प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
विविधा
☆ भूक आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
दोन अक्षरी शब्द ज्यात सर्व विश्व व विश्वाचे गुपित दडले आहे. विश्व जसे अनादि अनंत आहे तशीच भूक पण अनादी अनंत आहे. किंबहुना जशी विश्वनिर्मिती झाली तशी भूक पण निर्माण झाली. मनुष्य, पशु पक्षी चर अचर ह्या जीव वैविध्यपूर्ण सृष्टीत भूक ही अशी गोष्ट आहे की त्यासाठीच सर्व जग राहाटी चालू होती, आहे, आणि राहील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जो जो प्राणी जन्माला आला तो तो जन्मजात भूक घेऊन आला. भूक आहे म्हणूनच सर्व काही आहे भुकेसाठीचा संघर्ष अबाधित चालू आहे.
“काय आहे ही भूक”. भूक ही अनेक प्रकारची आहेच, सरळधोटपणे जीवन जगताना जी ऊर्जा हवी ती शरीराला पुरवणारे अन्नघटक, पोटात घेऊन त्याचे रूपांतर शरीर अवयवात, शरीरवाढीसाठी करणे म्हणजेच शरीर पोषण करणे. आम्ही म्हणतो भूक पोटात लागते पण मित्रांनो भूक ही सर्व शरीररसरक्तादि अवयवांची भूक ही पोटातील अवयव, ज्याला आपण अन्नाशय किंवा आमाशय पुरवत असते.
सर्व प्राणीमात्रादी अन्नप्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने असले तरी सगळ्यांचं काम एकच भूक शमवणे व आपले अस्तित्व कायम राखणे, जीवित राहणे. जीवन जगण्याचा केलेला आटापिटा हा भुकेसाठीच असतो.
॥ अन्नपूर्णा ॥
।। अन्नपूर्णे सदा पूर्णे
शंकर प्राण वल्लभे
ज्ञान वैराग्य सिद्धर्थम
भिक्षां देहीच पार्वती ।।
वरील श्लोकात शंकराचार्य काय म्हणतात बघा… अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती. चक्क महादेवसुध्दा पार्वतीकडे भिक्षा मागतात. कुठल्या प्रकारची तर ज्ञान मिळण्यासाठी व वैराग्य प्राप्तीसाठी भिक्षा मागतात. भिक्षा म्हणजे भीक मागणे.
भीक कशासाठी तर पोट भरण्यासाठी नव्हे तर ज्ञान” व ज्ञानेश्वर” मिळवण्यासाठी. याचाच अर्थ मित्रानो भूक म्हणजेच मोह आहे, हा मोह साक्षात पार्वती आहे, तिच्याकडे. शरीरवाढीसाठीची भिक्षा भूक शमविण्यासाठी मागितली आहे.
किती प्रकारची भूक आहे.
शरीरासाठी आवश्यक अन्न!
14 विद्येसाठीची भूक !
64 कलेची भूक ही ! ज्ञानप्राप्तीसाठीची आहे
वैराग्य भूक ही सर्व आयुष्यातील टप्पे पार झाल्यावरची आहे.
भूक ही कलेसाठी,
भूक शरीर शय्यासुखासाठी’:
भूक शरीर रक्षणासाठी,
भूक ही ज्ञान, मिळविण्यासाठी
शेवटी भूक वैराग्य ! प्राप्तीसाठी
म्हणजेच चारीही आश्रम मिळण्यासाठी आहे.
भूक मारणे म्हणजे उपवास. उपवास म्हणजेच अग्नी प्रदीप्त… अग्नी प्रदीप्त म्हणजेच सत्वगुण.. सत्वगुण म्हणजेच प्रकाश… प्रकाश म्हणजेच ज्ञान प्राप्ती…
बघा मित्रांनो आपण एवढया सगळ्या गोष्टी कुणाकडे मागतो आहोत तर अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती म्हणजेच प्रकृती म्हणजेच स्त्री कडे. ह्या एवढया गोष्टी स्त्री म्हणजेच मोहाकडे आपण मागतो याचाच अर्थ भोगाकडून वैराग्याकडे !
मग मित्रांनो हाच निसर्गदत्त सिद्धांत आहे. हाच सिध्दांत ओशो रजनीश यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितला. संभोगातून समाधीकडे…
पण पण पण
मित्रांनो असंही आहे की जे जन्मतः वैरागी आहेत ते कसे तर ते अवधुतच असतात. त्यांचा ज्ञान परिसीमा ही सत्वगुण प्रकाशितच असते, त्यांना भूक तहान इतर गोष्टीची आवश्यकता नसतेच. ते अवलिया असतात. सामान्य जनांनाच कैक प्रकारची भूक असते किंबहूना भूक आहे म्हणूनच जगातील इतर व्यवहार चालत असतात. ! लौकिक व अलौकिक भूक हेच खरे दोन प्रकार म्हणता येतील. सांख्य ह्या दर्शनशास्त्र प्रकारात काही सिध्दांत मांडले ते अभ्यासनीय आहेत.
भूक अनेक प्रकारची आहे हे खरंच, सर्व प्रकारची भूक ही जीवनात असणे यालाच तर आयुष्य म्हणतात, ज्ञानाचा सम्यक उपयोग करून भूक भागवणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
कोणती भूक ज्यास्त हाताळावी हे ज्यांनी त्यांनीच ठरवावे.
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈