सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(इथंच हाताला पहिला चटका बसतो.) इथून पुढे —-

एका हाताने पाणी न दुसऱ्या हाताने पीठ मर्दत रहायचे,पाणी बेतानेच घालत रहायचं अन्यथा पीठ पातळ होते आणि भाकरी थापली जात नाही.तर पीठ मळत मळत छानसा मऊ गोळा तयार करायचा मग परातीत थोडेसे पीठ पसरून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने गोल गोल थापायला सुरुवात करायची,डावा हात कडेला लावून आकार एकसारखा राखण्याचा प्रयत्न करायचा.(अधून मधून जाळ एकसारखा करत रहायचं,एक म्हणजे एकच काम करत राहिले तर तवा थंड पडायचा.)थोडी पुढं सरकली भाकरी की मग दोन्ही हातानी थापायला सुरुवात करायची.उजवा हात मध्यभागी न डाव्या हाताने  कडेवर एकसारखा हलकासा दाब देत देत गोळ्याच्या प्रमाणात भाकरीचा गोल ठरवायचा.(पण भाकरी थापताना पण एक गंमत होते-गोळ्या खाली पीठ जास्त झाले तर बाजूच्या कडांवर येते आणि भाकरी भाजली की ती  खालच्या बाजूने पिठूळ पांढरी दिसते.पीठ कमी झालं तर भाकरी मधेच चिकटते आणि गोल फिरत नाही आणि पुढेही सरकत नाही; म्हणून खालच्या पिठाचा बिनचूक अंदाज अनुभवानेच येतो.)एकदम गोळा घट्ट झाला की भाकरी चिरते.भाकरी चिरली की तिथं मळलेल्या पिठाचा जोड दिला तरीही ती एकसंध होत नाहीच.गोळा घट्ट झाला तरी भाकरी पुढं सरकत नाही आणि गोळा पातळ झाला तरी खाली चिकटतो आणि भाकरी पुढं सरकत नाही किंवा  भाकरी उचलून टाकताना तुकडे तरी पडतात किंवा मधेच हात जाऊन भसका तरी पडतो.इतकी सारी काळजी घेत थापलेली भाकरी  हळुवार पणे कडेला नेत पटकन उचलून तव्यात न सुरकुती पडता चटकन टाकण्याचे पण कसब असावे लागते.पूर्वीचे लोखंडी तवे खोलगट असायचे भाकरी तव्यात टाकताना मनगटाच्या आतल्या बाजूने बांगडी जवळ चरदिशी चटका बसायचा,हा दुसरा चटका! आता जाळ पुन्हा एकसारखा करून समान जाळ लागतोय का बघायचे अन्यथा जिथं कमी जाळ लागत असेल तिथं तवा थोडासा उचलून दगडाची बारीक चिप सारायची मग भाकरीवर पुरेसे पाणी फिरवून दुसऱ्या भाकरीकडे वळायचे.जसजशी चूल तापू लागेल तसे निखारे बाहेर काढायचे,भाकरीला लावलेले पाणी सुकले असले तर भाकरी पलटी करून पुन्हा तव्यात टाकायची.( इथं पण एक गंमत अशी होते की पाणी जास्त झाले तर भाकरी पचत नाही लवकर आणि लावलेले पाणी सुकून गेले तर भाकरी चिरते न कडक होते त्यामुळं कींचित ओली आहे तोवरच भाकरी पलटायची)

चुलीतला जाळ एकसारखा करत तव्यातली सर्व बाजूनी भाजलेली भाकरी चुलीतले निखारे बाहेर छोट्या वाफ्यात बाजूला ओढून लावायचे त्याला चुलीचा आधार देऊन भाकरी उभी करायची,तोपर्यंत परातीत थापून झालेली भाकरी तव्यात टाकायची,जाळ एकसारखा करायचा,एखादी ढलपी,शेणकुटाचा तुकडा किंवा चार चिपाड आत सारून नवीन भाकरी थापायला घ्यायची, तोपर्यंत निखाऱ्यावरची भाकरी फुललेली असते,ती काढून बुट्टीत टाकायची.पहिल्या भाकरीतला एक छोटासा तुकडा काढून अग्नीला अर्पण करायचा आणि पाण्याचे चार शिंतोडे चुलीत मारायचे मग पुढच्या भाकरीकडे वळायचे. जळण बाभळीचे,लिंब करंज असे कठीण असले तर निखारे चांगले रसरशीत पडतात मग भाकरी पटपट भाजतात. नुसत्या चिपाडाचे निखारे पडत नाहीत त्यामुळं जळण चांगल्या दर्जाचे असले तरच भाकरी पटापटा होतात चूल एकसारखी धगधगत रहाते आणि कितीही भाकरी कराव्या लागल्या तर कंटाळा येत नाही.चिपाड मात्र सारखी विझतात आणि सारखा जाळ घालून भाकरी थापताना बाईचा जीव रडकुंडी येतो.या सर्वातून तावून सुलाखून बाई भाकरीत निष्णात होते.

तर कुणाच्याही भाकरीला इथून पुढं नावं ठेवताना भाकरियन नक्की आठवा.

आजकाल मुलींना कुणी स्वयपाक घरात येऊच देत नाही त्यामुळं आई स्वैपाक करताना निरीक्षण बिरीक्षण असली काही भानगड नसते शिवाय स्वैपाक करण्याची गोडीही लावली जात नाही. गॅसवर भाकरी चांगल्याच होतात .एखादं वेळेस भाकरी नाही आली तरीही चालते कारण दोन वेळेस चपातीच खाल्ली जाते. आमची मुलगी शिकल्या, नोकरी करणार मग स्वैपाकाची तिच्याकडून स्वैपाकाची अपेक्षा करू नका असे सांगणारे देखील आईवडील आहेत पण माणूस प्रेमाने बांधून ठेवण्यात चांगल्या स्वैपाकाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.

असो,आम्ही अशा पद्धतीने शाळा शिकत शिकत सर्वच कामे करत जबाबदार झालो.त्यामुळं जीवनात कधीच कुठल्या प्रसंगाला मागे हटलो नाही कितीही स्वैपाक असो,धुणे असो की भांड्याचा खिळा काहीच वाटत नाही सहजच कामे करून टाकतो.

स्वतःचे पोट भरण्याइतपत तरी चविष्ट आणि सकस स्वैपाक प्रत्येकीलाच करता यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे.बाहेरचं कितीही महागडे चविष्ट  खाद्यपदार्थ असले तरी घरच्या साध्या सात्विक जेवणाची सर नाहीच!

(कसे वाटले भाकरियन? आवडले तर नक्की पुढं पाठवा)

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments