डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३  – बालमानस -१ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,    

घरातील लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते   

नीट ऐकून मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या

बालवयात होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.

नरेंद्र असाच सर्वांपेक्षा वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली. एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने  समजूत काढायची म्हणून, हो म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी  त्या केळीच्या वनात गेला,  खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी. आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.

त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते अदबीने वागत बोलत. प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम -सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.

असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी आणि मोठ्यांनी खूप विचार पूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट काळजी घेतली पाहिजे.

क्रमशः …

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments