्र होऊन चटचट भाकरी थापते आणि प्रत्येक भाकरी टम्म फुगते.चुलीवरच्या त्या भाकरींचा ढीग आपण भान हरपून पहातो आणि तिच्या कौशल्याचे मनातून कौतुक करतो,किती छान वाटते आपल्याला!पण तिने हे कौशल्य आत्मसात करायला बराच वेळ घालवलेला असतो,निरीक्षण,प्रयोगातून आणि सरावातून हे कौशल्य तिला सहज प्राप्त होते. ‘Practice makes man perfect’ एखाद्या गोष्टीच्या सरावाने माणूस त्यात अव्वल होतो.

तरीही भाकरी करायला शिकण्यापासून ती परफेक्ट जमणे आणि सराव होणे ही तशी किचकटच प्रक्रिया आहे.चांगली भाकरी जमणे हे करणारीच्या हातोटीवर तर अवलंबून आहेच पण बाकीच्या गोष्टी पण त्यास कारणीभूत असतात.

खरे तर चांगल्या पिठापासूनच भाकरीची सुरुवात होते.गिरणीवर पीठ कसे दिले?यावर चांगल्या भाकरीची यशस्वीता अवलंबून असते.ज्वारी खूप जुनी असेल किंवा पावसात भिजलेली असेल तर पीठ वसवसते आणि भाकरी थापता येत नाही,कितीही पट्टीची सुगरण असली तरीही!

गिरणीत गव्हाच्या किंवा डाळीच्या दळणावर ज्वारी दळून दिली असेल तरीही भाकरी तव्याला चिकटते किंवा भाकरी डागलते.आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्वारीची वेगळी आणि गव्हाची वेगळी गिरण असते त्यामुळं ती समस्या नसते मात्र ग्रामीण भागात अजूनही एकच गिरणी सगळ्या दळणाला वापरली जाते.हल्ली भाकरी गॅसवर हेंदालीयमच्या तव्यात भाजली जाते त्यामुळं भाकरीला सर्व बाजूने हवी तशी आच देऊन भाकरी चांगली करता येते.त्याचबरोबर आता पहिल्यासारखी कसलीपण ज्वारी नसते,प्रतवारीनुसार व गुणवत्तेनुसार बाजारात ज्वारी मिळते व अशा ज्वारीची  भाकरी चांगलीच होते.एकूण काय तर हल्ली चांगली भाकरी यायला फारसे कष्ट पडत नाहीत किंवा नवशिकिला भाकरी लगेचच जमू लागते शिवाय हल्लीच्या मुलींना आत्मविश्वास खूपच आहे कारण काही बिघडले,चुकले किंवा पीठ,भाकरी वाया गेली तरी घरचे रागवत नाहीत.त्यामुळं थोड्याशा सरावाने तिला चांगल्या भाकरी जमू लागतात.पण आमच्या लहानपणी आम्ही मुळाक्षरापासून शब्द शिकण्यासारखे भाकरी करायला शिकलो.

सर्वसाधारण वय वर्षे बारा किंवा अगोदरच भाकरी करायला आली पाहिजे असा अलिखित दंडक होता. स्वैपाक प्रथम, शाळा दुय्यम होती, त्यामुळं तितक्या वर्षाची मुलगी झाली की लगेच कुणीपन घरात आले की लगेच पोरीला बघून विचारायचे,’स्वैपाक पाणी येतोय की नाही अजून?’ मग येत असला की कौतुक व्हायचं, नसला येत की नावे ठेवत, त्यामुळं आपल्याला स्वैपाक आला पाहिजे ही आंतरिक हुरहूर आणि तळमळ प्रत्येकीला असायची. पण एकदम भाकरी शिकणे किंवा नुसती भाकरी येण्यालाही महत्व नव्हतं;तत्पूर्वी घरातील बारीक सारिक कामे पहिली यायला हवीत, ती अगदी पहिली दुसरीपासून सुरू होत. झाडलोट, राखकेर भरणे, भाज्या निवडणे,पाणी भरणे, चुलीपुढं जळण आणून ठेवणे, दुकानातून काहीबाही घरच्या गरजेच्या वस्तू आणणे,आई स्वैपाक करताना तिथंच बसून हाताखाली लागणाऱ्या वस्तू देणे आणि हे करतच स्वैपाकाचे म्हणजेच भाजी कशी फोडणीला टाकायची, आमटी कशी करायची, कशात काय घालायचं आणि कशात काय घालायचे नाही? याचे अचूक निरीक्षण करायचे त्याचबरोबर आई, आजी किंवा घरातील मोठी स्त्री भाकरी कशी करते हेही स्वैपाकघरात बसून बघावे लागे. यातूनच मग स्वैपाकाचे तंत्र शिकता यायचे आणि गोडीही लागायची.अधे मध्ये एखादा छोटा गोळा घेऊन भाकरी थापता येते का याचे प्रात्यक्षिक करून बघायला मिळायचे.

अचानक एखादे दिवशी कोणीतरी म्हणे,’आज भाकरीला बस.’ त्यावेळी आनंद ही होई आणि भीतीही वाटे, भाकरी जमणार का नाही? प्रथम चुलीतला जाळ एकसारखा करायचा, लोखंडी जडशीळ तवा चुलीवर ठेवायचा, त्यात उसुळला (उथवणी) भाकरीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. परातीत पिठाचे गोल आळे करायचे, त्यात तव्यातलं उकळलेले पाणी ओतायचे.उलथण्याने पीठ हळुवार कालवून बाजूला सारायच. तोपर्यंत तिकडं हलक्या बोटांनी चुलीचा जाळ एकसारखा करायचा,चार काटक्या आत सारून फडक्याला बोटं पुसून पीठ मळायला सुरुवात करायची.इथंच हाताला पहिला चटका बसतो.

क्रमशः….

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments