विविधा
☆ भोग जे येती कपाळी ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
एक म्हातारी साधारण साठ एक वयाची रस्त्याच्या कडेला रडत बसलेली दिसली. चांगल्या घरातली वाटत होती. कुणी असं दिसलं की नकळतच माणुसकी जागी होतेच. तसेच मीही तिच्या जवळ गेले आणि विचारलं ” काय झालं आजी? रडताय का?” तशी ती म्हणाली ” भोग आहेत भोग! माझ्या नशिबाचे भोग भोगतीय मी!” रडणं थांबत नव्हतंच.मग तिला पाणी दिलं. इतरांच्या मदतीनं तिला उचललं. एका बऱ्याशा हॉटेलमध्ये नेलं. खाऊ पिऊ घातलं. नंतर तिला बोलतं केलं. तिनं सांगितलेली तिची हकिकत अंगावर काटा आणणारी होती.
तिचा नवरा कोरोनानं गेला. बऱ्यापैकी पैसा तो बाळगून होता. मुलगा सून नातवंडे , स्वतः चं घर ,सगळं व्यवस्थित होतं. पण अलीकडे सुनेला ती घरात नकोशी झाली होती. सुनेच्या सांगण्यावरून मुलानं तिच्या बॅ॑क अकाउंटला स्वतः ची नावे लावली होती. आणि हळूहळू तिच्या सगळ्या पैशांवर डल्ला मारला.आज तर कहरच झाला होता. मुलगा घरी नाही हे पाहून सुनेने तिला घराबाहेर हाकलून दिलं . आणि वर पुन्हा धमकी दिली की परत आलात तर मीच रॉकेल ओतून पेटवून घेईन.
“आता याला काय म्हणायचं? माझंच नशीब फिरलं.भोग का भोगायला लावतोय देव मला? काय वाईट केलं मी कुणाचं?” म्हातारीच्या रडण्याला अंत नव्हता. अगदी करूण प्रसंग होता.
भोग!!! का भोगायला लावतो देव आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात भोग हे भोगावेच लागतात.देवादिकांनाही भोग चुकले नाहीत. राम, कृष्ण या सर्व मानवी अवतारात देवानेही भोग भोगले. संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा वगैरे संतांना सुद्धा
भोगांनी सोडले नाही.तिथं तुमची आमची काय कथा?? स्वरूप वेगवेगळं असतं. पण दु:ख म्हणजे भोग का? की सुखाचेही असतात भोग? देवानं सगळ्यांना सुख दुःख दिलंय. कुणाच्या वाट्याला कमी जास्त सुख दुःख आहेच. जे नशिबी येतात ते भोग भोगावेच लागतात.
कोणाला ते भोग भोगण्याची ताकद असते किंवा येते.म्हणजेच मनाचा खंबीरपणा त्याच्याकडे असतो. जो मनाने दुबळा , कमकुवत असतो.त्याला भोगातून दु:खच वाट्याला येतं.त्यातूनच माणसाला क्वचित शहाणपण येतं.
भोग आणि उपभोग या अगदी भिन्न गोष्टी आहेत. त्या उपभोगाला सुख या शब्दाची झालर आहे. हे उपभोग सुखासाठीच असतात. अर्थात त्या उपभोगांनी सुख मिळतं की नाही ,कुणास ठाऊक!!! पण माणसांची प्रवृत्ती उपभोगाकडे जास्त झुकते. एकदा का उपभोगाची सवय झाली की ते उपभोग नाही मिळाले तर माणसाला तेच आपले भोग आहेत असे वाटते. म्हणजेच भोग हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. ते भोगायला लागतातच. त्यांची तीव्रता तुम्ही त्याला कसे तोंड देता यावर कमी जास्त होते.
“भोग जे येती कपाळी, ते सुखाने भोगतो”
असं कविवर्य सुरेश भट म्हणतात. एखाद्या स्त्रीचा पती अकाली गेला, तिच्या वाट्याला फरफट आली तर ते तिचे भोग झाले. पण एखाद्या स्त्रीचा पती म्हातारपणी, अंथरूणाला खिळून होता, नंतर गेला तर तो ‘सुटला’ असं वाटतं. ते त्या स्त्रीचे भोग ठरत नाहीत. म्हणजे परिस्थिती नुसार भोगाची किंमत होते. कमकुवत मन असलेला कमजोर पडतो आणि आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबितो.
भोगातून बाहेर पडण्यासाठीही माणूस मार्ग शोधतो. देवधर्म, उपासतापास, नवससायास,हे मार्ग अवलंबितो. स्वतःचं मन स्थिर ठेवणं हा उपाय येथे महत्वाचा आहे. त्यासाठी जप, नाममंत्र, गुरूपदेश यांचाही आधार घेतला जातो. कुणी साधनेचा मार्ग चोखाळतात. तर कुणी साधनेच्या नावाखाली मूळ मुद्द्यापासून दूर पळतात.
योग, प्राणायाम, योग्य व्यायाम, नेहमी नकारात्मक विचार न करता चांगला , सकारात्मक विचारच करणे इत्यादी गोष्टींनी मन स्थिर राहण्यास मदत होते.
एकदा भोग भोगून झाले की ते पुन्हा येणार नाहीत याचाही भरवसा नसतो. जे खरोखर नशीबवान , त्यांना नसतील लागत ते भोगायला. पण काहींच्या नशिबी खरंच काही अडचणी, भोग ठाण मांडून बसलेले असतात.
खरोखरच साधना करून किंवा कोणी चांगला गुरू भेटला तर यातून तो मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी देवांवर, गुरूंवर ,माणसाची दृढ श्रद्धा, भक्ती, विश्वास हवा. पंढरपूरला आषाढीच्या सोहळ्याला माणसांचा महासागर लोटतो. ते केवळ एका पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी, भक्तीपोटीच!! त्या बिचाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबात भोग नसतील का? असतीलच!!! पण विठोबाच्या चरणापाशी आल्यावर त्यांना त्यांच्या भोगांचा तात्पुरता विसर तरी पडतो.
म्हणजेच जे देवाने दिले, दैवाने दिले ते भोग सुखाने भोगावेत. त्यासाठी श्रद्धा, भक्ती, साधना आवश्यक आहे. बाकी आपापल्या भोगातून सुटका कशी करून घ्यायची हे ज्याचे तोच जाणतो.
राहता राहिला प्रश्न त्या म्हातारीचा!! तर तिला महिला बाल कल्याण समिती कडे सुपूर्द करून तिचे भोग कमी करण्याचा थोडा तरी प्रयत्न केला आहे.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈